डॉ. यश वेलणकर
इंटरनॅशनल सेल्फ केअर डे (international self care day) असा एक दिवस असतो. दरवर्षी २४ जुलै हा सेल्फ केअर डे म्हणून साजरा होतो. २०११ पासून हा दिन का साजरा केला जातो तर माणसाचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य ही त्याची स्वतः ची जबाबदारी आहे, ते स्वास्थ्य जपण्यासाठी त्याने स्वतः च स्वत:ची काळजी घ्यायला हवी यासाठी जनजागृती हे या दिवसाचे वैशिष्ट्य.माणसाचे अनेक आजार हे आनुवंशिक असले तरी जीन्समुळे निर्माण होणाऱ्या या शक्यता म्हणजे बार भरलेली बंदूक आहे. मात्र या बंदुकीचा बार आपोआप उडत नाही, तिचा ट्रिगर दाबावा लागतो.तसेच आनुवंशिकता असली तरीही स्वास्थ्य बिघडण्यासाठी जीवनशैली हा ट्रिगर,चाप असतो. ती चुकीची असल्यानेच आजार होतात.हृदयविकार,डायबेटीस,मायग्रेन असे आजार टाळायचे असतील तर स्वतः च्या आहार-विहार आणि विचारांचा विचार करायला हवा. मजा करायला हवी पण ती किती करायची हेही ठरवायला हवे याची जाणीव करून देण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
(छायाचित्र : गुगल)
जंतुसंसर्ग होऊन आजार होऊ नयेत यासाठीही सेल्फ केअर महत्वाची असते. सध्याच्या साथीमध्ये तर ते जास्त महत्त्वाचे. एकतर स्वतः ची काळजी घेणे हा स्वार्थीपणा आहे असा काहीजणांचा गैरसमज असतो. तो दूर करणे हे देखील आजचा दिवस साजरा करण्याचे एक कारण आहे.शरीरं आद्य खलु धर्मसाधन। असे त्यागाचे महत्त्व सांगणाऱ्या भारतीय संस्कृती मध्येही सांगितले आहे.स्वास्थ्य हा आपला प्राधान्य क्रम, प्रायोरिटी असायला हवी हाच धडा गेल्या दीड वर्षातून माणसाने घेतला तर तो स्वतः ची जीवनशैली बदलू शकतो.त्यासाठी दिवसाचे नियोजन करताना केवळ मनोरंजनाचा विचार न करता व्यायामासाठी, साक्षी ध्यानासाठी वेळ ठेवू शकतो. तसा त्याने तो ठेवावा याची आठवण करून देण्यासाठी आजचा दिवस आहे.
(छायाचित्र : गुगल)
तर कशी घ्यायची स्वत:ची काळजी?
स्वास्थ्य राखायचे म्हणजे केवळ बरे वाटत नाहीसे झाले की औषधे घ्यायचे हे पुरेसे नाही. स्वतः ची काळजी घ्यायची म्हणजे आपल्या शरीर मनाशी संवाद साधायचा, त्या साठी वेळ काढायचा.चवीसाठी खायचे तसेच शरीरासाठीही जे योग्य ते खायचे.रोज शरीरातील सर्व सांधे हलवायचे, झोपेसाठी पुरेसा वेळ द्यायचा.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनातील भावना आणि विचार यांच्याकडे लक्ष द्यायचे.स्वतः च्या मनाचे स्वामी व्हायचे, मनाच्या लहरीनुसार न वागता, स्वतः ची जबाबदारी स्वीकारून योग्य आहार, व्यायाम आणि ध्यान यांचा संकल्प करायचा आणि तो पूर्ण करायचा. स्वत:साठी, स्वत:ची काळजी घेत एवढं तर करायला हवं.
( लेखक माइण्डफुलनेस ट्रेनर आहेत.)