सुचेता कडेठाणकर
दिवाळीची पहाट आपल्यापैकी प्रत्येकासाठी काही ना काही कारणामुळे विशेष असते. म्हणजे एरवी आजिबात लवकर न उठणारा मनुष्यसुद्धा दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी लवकर उठून, उटणं लावून, सुंदर सणाचे कपडे घालून कुटुंबियांसोबत फराळासाठी तयार होतो. हे नेमकं कसं होतं, ही सकारात्मकता अचानक दिवाळीच्या काळात प्रत्येकात येते कुठून (How to Stay Positive in Diwali Festival)?
मुळात माणसाला समाजात रहायाला, मिसळायला, एकमेकांचं कौतुक करायला आणि करवून घ्यायला, आनंद साजरा करायला आवडतंच. हे सगळं करायची संधी मिळते तेव्हा सकारात्मकता येतेच. दिवाळी हा गणेशोत्सवासारखा सार्वजनिक सण नाही. दिवाळी साजरी केली जाते, ती आप्त मंडळी, मित्र परिवार यांच्याबरोबर. आपल्या अगदी जवळच्या माणसांबरोबर उत्तम वेळ घालवता येणं, या सारखी ताकदीची गोष्ट कोणती असू शकेल? आणि कदाचित म्हणूनच, इतर कोणत्याही सणांमधून मिळणार नाही इतकी सकारात्मकता आपल्याला दिवाळीच्या या सणामधून मिळते.
यंदाच्या दिवाळीमध्ये, आपल्या घराबाहेर आपण आकाशकंदिल लावूच. पण त्याचबरोबर आजुबाजुच्या सकारात्मक उर्जेचा फायदा करवून घेत मनात देखील एक सकारात्मकतेचा कंदिल लावू शकतो का? दिवाळीचे चार दिवस आणि त्यानंतरही या काही गोष्टी केल्या तर दीर्घकाळ टिकणारी सकारात्मकता आपण मिळवू शकतो.
१. आपण तीच गोष्ट दुसऱ्यांना देऊ शकतो, जी आपल्याकडे असते. आपल्याकडे नसलेली गोष्ट आपण दुसऱ्यांना देऊ शकत नाही. आपण आनंदी असू, तर आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो. आपण सकारात्मक असू, तर आपण दुसऱ्यांना सकात्मकता देऊ शकतो. आपण जे देतो, ती आपली गुंतवणूक असते, त्यामुळे तीच गोष्ट आपल्याला व्याजासह परत मिळते. मग दिवाळीमध्ये, आपण फराळाबरोबरच, आनंद आणि सकारात्मकता वाटण्याचा संकल्प करु शकतो.
२. दररोज दाराबाहेर किंवा गच्चीत आपण पणती लावू, तेव्हा पणतीची ज्योत सुरुवातीला काही काळ अस्थिर होऊन मग हळू हळू स्थिर होते. मग काही काळाने शांत तेवायला लागते. अस्थिरतेकडून शांततेकडे जाणारा हा पणतीचा प्रवास जर आपण पणती लावताना लक्ष देऊन बघितला, तरी पणतीची ती शांतता आपल्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेल्याखेरीज रहाणार नाही.
३. दररोज किमान पाच अनोळखी व्यक्तींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन बघू. कदाचित आनंद वाटण्याची ही साखळी आपल्याच नकळत आणखी वाढत जाईल. आणि एकूणच आपल्या आजुबाजूला, समाजात सकारात्मकता पसरायला मदत होईल.
(लेखिका योगतज्ज्ञ आहेत)