काही वेळा सगळं नीट चालू असतं पण अचानक आपला मूड ऑफ होतो. अशावेळी काहीच करावसं वाटत नाही, नुसतं शांत बसून राहावसं वाटतं किंवा कोणावर तरी खूप राग काढायची इच्छा होतं. काही वेळा इतकं जास्त लो फिल होतं की खूप रडावसं वाटतं. प्रत्येकवेळी असं होण्याला काही कारण असतंच असं नाही. काहीही न होताही मनात साचून आलेलं एकदम उसळून येतं आणि आपल्या मनाची अशी अवस्था होते. कधी हा राग असतो तर कधी मनावर आलेला ताण, कधी एखाद्या गोष्टीचं खूप आतून दु:ख झालेलं असतं तर कधी मानसिक, भावनिक प्रचंड थकवा आलेला असतो. असं सगळं झालं की नेमकं काय करायचं हे मात्र आपल्याला काही केल्या सुचत नाही. मग कधी आपण समोरच्या व्यक्तीवर विनाकारण ओरडतो, कधी एकटेच रडत बसतो नाहीतर शांत होऊन विचार करत बसतो. या सगळ्यापेक्षा आपल्या आताच्या भावना आणि त्या भावना नियंत्रणात येण्यासाठी नेमकं काय करायचं याविषयी समजून घेणं महत्त्वाचं आहे (How To Feel Better Instantly).
१. अनेकदा आपल्या डोक्यात एकामागे एक खूप जास्त विचार येतात. असं झालं तर विचार करत बसण्यापेक्षा आपल्या मनातील सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने लिहून काढायला हव्यात.
२. खूप जास्त थकवा आल्यासारखे झाले असेल तर सरळ मस्तपैकी एक झोप काढावी.
३. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर ध्यान करायला हवे.
४. उदास आणि दु:खी असाल तर व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे, त्यामुळे उदासपणा कमी होण्यास मदत होते.
५. एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल तर तो ताण घेऊन डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा चालायला जाणे केव्हाही जास्त चांगले.
६. कोणत्या गोष्टीमुळे तुमची खूप चिडचिड होत असेल आणि तुम्हाला राग येत असेल तर गाणी ऐकायला हवीत.
७. तुम्हाला खूप आळशी वाटत असेल आणि काहीच करण्याची इच्छा होत नसेल तेव्हा स्क्रीन टाइम कमी करावा. म्हणजेच स्वत:साठी वेळ द्यावा.
८. खूप बर्न आऊट झाल्यासारखे वाटत असेल तर वाचन करणे हा उत्तम उपाय आहे. यामुळे मन, मेंदू, शरीर सगळेच शांत होण्यास मदत होते.