काय मेला डोक्याला ताप, सगळी कामं माझ्याच डोक्यावर येतात. मी एकटी किती कामं करु असं सतत कटकटतच तुम्ही काम करता का? कुठलंही नवीन काम घरी दारी किंवा ऑफिसात आलं तर पहिली रिॲक्शन काय असते तुमची? नवीन काम करण्याचा आनंद की डोक्याला कटकट? चिडतच करता तुम्ही काम? विचार करुन उत्तर दिलं तर त्यातून आपला ग्रोथ माइण्डसेट कळतो. म्हणजे काय तर आपल्या प्रगतीसाठी आपली मानसिकता योग्य आहे की तीच मोठी व्हिलन आहे. आलं काम केलं काम म्हणून आपण काम करतो की एक्साइट होऊन करतो. आठवून पाहा, मिशन मंगल सिनेमात अक्षय कुमार आपल्या सहकारी शास्त्रज्ञ महिलेला सांगतो की, पहली बार ये काम कर रहे है इजण्ट इट एक्सायटिंग?
आता सांगा, तुम्हाला काम पाहून एक्सायटिंग वाटतं की कटकट वाटते?
कटकट वाटत असेल तर तुमच्या प्रगतीची चावी तुम्हीच कुलूप लावून लांब फेकून दिली आहे आणि अडकून स्वत:च पडले आहात हे खुशाल समजा. आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ म्हणजे काय ओझ्याचा गाढव होऊ का? सतत काम करु, त्याचं क्रेडिट, यशअपयश काहीच माझं नाही तरी राबू का? बॉस माझ्यावरच कामाचा बोजा टाकतो तर तोच करत राहू का?
तर याचं उत्तर आहे नाही!
मुळात हे प्रश्नच पडतात कारण आपली मानसिकता सकारात्मक नाही. ग्रोथ माइण्डसेट नाही.
आपला बंदिस्त आहे माइण्डसेट.
मग ग्रोथ माइण्डसेट म्हणजे काय तर प्रत्येक कामात संधी दिसली पाहिजे. जरी आपली प्रगती होत नसेल तरी आपल्या प्रत्येक कृतीतून आपण आपल्या ध्येयाच्या दिशेनं थोडं पुढे सरकलं पाहिजे. क्रिकेटपटू करतात तसं. जेव्हा रन्स होत नाही तेव्हा चिडून ते विकेट फेकत नाहीत तर एकेक दोन दोन धावा काढून, डिफेण्ड करुन खेळपट्टीवर टिकून राहतात. वाईट चेंडूची अर्थात संधीची वाट पाहतात. आणि स्कोअरबोर्ड हलता ठेवत मोठं टार्गेट जमवतात.
(Image : google)
ग्रोथ माइण्डसेट नसेल तर काय होतं?
१. तुम्ही चिडचिडे कटकटे होता. सतत इतरांशी तुलना करुन इनसिक्युअर होता.
२. स्वत:च्या कामात होणारी पिछेहाट दिसत नाही कारण तुमचा फोकस स्वत:वर नाही तर इतरांवर असतो.
३. लोकांचं यश दिसतं, कष्ट दिसत नाहीत.
४. कामात फोकस नाही, कामात नवीन टार्गेट नाहीत, क्रिएटिव्हिटी नाही.
५. व्यक्तिगत नातेसंबंध ताणलेले असतात, लोकांविषयी तुम्हाला आकस असतो.
६. आपल्यावर सतत अन्याय होतो असं वाटून तुम्ही स्वत:च्या चुकांचा विचार करत नाही.
७. तुमची प्रगतीच होत नाही.
मग करायचं काय?
अगदी सोपं आहे.
१. आपलं ध्येय निश्चित करा. त्यादिशेनं मेहनत घ्या.
२. प्रत्येक आव्हान संधी म्हणून स्वीकारा.
३. त्रास -जाच सहन करु नका पण त्यातूनही वाट काढा.
४. नव्या गोष्टी आनंदानं शिका.
५. इतरांना मदत करा, त्यांच्या यशात आनंदी व्हा.
आणि ग्रोथ माइण्डसेट फ्री कोर्सेस आहेत ऑनलाइन अनेक त्यांची मदत घ्या..
उदा. https://www.coursera.org/learn/growth-mindset