Join us  

दिवाळीच्या सुट्टीत व्हा फ्रेश, नव्या जोमाने कामाला लागायचं तर करा फक्त ३ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 9:42 AM

How to Make Yourself Fresh In Diwali Vacation : सणवार झाल्यावर जेव्हा आपण नेहमीच्या रुटिनमध्ये येतो, तेव्हा आपल्याला शरीरात या दगदगीचा ताण जाणवायला लागतो.

ठळक मुद्देआपला ताण लगेच हलका करण्याचं उत्तम तंत्र आहे, करुन बघा. सणावारांत आपण फिरतो, कष्ट करतो, मज्जा करतो, पण त्याचा ताण नंतर जाणवतो.

सुचेता कडेठाणकर 

सणाच्या धामधुमीत वेळ कसा जातो, ते कळत नाही. अभ्यंग स्नान, फराळ, रांगोळी, लक्ष्मीपूजन असं एकामागे एक सुरुच असतं. अर्थात, दिवाळीमध्ये आपल्याला यापैकी कशाचाच ताण जाणवत नाही, दिवाळी सणाचीच ती खासियत आहे. आपल्यापैकी अनेकांचा दिवाळी नंतर एखादा प्रवास सुद्धा ठरलेला असेल. सणाच्या गडबडीमध्ये कदाचित या प्रवासाच्या तयारीचीही गडबड होऊ शकते. हे सगळं करण्याचा उत्साह, उमेद, आणि उर्जा आपल्याला सणाच्या वातावरणात आणि आपल्या माणसांच्या साथीने मिळतेच. पण बरेचदा असं होतं, की हे झाल्यावर जेव्हा आपण नेहमीच्या रुटिनमध्ये येतो, तेव्हा आपल्याला शरीरात या दगदगीचा ताण जाणवायला लागतो. मग आपण दिवाळीच्या फराळ खाऊन वाढलेल्या वजनाचा, गडबडीत साफसफाई करताना भरलेल्या उसणीची विचार करु लागतो. म्हणजे तो विचार करायला आपल्याला फुरसत मिळते (How to Make Yourself Fresh In Diwali Vacation). 

आता या गडबडीत आपल्याला कोणी प्राणायाम करायला किंवा आसनं करायला सांगतिलं तर आपल्याकडे वेळेचं कारण असणारच. म्हणूनच योग साधनेमध्ये एक मस्त उपाय आहे. याला न्यास म्हणतात किंवा अधिक काळ केली, तर योग निद्रा. न्यासाचा हा अभ्यास अगदी शास्त्रशुद्ध करायचा असेल, तर त्यासाठी तज्ज्ञांचा मार्गदर्शन हवे. परंतु आपण याचा विनियोग शरीर आणि मनाचा ताण घालण्यासाठी करु शकतो, तो असा.

(Image : Google)

१. डोळे मिटून अगदी सहज स्थितीत बसावे. खुर्चीवर बसायलाही हरकत नाही. पाठीचा कणा मात्र ताठ ठेवावा.

२. १ मिनिटभर स्थिरतेचा अनुभव घेऊन, मग हळूहळू आपलं लक्ष एक एक करुन शरीराच्या खालील भागांकडे न्यावं. 

१. हाताचा अंगठा, तर्जनी, मधलं बोट, अनामिका, करंगळी२. पाच ज्ञानेंद्रिय३. पाच कर्मेंद्रिय४. कंठ५. भुवयांच्या मधली जागा६. माथा

३. आपण लक्ष फक्त या भागांकडे एक एक करुन घेऊन जायचं आहे. शक्य तितका काळ (१०-२० सेकंद) केवळ त्या भागाकडे लक्ष स्थिर ठेवायचं आणि मग पुढे जायचं.

आपला ताण लगेच हलका करण्याचं उत्तम तंत्र आहे, करुन बघा. अधिक ज्ञानासाठी मात्र योग्य योग शिक्षकाशी संपर्क करा. 

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत) 

kohamfit@gmail.com

 

टॅग्स :मानसिक आरोग्यदिवाळी 2022लाइफस्टाइल