Join us  

शरीरासोबत मनाचंही आरोग्य उत्तम ठेवायचं तर लक्षात ठेवा फक्त ४ सूत्रं, सुखी जगण्याची सोपी किल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 9:17 AM

How to Keep Mental Health Better 4 Simple Tips : कायम आनंदी राहायचं तर जीवनाला योग्य दिशा हवी...

ठळक मुद्देआपले आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण असतं की आपले विचार आणि भावना आपल्याला नियंत्रित करतात

सुचेता कडेठाणकर

आपले आरोग्य उत्तम असावे असे आपल्या सगळ्यांनाच वाटते. पण आपण आरोग्याचा विचार करतो, त्यावेळी बहुतेक वेळा आपण फक्त शारिरिक आरोग्याचाच विचार करत असतो. आरोग्यसाधना करायची म्हणजे व्यायाम करायचा आणि योग्य तो आहार घ्यायचा हा आपला विचार असतो. हा विचार चुकीचा नसला तरीही तो परिपूर्ण नाही. भारतीय तत्वज्ञान, योगशास्त्र आणि आयुर्वेद आपल्याला आरोग्याचे ४ पैलू सांगतात. हे चारही पैलू विचारपूर्वक अभ्यासले तर आपल्याला आरोग्याचा परिपूर्ण विचार करणं म्हणजे काय हे कळू शकेल (How to Keep Mental Health Better 4 Simple Tips) .

१.    आहार-

आहार म्हणजे आपण आपल्या शरीरात घन, द्रव, किंवा वायू रुपात येणारे सर्व घटक. आहारामध्ये जसा आपल्या रोजच्या अन्नाचा समावेश होतो, तसाच आपण आत घेणाऱ्या हवेचा सुद्धा समावेश होतो. त्यामुळे दररोज सात्विक, चौरस आहार जसा महत्वाचा, त्याचप्रमाणे मोकळी हवादेखील महत्त्वाची असते. मग आहाराचा हा खांब भक्कम करण्यासाटी काय करावं-

-   मिताहार – आपल्या पोटाचे चार भाग केले तर त्यातील दोन भाग सात्विक घन अन्नाने भरावेत. तिसरा भाग पाण्याने भरावा आणि चौथा भाग रिकामा ठेवावा.

-   हवा – दररोज सकाळी शुद्ध हवा मिळण्यासाठी बाहेर जावं, गच्चीवर जावं, संध्याकाळी किंवा रात्री ओंकार मंत्राचा जप करावा. 

२.    विहार –

विहार याचा अर्थ रिकाम्या वेळात आपण केलेली कृती. आपले काम, कर्तव्य झाल्यावर उरलेला वेळ आपण नेमका कसा घालवतो. आपल्याला हा रिकामा वेळ असतो का, नसेल तर आपण तो काढण्याचा प्रयत्न करतो का, किंवा तो वेळ नाही याची जाणीव आपल्याला आहे का. मनोरंजनासाठी आपण निवडलेल्या माध्यमांमधून किंवा कृतींमधून आपण मनाला शांत करतो का हे प्रश्न एकदा स्वतःलाच विचारून बघितले तर आरोग्याचा हा पैलू आपोआप उलगडेल.

३.    आचार – 

आचार याचा अर्थ आपली वागणूक. आपली वागणूक, तीन प्रकारची. 

- एक म्हणजे, आपण स्वतःशी कसे वागतो. आपण आपले मित्र बनून वागतो की शत्रू बनून.

-  दुसरं म्हणजे, आपण आपल्या प्रेमाच्या माणसांशी कसे वागतो. 

- तिसरं म्हणजे, आपण समाजाशी कसे वागतो. समाजात वागताना आपल्याला हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव असते का.

४.    विचार –

विचार हा आरोग्याचा सर्वाधिक महत्वाचा आणि बराचसा दुर्लक्षित पैलू. आपल्या मनात सतत विचार येतात का. येत असतील तर ते नकारात्मक येतात का. आपल्या मनात जे विचार येतात, त्याची आपल्याला जाणीव असते का. आपले आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण असतं की आपले विचार आणि भावना आपल्याला नियंत्रित करतात याचा बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे. 

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइल