- मेघना ढोके
‘माझ्या कामावर पसंतीची मोहर उमटवा अशी माझी लोकांकडून अपेक्षाच नाही. लोकांना खुश करायचं म्हणून मी काही करत नाही. आय डोण्ट सीक व्हॅलिडेशन फ्रॉम पिपल’- जेव्हा मिताली राज हे सांगते तेव्हा ती वेगळ्या अर्थानं भारतीयच नाही तर उपखंडातल्या बायकांच्याच मनातलं काहीतरी सांगत असते. भारतीय उपखंडात रीत अशी की, बाई कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी तिच्या अवतीभोवतीच्या समाजानं तसं म्हणत तिला शाबासकीची प्रमाणपत्रं वाटली पाहिजे.. मग तिचं कर्तृत्व झळाळून उठतं. मितालीने ही जुनी रीतच नाकारली. आणि म्हणून तिनं कालपरवाच केलेले विक्रम काही फक्त क्रिकेटच्या मैदानापुरताच मर्यादित राहत नाही. कसोटी आणि वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारी हायेस्ट रनमेकर होण्याचा विक्रम नुकताच मितालीच्या नावावर नोंदला गेला.त्याआधी मार्चमध्ये तिनं दहा हाजार धावांचा टप्पा गाठला होता. १२ मार्च २०२१ चा तो दिवस.मितालीने २६ जून १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. काळाचा केवढा मोठा टप्पा. २२ वर्षांचा प्रदीर्घ काळ. या काळाच्या कसोटीवर उतरणं हेच खरंतर तिच्या यशाचं मोठं वैशिष्ट्य आहे.
आठवा १९९९चा हा काळ. पाकिस्तान संघ प्रदीर्घ काळानंतर भारत दौऱ्यावर होता. सचिन तेंडुलकरची पाठदुखी राष्ट्रीय चिंतेचा विषय बनलेली होती आणि चेन्नईत पाकिस्तान संघानं भारतीय संघाला मैदान दाखवलं, तिकडे दिल्लीत अनिल कुंबळेनं पाकिस्तानचा सारा संघ बाद करत नवा विक्रम केला. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी स्वत: शांततेचा पैगाम घेऊन लाहोरला गेले. जुनी वैराची भूतं गाडून नव्या मानवी जगाची पायाभरणी होऊ शकेल अशी किमान आशा तरी १९९९ ने सुरुवातीच्या तीन महिन्यांत दाखवली. मात्र मे महिना उजाडता उजाडता सारंच पालटलं आणि कारगील युद्ध सुरू झालं. स्वप्न, उमेद आणि वास्तव यांची भयाण परीक्षा पाहणारा. त्याकाळात तिनं भारतीय संघात पदार्पण केलं. तो दिवस आणि आजचा दिवस ती खेळतेच आहे.मिताली राज. भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान. तिनं शुक्रवारी १० हजार धावा करण्याचा टप्पा गाठला. सलग २१ वर्षे ही मुलगी खेळते आहे. १६ व्या वर्षी इंडिया कॅप तिच्या डोक्यावर आली. १९९९ च्या अस्वस्थ काळात २६ जून १९९९, आयर्लंडविरुद्ध ती पहिला सामना खेळली. आकडेवारी तर काय आजकाल गुगल केली तरी एका क्लिकवर मिळते, त्यामुळे तिने किती सामने खेळले, किती धावा केल्या हे सहज समजावं. मात्र मितालीच्या कारकीर्दीची गोष्ट त्या आकडेवारीची पलिकडची आहे.
तो काळ असा होता की, बायका आणि क्रिकेट हा टिंगलीचा विषय होता. बायका क्रिकेटपटूंच्या फॅन असू शकतात, पण त्यांना क्रिकेट कळत नाही असं म्हणून महिला प्रेक्षकांची हेटाळणी आम बात होती. बायकांचं क्रिकेट नव्हे बायकांची भातूकली म्हणून त्याची राजरोस टिंगलही होत असे. खासगी वाहिन्यांवर लाइव्ह दिसू लागलेल्या क्रिकेटला बाजारपेठ म्हणून महिला प्रेक्षक तर हव्या होत्या, पण त्यांना क्रिकेट कळत नाही हा समज ठाम. त्यात ग्लॅमर आणावं म्हणून व्हाया मंदिरा बेदी क्रिकेटमध्ये ‘एक्स्ट्रा इनिंग’चं ग्लॅमर आणण्यात आलं. मात्र क्रिकेटच्या चिकित्सक चर्चेपेक्षा मंदिरा बेदीच्या स्ट्रिप्सवाल्या ब्लाऊजची आणि साड्यांचीच चर्चा जास्त झाली. त्या काळाला बायकांना क्रिकेट समजतं हेच मान्य नव्हतं, त्याकाळात जर एखादी मुलगी म्हणाली असती की मी क्रिकेटमध्ये करिअर करणार तर तिला मुर्खात काढण्याची संधी कुणी सोडली नसती.त्याच काळात मिताली राज नावाची एका जेमतेम मध्यमवर्गीय घरातली मुलगी हातात बॅट घेऊन म्हणत होती की मी क्रिकेट खेळणार! तिच्यापेक्षाही तिचे वडील, ज्यांनी मुलीच्या हाती बॅट दिली. अर्थात सोपं नव्हतंच क्रिकेटपटू होणं. मात्र तमिळ कुटुंबातली राजस्थानात वाढलेल्या या मुलीनं वडिलांच्या पाठिंब्याने वेगळी वाट चालायला सुरुवात केली. तिचे वडील दोराई राज भारतीय वायूदलात एअरमन म्हणून काम करत. भावासोबत मितालीनं क्रिकेट खेळणं सुरु केलं. या मुलीला पुस्तकं हाका मारत, भरतनाट्यम तर तिचा जीव की प्राण होतं. पण वडिलांना वाटलं की आपल्या मुलीनं क्रिकेट खेळलं पाहिजे. कशाच्या जोरावर या गृहस्थांनी मुलीच्या हातची क्रिकेटची बॅट सुटू दिली नाही हे कोडंच असावं, पण मितालीला मात्र क्रिकेट खेळावंच लागलं. तिचा ‘आळशीपणा’ वडिलांना मान्य नव्हता. त्यांनी भरतनाट्यम सोडवलं पण क्रिकेट सुटू दिलं नाही. मितालीनं आजवर अनेक मुलाखतीत हे सांगितलं आहे की, आयुष्यात प्लॅन बी असं काही असतं हेच मला माहिती नव्हतं. त्यांनी मला घोड्यासारखं ट्रेन्ड केलं, डाव्या उजव्या बाजूला पाहायचंच नाही, क्रिकेट एके क्रिकेट हेच माझं शिक्षण आणि हेच माझं लहानपण होतं. अर्थात वडिलांना काहीही वाटत असलं तरी भारतीय कुटुंबात मुलगी क्रिकेटमध्ये, किंवा खेळात करिअर करणार हे पटणंच कुणालाही शक्य नव्हतं. आजीआजोबा, मावशाकाकवा, नातेवाइक सगळे एकच गोष्ट म्हणत, कुठं पोरीला खेळायला पाठवता, ती काळी पडेल. हातपाय मोडला तर पुढे लग्न कसं होणार? पण माझे वडील ठाम होते. त्यांचा लेकीपेक्षाही तिच्या हातातल्या बॅटवर जास्त भरवसा असावा!’तो भरवसा मितालीने खरा ठरवला. ज्यांना ही मुलगी उन्हात खेळून काळी पडेल याची चिंता होती, त्यांना तिच्या कारकिर्दीचा झगमगाट आता दिसतो आहे.
मिताली म्हणते, लोक मला म्हणतात की मुलींना क्रिकेट खेळायला प्रेरणा दिलीस. पण प्रेरणा अशी बाहेरुन मिळत नसते. तुम्हाला सतत स्वत:ला जागं ठेवत, कामाला लावावं लागतं. तासंतास तुम्ही मेहनत घेता, दुखापती होतात, घामाच्या धारा वाहतात. उन्हातान्हात खेळता, तेव्हा काही मी सूर्याला नाही सांगू शकत की सहा तास जरा तळपू नकोस, माझी स्किन ग्लो केली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ग्लॅमरस मॉडेल व्हायचं तर व्हा, पण क्रिकेटपटू होणार असाल तर मॉडेल नाही होता येत! क्रिकेट हा खेळ फक्त सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर खेळता येतो.’मिताली राज आणि झुलन गोस्वामी हे भारतीय क्रिकेटचे पायाचे दगड ठरावेत इतकी ठाम वाटचाल या मुलींनी दीर्घकाळ केली. भारतीय क्रिकेटसाठी सचिन तेंडुलकरनं जे बदलाचं वारं आणलं, हजारो मुलांना क्रिकेट खेळण्याचं वेड लावलं तेच मिताली आणि झुलननं महिला क्रिकेटसाठी केलं!हे सारं एक-दोन नाही तर सलग विसहून अधिक वर्षे केलं म्हणून तर आज टि्वटरच्या जमान्यात तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.१० हजार धावांचा पल्ला गाठणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू.. हे यश तिचं एकटीचं असलं तरी तिची गोष्ट मात्र तिच्या एकटीची नाही..कशी असेल?(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@gmail.com