दिपाली खेडकर(काऊन्सिलर)
आजच्या काळात खासकरून कोविडनंतर मोबाईलच्या अतिवापरामुळे स्क्रीन ॲडिक्शन खूप वाढले आहे. पालक, शाळा, सायकॉलॉजिस्ट, डॉक्टर्स या सगळ्यांकडून हेच सतत ऐकायला मिळते. याचे कारण मोबाईल ॲडिक्शन हा प्रकार फक्त अभ्यासावर किंवा फक्त तब्येतीवर परिणाम करत नाहीत तर तो झोप, तब्येत, अभ्यास, नातेसंबंध, आत्मविश्वास, आनंद, समाधान, ध्येय या सगळ्याच गोष्टींवर नकारात्मक परिणाम करतो आणि म्हणून स्क्रीन ॲडिक्शनच्या कारणांचा, परिणामांचा आणि उपायांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
मोबाईलच्या एका क्लिकवर शॉपिंग, ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिंज वॉचिंग, गेम्स, रिल्स ,व्हाॅट्सॲप, सोशल मीडिया, पोर्नोग्राफी असे अनेक पर्याय मोबाईलच्या मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच उपलब्ध आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला बघायची नसेल तरीही ती इतक्यांदा स्क्रीनवर पॉप-अप होत राहते की कधी ना कधी कुठे ना कुठे सहज बघावं म्हणून क्लिक केलेल्या गोष्टीची कधी सवय लागून जाते हे कळत देखील नाही. तुम्ही जे बघता त्या सर्व गोष्टींचा अलगोरीदम फोन सेव्ह करून ठेवत असतो आणि त्याप्रमाणे त्याच त्याच प्रकारचे लिंक्स पुन्हा पुन्हा येत राहतात.
(Image :google)
मोबाइलच्या अती वापराने होते काय?
१. मोबाइलच्या अती वापराने, दिवस आणि रात्र फोनला चिकटून बसल्यामुळे व्यायाम, छंद , खाणे पिणे, खाण्यापिण्याच्या वेळा, एकमेकांशी संवाद, खेळणे या सर्व गोष्टी मागे पडतात आणि मुलं जास्तीत जास्त एकट राहणं पसंत करतात.
२. बैठया शैलीमुळे वजन वाढते, चष्मा लागतो,डोळ्यांचे नंबर वाढतात, मायग्रेन वाढतो, आदळ आपट, चिडचीड वाढते.
३. कुणी काही समजून सांगायला गेले, काही सूचना करायला गेले तर मुलं आक्रमक बनतात. पुढे ते सतत बोलणे खायला लागतात त्यामुळे त्यांची आक्रमकता वाढत जाते, सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो. एकलकोंडेपणा वाढतो, एकटेपणा जाणवायला लागतो, डिप्रेशन यायला सुरुवात होते. या चक्रामध्ये जितकी
मुलं अडकत जातात तितका त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
पालकांचा प्रश्न काय?
१. घराच्या जबाबदाऱ्या आणि जॉब मध्ये व्यस्त असलेले पालक मुलांवर लक्ष ठेवू शकत नाही. उशिरा आणि थकून भागून येणारे पालक ते घरी नसतांना मुलं काय करतात, बघतात याबद्दल तोपर्यंत अनभिज्ञ असतात जोपर्यंत काही मोठी घटना समोर येत नाही.
२. बरेचसे पालक हे स्वतःच फोन ॲडिक्ट असतात. याची त्यांना जाणीव करून दिली तर ते कधीही कबूल होत नाहीत. पण वडील आणि आई दोघेही फोन मध्ये गुंतलेले असले तर मुलांना फोन मध्ये गुंतणे अजिबातही वावगे वाटत नाही. आम्हाला काम असतात म्हणून आम्ही फोनवर असतो हे उत्तर देणाऱ्या पालकांची मुलं ही सुद्धा आम्हाला अभ्यास आहे, प्रोजेक्ट आहे म्हणून आम्हाला फोन हवा अशी उत्तरे देऊन मोकळे होतात आणि शेवटी जे हवं तेच बघतात.
४. पालकांमध्ये वाद, भांडण, मारहाण, शिवीगाळ असे वर्तन असेल तर त्या नकोशा वाटणाऱ्या वातावरणातून बाहेर पडायला मुलं फोनचा सहारा घेतात व त्याच्याच विळख्यात सापडतात.
५. विभक्त कुटुंबपद्धती मुळे संवाद, हास्यविनोद, खेळ, कला, फिरणे या परस्परावलंबी गोष्टी कमी झाल्या आहेत. मोकळेपणा, व्यक्त होणे, सहज वागणे कमी होत आहे. मुलांच्या प्रत्येक हालचालींवर पालक सतत लक्ष ठेवायच्या आणि सूचना देण्याच्या प्रयत्नात असतात. हे सततचे तणावपूर्ण वातावरण मुलांना त्यांच्यापासून लांब नेते. मग जवळचा वाटतो तो मोबाईल.
६. मोबाईल वर सगळ्या गोष्टी वन-वे असतात. त्यावर पलीकडून कोणी सतत सूचना करत नाही, काय आणि किती बघायचे यावर बंधन नाही, इथे कोणी बॉस नाही, उलट जास्तीत जास्त बघण्यासाठी प्रोत्साहन असते. तसेच त्यावर काय बघितले हे कुणाला कळत नाही कारण हिस्टरी डिलीट करता येते. ॲप्स डिलीट करता येतात. यासाठी वेगळा पैसा लागत नाही. घरच्याच वाय-फाय वर हे सगळं होतं किंवा मोबाईल डेटावर पण जमून जातं.
७. मुलांसाठी मोबाईल ची दुसरी सोय म्हणजे कितीही लांब अंतरावरच्या ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तींसोबत चॅट, व्हिडिओ कॉल करता येतो. पर्सनल फोटो, व्हिडिओ एकमेकांना पाठवता येतात. आणि इथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती मुलांच्या आयुष्यात शिरकाव करतात. मुलांना धमकी देणे, ब्लॅकमेल करणे, पैसे मागणे असे धक्कादायक प्रकार समोर येतात. मुलांना वाटते आपण जे शेअर करतो ते डिलीट केले की काम झाले. पण डिजिटल फूट प्रिंट इंटरनेट वर तशाच राहतात हे त्यांना माहीत नसते.
८. या आभासी दुनियेत मुलं नाती शोधायला निघतात, कौतुक मिळवायचा प्रयत्न करतात. मुलं प्रत्येक पोस्ट आणि फोटो वर लाईक्स, कॉमेंट्सची वाट बघतात. दुसऱ्यांच्या लास्ट सीन वर, डीपी वर लक्ष ठेवतात. स्वतःच्या कमी कौतुकावर दुःखी होतात, दुसऱ्याच्या जास्त कौतुकावर दुःखी होतात. या टोकाच्या भावनिक अवस्थांमुळे त्यांचा मानसिक स्वास्थ्य बिघडून ठेवतात. फोन काढून घेतला तर बिथरतात. हिंसक बनतात. ही हिंसा दिवसेंदिवस वाढत आहे असं चित्र समाजात आहे.
(Image : google)
अशावेळी करायचे काय?
१. उपाय म्हणून सर्व कुटुंबाला काम करावे लागते. आणि त्यामध्ये सर्वांचाच फायदा होतो, नवा दृष्टिकोन, नवे ध्येय, नवा आत्मिश्वास आपल्याला मिळतो. पण हा बदल दिसण्यासाठी स्वतःहून पाऊल पुढे टाकणे गरजेचे असते. ते आपण सर्वांनी मुलांसाठी जाणीवपूर्वक करायला हवे.
२. मोबाईल वापर कमी करण्यासाठी खालील नियम पाळता येतील - सर्व नोटिफिकेशन बंद ठेवणे. फोन शक्य असेल तेवढा सायलेण्ट वर ठवणे.
३. बऱ्याचदा मेसेज/फोन आल्याचा भास होऊन मोबाईल कडे लक्ष जाते ते टाळण्यासाठी हे गरजेचे आहे.
४. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात न घेता अंगणात किंवा गॅलरी मध्ये जाऊन झाडे, आकाश, सूर्य बघणे.
५. अंघोळीला आणि टॉयलेटला जाताना मोबाईल सोबत न ठेवणे.
६. झोपताना फोन बेडपासून लांब ठेवणे.
७. घरात लहान मोठ्या सर्वांना समान नियम असणे.
८. आपल्यासाठी स्क्रिन उपलब्ध हवी. स्क्रीन साठी आपण उपलब्ध नसावे हे लक्षात ठेवणे.
९. आपल्या प्रत्येक क्लिकच्या/पोस्टच्या परिणामाची जबाबदारी आपली आहे याचे भान लहान मोठे सर्वांनी ठेवणे.
१०. घरात आईवडील/ इतर मोठे जे वागतात ते मुलं लगेच शिकतात, त्यामुळे मुलांनी जे करणं अपेक्षित आहे ते स्वतःपासून सुरु करणं गरजेचं आहे.
(लेखिका काऊन्सिलर आहेत. आयपीएच माईंड लॅब, नाशिक)