दिवाळी म्हटली की एकमेकांच्या घरी जाणे, गप्पा आणि मज्जा मस्ती. त्याला जोड म्हणून एकमेकांच्या घरची जेवणं आणि गोडाधोडाचं खाणं. त्यातच गेल्या ४ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली असल्याने आपल्या अंगात काहीसा आळस भरला असेल. पहाटे लवकर उठून अभ्यंग किंवा दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमांना लावलेली हजेरी यामुळे पहाटेची गाढ झोप मोडलेली असते. त्यातच रात्री फटाके उडवणे, पाहुण्यांची ये-जा, आवराआवरी, गप्पा यांमध्ये बराच वेळ जातो आणि झोपायला उशीर होतो. अशातच आवडीचे पदार्थ दणकून खाल्ल्यामुळे एकप्रकारची सुस्ती किंवा आळस अंगात भरतो. त्यातच थंडी पडल्याने दिवसभर छान पांघरुण घेऊन पडून राहावे, किंवा टिव्हीसमोर बसून आराम करावा असं आपल्याला वाटतं. यालाच फेस्टीव्हल फटीगही म्हणतात. आता हा फटीग घालवून नव्या जोमाने कामाला लागायचं तर काय करायला हवं यासाठीचे काही सोपे पर्याय आपण पाहणार आहोत (How To Feel Fresh After Diwali Festival).
१. काहीच काम न करता पूर्ण आराम करा
दिवाळीच्या आधीपासून आपण खरेदी, साफसफाई, फराळाचे पदार्थ अशा खूप गोष्टी करत असतो. त्यातही घरी जेवायला कोणी येणार असेल की घरकाम करुन आपण आणखी थकून जातो. त्यामुळे दिवाळीनंतर एखादा दिवस घरातलं कोणतंच काम न करता पूर्णवेळ फक्त आराम करावा. यामुळे थकवा निघून जाण्यास नक्कीच मदत होईल.
२. शॉर्ट ट्रीपला जा
दिवाळीच्या दिवसांत घरात असलो की कामाला पर्यायच नसतो. कितीही ठरवले तरी घरातील लोकांचे आणि आल्या-गेलेल्यांचे सगळे करता करता आपण थकून जातो. ऑफीसला फआरशी सुट्टी नसेल तर मग आपली तारेवरची कसरत होऊन जाते. अशावेळी किमान अर्धा दिवस किंवा एक दिवस जवळपास कुठे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आलो तर आपण मनाने फ्रेश होऊन जातो.
३. शारीरिक हालचाली अत्यावश्यक
फराळाचं किंवा गोडाधोडाचं खाऊन शरीराला एक प्रकारची सुस्ती येण्याची शक्यता असते. अशातच थंडीला सुरुवात झाल्याने आपल्याला बराच काळ झोपून राहावेसे वाटते. मात्र अशातच आपण ठरवून काही किलोमीटर चालावे किंवा ठरवून काही दिवस योगासने, सूर्यनमस्कार, सायकलिंग यासारखा व्यायाम आवर्जून करावा. यामुळे आळस दूर पळून फ्रेश वाटण्यास नक्कीच मदत होते.