विकेंड म्हणजे आठवड्याचा शीण घालवण्याचा आणि आरामाचा दिवस. काही जणांना २ दिवसाचा विकेंड असतो तर काहींना १ दिवसाच्या सुट्टीवरच समाधान मानावे लागते. विकेंड संपत आला की आपल्याला सोमवारचा दिवस उगवूच नये असं अनेकदा वाटतं. सकाळी उठून धावपळ दिवसभर ऑफीसचे काम, प्रवास आणि दगदग अगदी नको वाटते. म्हणून अनेकदा आपल्याला सोमवारचा दिवस येऊच नये अशी इच्छा होते. मग कधी एकदा शुक्रवार येतो आणि आपण आराम करतो असं आपल्याला होऊन जातं (How To Start Week After Weekend).
एखादवेळी फारच कंटाळा आला तर आपण सोमवारी ऑफीसला दांडी मारतो. पण नेहमी असं करणं शक्य नसतं आणि सोमवारी आपल्याला कामाला जाण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. पण नकारात्मक विचार करुन किंवा मनाविरुद्ध कामाला जावं लागणं हे आपल्यासाठी आणि कामाच्यादृष्टीनेही योग्य नसते. त्यामुळे आळस झटकून चांगल्या मूडमध्ये सोमवारी कामाला जायचं तर करा फक्त ३ गोष्टी...
१. सकारात्मक बोला
साधारणपणे रविवारची संध्याकाळ आली की आपण विकेंड संपला, आता उद्यापासून ऑफीस, कंटाळा आला अशा स्वरुपाची नकारात्मक वाक्य बोलतो. त्यामुळे नकळत आपला मूड नकारात्मक होत जातो. त्यापेक्षा असे काहीच न बोलता उद्या सोमवार आहे आणि आपल्याला ऑफीसला जायचे आहे हे मान्य करा. त्यामुळे तुमच्यातील नकारात्मक भाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
२. कामांची यादी करा
उद्यापासून आपल्याला घरातील, ऑफीसची, बाहेरची कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत याची रविवारी एक यादी करा. म्हणजे या आठवड्यात आपले काय टार्गेट आहे ते आपल्या डोळ्यासमोर राहील. कामं एकदा डोळ्यासमोर असली की आपल्याला कंटाळा न येता ती कामं कशी पूर्ण करायची याचे प्लॅनिंग करता येईल.
३. कपड्यांची तयारी करा
ऑफीसला जायचे म्हणजे आपल्याला किमान ५ दिवसांसाठी चांगले कपडे लागतात. हे कपडे धुतलेले- इस्त्री केलेले आहेत की नाही ते पाहून ठेवा. या कपड्यांवर आपल्याला कोणत्या अॅक्सेसरीज घालता येतील. कोणती बॅग घ्यायची, पायात काय घालायचे याबाबतचे नियोजन करा. जेणेकरुन ऑफीसला जायचा उत्साह काही प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण होईल.