अश्विनी बर्वे
मौन म्हणजे शांत बसणं, न बोलणं, गप्प राहणं. एवढाच अर्थ मला माहित होता. पण घरात मौन ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते होत नसे. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही तर जणू माझं अभिव्यक्त स्वातंत्र धोक्यात येईल असंच मला वाटे. मौन पाळणारी फारशी माणसं मला माहित नव्हती. काही माणसं जेवतांना बोलत नाहीत,पण ते खाणाखुणा करून जाम त्रास देतात. त्यांच्या बरोबर जेवायला बसल्यावर आपल्याला त्यांच्याकडेच सारखं बघावं लागतं. आपणही एकदा मौन पाळलं पाहिजे असं वाटत होतं, पण ते कसे साध्य होणार हे माहित नव्हतं. म्हणून मी विपश्यनेचा मार्ग निवडला. दहा दिवस तिथं रहायचं आणि मौनात राहयचं.
मी ज्या दिवशी त्या शिबिराला गेले तेव्हा तिथे सांगितले, की मौन म्हणजे बोलणे तर बंदच ,पण त्याचबरोबर कोणत्याही खाणाखूणा , इतरांशी स्मित, डोळ्यांची उघडझाप हे काहीच करायचं नाही. फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं. बाहेर आणि आत काय चालू आहे हे फक्त बघायचं. पहिल्या दिवशी मला त्रास झाला. शब्द पार ओठापर्यंत येऊन पोहचायचे आणि मग त्यांना कळायचं की बाहेर येण्याची गरज नाही.
(Image : Google)
आजूबाजूला शब्दांचे डोंगर उभे करणारी माझ्यासारखी सामान्य माणसे कितीतरी होती. खरंच या शब्दांचा प्रत्यक्ष कचरा झाला असता तर ?म्हणजे कागद, भाजीपाला, इतर प्लास्टिक, इतर नको असलेल्या वस्तू, ज्या आपण कचरा कुंडीत फेकतो तसा कचरा. जो जागा व्यापतो. अशी जागा शब्दाने व्यापली असती तर आपल्याला रहायला जागाच राहिली नसती. आपण विनाकारण घरात, बसमध्ये, रस्त्यावर मधोमध गाड्या उभ्या करून,व्यासपीठावर,शब्द फेकत असतो. ते कितीतरी वेळा उपद्रवी,दुबळे आणि निष्क्रिय असतात.
(Image : Google)
मौनात असलं की निसर्गातील भाषा कळायला लागते.फुलणाऱ्या फुलात, हिरव्यागार वनराईत भाषेचे सौंदर्य लपल्याची जाणीव होते. ते आपल्या रंगानं, गंधानं एकमेकांशी बोलतात. वारे ही आपल्याशी बोलत असते. निसर्गाकडे शब्द नाहीत पण आपण शांत असलो की आपल्याला कळतं त्याला काय म्हणायचं आहे ते. पण तेवढा अवसर आपण स्वतःला देत नाही आणि इतरांच्या अवकाशाचाही आपण संकोच करतो.
तसंच आपलं मन नक्की काय बोलत आहे हे ही ऐकू येत नाही. थोडं तरी शांत होवू या आणि दुसरं काय म्हणत आहे हे ही ऐकू या. आवश्यक असेल तरच बोलू या,एकमेकांना समजून घेऊ या...
जरा गप्प बसूया..
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)