Join us  

खूप राग आला की या 6 गोष्टी करा, राग मिनिटात गायब.. कर के देखो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 7:35 PM

रागाचे नकारात्मक परिणाम खूप आहेत. जे शरीर आणि मनावर होतात. त्यामुळे  मला खूप राग येतो असं कौतुकानं सांगण्यापेक्षा हा राग आल्यावर किंवा तो येतो आहे हे लक्षात आल्यावर  काय करायला हवं हे शोधायला हवं. सतत राग येण्याच्या सवयीला लांब ठेवायचं असेल तर उपाय सोपे आहेत.

ठळक मुद्देज्या क्षणी आपल्याला राग आला आहे हे कळतं तेव्हा डोळे बंद करावे आणि दीर्घ श्वसन सुरु करावं.    राग आला की तो पटकन जाणार नाही हे कळलं सरळ  तिथून निघून जावं. थोडा वेळ बाहेर फिरुन यावं. राग आल्यावर समोरच्यावर चिडचिडण्यपेक्षा, एकाचा राग दुसऱ्यावर काढण्यापेक्षा सरळ थोडा वेळ एकट्यानं राहावं.

राग येणं ही खूप छोटी गोष्ट वाटते.  राग कसलाही आणि कधीही येवू शकतो. पण रागाच्या बाबतीत होतं असं की अनेकांना आलेला राग पटकन जात नाही.  अनेकांचा राग काही काळानंतर निघून जातो पण त्याचे परिणाम मनात , वागण्यात  मात्र कायम स्वरुपी राहातात.  सतत राग येण्याच्या सवयीचा शरीरावर आणि मनावरही ही वाईट परिणाम होतो. रक्तदाबासंबंधित विकार, डोकेदुखी, चिंता, निराशा, नकारात्मकता या समस्या निर्माण होतात. म्हणूनच  तज्ज्ञ  सांगतात की राग हाताळायला शिकलं पाहिजे, रागाचं व्यवस्थापन जमायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यावर, विचार प्रक्रियेवर नकारात्म्क परिणाम करणारा राग आपल्याला चार हात दूर ठेवता यायला हवा.  त्यामुळे मला खूप राग येतो असं कौतुकानं सांगण्यापेक्षा हा राग आल्यावर किंवा तो येतो आहे हे लक्षात आल्यावर  काय करायला हवं हे शोधायला हवं. सतत राग येण्याच्या सवयीला लांब ठेवायचं असेल तर उपाय सोपे आहेत.

रागाला लांब ठेवण्यासाठी

  1.  ज्या क्षणी आपल्याला राग आला आहे हे कळतं तेव्हा डोळे बंद करावे आणि दीर्घ श्वसन सूरु करावं.  संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करावं. श्वास आत येताना छातीत, फुप्फुसात घडणाऱ्या घडामोडीकडे लक्ष द्यावं. मोठा श्वास घ्यावा आणि तो हळूवार सोडावा. अशी पाच आवर्तनं करावीत. हा श्वास आलेल्या रागाला पळवून लावतो.  दीर्घ श्वसनानं चलबिचल झालेलं, अस्वस्थ झालेलं मन शांत होतं. 
  2.  आपल्या न आवडीची गोष्ट आजूबाजूला चालू असली की राग येतो. हा राग घालवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपलं आवडतं गाणं किंवा संगीत ऐकावं. गाणं-संगीत रागाला आणि मनाला दोघांनाही शांत करतं. गाण ऐकताना ज्या परिस्थितीमुळे आपल्याला राग येतो ती आपल्या मनपटलावरुन तात्पुरती जाते. त्याच्यावरचं लक्ष जातं. त्या परिस्थितीने निर्माण होणारी विचार प्रक्रिया थांबते.  आणि संगीत ऐकता ऐकता रागही शांत होतो. 
  3. आलेला राग नियंत्रणात येत नाही आहे हे लक्षात आल्यावर  सरळ आपल्या जवळच्या व्यक्तीला, मित्र-मैत्रिणींना फोन करावा. आपल्याला   कसला राग येतोय हे त्यांच्याकडे व्यक्त करावं. या राग येण्यानं आपल्याला काय काय होतंय, जाणवतंय ते सांगावं. या सांगण्यातून रागाचा निचरा होतो. मनातला त्रागा असा कोणाशीतरी शांतपणे बोलून बाहेर निघतो आणि राग शांत होतो. 
  4.  कधी कधी काही विचारांनी राग येतो, रागामुळे आपला आपल्यावरचा ताबा जाण्याची शक्यता निर्माण होते अशा टोकाच्या क्षणी आपणच आपल्याला शांत करावं. मनाशी   ‘शांत हो, सबुरीने घे,  सगळं नीट होईल अशी वाक्य बोलावीत. ती सतत बोलावीत .यामुळे रागानं कृतीतला आक्रमकपणा गळून पडतो.  आणि मन शांत होण्यास मदत होते. 
  5. राग आला की तो पटकन जाणार नाही हे कळलं  की सरळ  तिथून निघून जावं. थोडा वेळ बाहेर फिरुन यावं. चालण्यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो आणि मन शांत होण्याची प्रक्रिया सुरु होते. शिवाय त्या परिस्थितीतून बाहेर आल्यामुळे तिचा वेगळा विचार करण्याची संधी आणि वेळ मिळतो.  आणि राग आणणाऱ्या परिस्थितीतून बाहेर पडल्यानं  कृतीचा सुटू शकणारा तोलही सांभाळला जातो. पुढची नकारात्मक क्रिया टाळली जाते. 
  6. राग आल्यावर समोरच्यावर चिडचिडण्यपेक्षा, एकाचा राग दुसऱ्यावर काढण्यापेक्षा सरळ थोडा वेळ एकट्यानं राहावं.  एका खोलीत शांत बसावं. थोडी झोप काढावी. यामुळे डोकं शांत व्हायला अवसर मिळतो आणि शांत डोक्यानं विचार करण्याची संधीही मिळते.
टॅग्स :मानसिक आरोग्य