Lokmat Sakhi >Mental Health > तुम्ही कधी कुणाला मनापासून सॉरी म्हंटले आहे? आपण चुकलो हे कबूल केलं आहे?

तुम्ही कधी कुणाला मनापासून सॉरी म्हंटले आहे? आपण चुकलो हे कबूल केलं आहे?

Is it Easy or Hard to Say Sorry and Forgive Someone : कुणी सॉरी म्हणालंच तर आपण करतो कुणाला माफ? आणि मागतो माफी मनापासून काही चुकलंच तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2023 12:51 PM2023-07-06T12:51:39+5:302023-07-06T12:52:49+5:30

Is it Easy or Hard to Say Sorry and Forgive Someone : कुणी सॉरी म्हणालंच तर आपण करतो कुणाला माफ? आणि मागतो माफी मनापासून काही चुकलंच तर...

Is it Easy or Hard to Say Sorry and Forgive Someone : Have you ever sincerely apologized to someone? Have you admitted you were wrong? | तुम्ही कधी कुणाला मनापासून सॉरी म्हंटले आहे? आपण चुकलो हे कबूल केलं आहे?

तुम्ही कधी कुणाला मनापासून सॉरी म्हंटले आहे? आपण चुकलो हे कबूल केलं आहे?

- गिरिजा मुरगोडी

अच्छा चलो जी बाबा माफ कर दो, बुरे दिनों का चक्कर है..

- फारसं न ऐकलेलं हे गाणं रेडिओवर लागलं होतं. उडत्या चालीचं. गमती-गमतीची मिश्किल छेडछाड असलेलं हे गाणं ऐकताना मजा वाटत होती. हे गंमतीचं 'चलो जी बाबा माफ कर दो' भावलंच मनाला. किती तरी वेळ तेच गुणगुणत राहिले मग. ' माफ कर दो', ' क्षमा कर', ' सॉरी चुकलंच माझं' हे दिसायला किती साधं सोपं वाटतं; पण उच्चारायला तितकंच कठीण. प्रियकर प्रेयसीमधला लटका रूसवा असेल, मनवणं असेल तेव्हाची गोष्ट वेगळी. ' अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना !' किंवा ' कसे तुज समजावू सांग..' 'अजुनी रुसूनि आहे..' या सर्वांतली अजिजी मनमोहकच. प्रेमी जीवाला मोहरुन टाकणारीही (Is it Easy or Hard to Say Sorry or Forgive Someone)!

(Image : Google)
(Image : Google)

पण एरवी दैनंदिन जीवनात, इतर अनेक नात्यांमध्ये ' सॉरी', 'क्षमा कर' हे शब्द पृथ्वीवरील सर्वात कठीण असल्यासारखेच! आणि 'असू दे.. होत असं कधी कधी विसरलेसुध्दा मी.' हे त्यावरचं उत्तर, आलेलं गढूळपण पटकन दूर करु शकणारं. पण तेही उच्चारणं का सोपं आहे? अंहं!

बायकांसाठी तर ते अधिकच कठीण. सगळं धरुन ठेवायचं, दाबून दडपून आत ठेवायचं. सगळे राग, रूसवे, समज, रोष, करुन घेतलेले ग्रह. किती किती काय काय. मोकळेपणाने बोलणं नाही. गाठी सोडवणं नाही.  कुढायचं. खंतावायचं. झुरायचं. मन:स्वास्थ्य बिघडवून घ्यायचं. गाठीवर गाठी बसत जातात. सगळा गुंता होऊन बसतो आणि हळूहळू तो सोडवणं जास्त जास्त कठीण होत जातं. साठणाऱ्या या सगळ्या नकारात्मक भावनांच्या कचऱ्याने मनाचा तळ भरुन जातो. आणि झुळझुळणारे सगळे निर्मळ प्रवाह अडून राहातात. असं सारखं होत राहिलं की कधी एकाकीपणानं, कधी निराशेच्या अंधारात रुतत जातं माणूस.  सुरुवात होते तिथेच रोखणं आपल्याच हातात असतं खरं तर.

क्षमा मागणं आणि क्षमा करणं दोन्हीसाठी मन मोठं असावं लागतं, करावं लागतं. कारण दोन्हीमध्ये पाऊल पुढे टाकतना प्रथम महाहट्टी 'मी' ओलांडावा लागतो. कोणत्याही नातातल्या गैरसमजाचं धुकं दूर करण्यात आड येणारा, सतत फणा काढून उभा असणारा 'मी' म्हणजेच अहंकार. तो ओलांडून पुढे जाता आलं तर निरामय निर्मळ झरे, प्रसन्न मोकळे आकाश, रंगबिरंगी फुलांसह लहरणाऱ्या बागा, त्या त्या नात्यात आणि जगण्यातही अनुभवता येतात.

माणसाचं आयुष्य ते केवढं. किती अनिश्चित कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं असं पण आपण वागत असतो असे की जसा काही अमरपट्टा घेऊन आलो आहोत! छोटे छोटे प्रसंग, छोटे छोटे समज-गैरसमज मनाच्या तळाशी घट्ट धरुन बसतो. काही गोष्टी सोडून देण्याची, त्याबद्दल माफ करुन टाकायची तयारीच नसते मनाची. त्याचा त्रास स्वत:लाही होत असतो. आणि त्याच्याशी निगडित व्यक्तीलाही. 

ना सहजपणे 'माफ कर' हे शब्द उमटतात, ना ' चलो माफ कर दिया' हे शब्द ओठी होतात.

(Image : Google)
(Image : Google)

माणूस आहे, चुका तर होणारच.. आपल्याकडून, समोरच्याकडून. लक्षात आलं/ आणून दिलं की थोडं थांबून स्वत:मध्ये डोकावून पाहिलं आणि चूक कबूल करुन क्षमा मागितली; शब्दातून, कृतीतून, डोळ्यातून, स्पर्शातून.. कशीही.. तर गोष्टी सोप्या होतातच. मात्र या सॉरी म्हणण्याला पुन्हा पुन्हा चूक न घडण्याच्या कृतीची, प्रयत्नांची जोडही महत्त्वाची. नाही तर ते नुसते फोल शब्दच ठरतील.

तितकंच महत्वाचं माफ करणं. राग, रोष यांची तीव्रता कधी कधी इतकी असते की माफी मागितली तरी ती स्वीकारलीच जात नाही. करणं तर दूरच. आमच्या कौटुंबिक स्नेह्यांच्या मुलीनं; तिच्या प्रेमविवाहाला आई-वडिलांचा आत्यंतिक विरोध असल्याने घरातून निघून जाऊन विवाह केला. काही दिवसांनी पतीसह ती नववधू आशीर्वाद घ्यायला आली असताना त्यांच्या रागाचा अक्षरश: विस्फोट झाला. अंगणातच तिला खूप घालून पाडून बोलले. घळाघळा रडत ती पुन्हा पुन्हा क्षमा मागत होती. पण त्या क्षणी रागाची धग इतकी होती की काळीज तुटलं तरी पोरीला आशीर्वाद तर दिला नाहीच पण आल्या पावली परत पाठवली. कालांतरानं नातवंडं झाल्यानंतर हळूहळू सगळं निवळलं. जाणं-येणं सुरु झालं. प्रेम माया लाभू लागली. पण त्याही वेळी थोडं समजूतीनं घेतलं असतं तर मधला जो अतिशय क्लेषाचा काळ गेला, त्यातला आत्यंतिक तणाव टाळता आला नसता का? पण संतापाचा ज्वालामुखी धगधगत असताना सारासार विचार हरवून जातो हेच खरं.

कधी कधी माफी मागितली तरी मनाला लागलेली टोचणी पूर्ण नाहीशी होत नाही. आणि माफ केलं असलं तरी ती सल, तो व्रण पूर्ण पुसला जात नाही. कधी कधी गेलेला तडा पूर्ण सांधलाही जात नाही. पण समजून घेणं, टोकाला जाण्यापासून रोखलं जाणं एवढं तरी घडून थोडी तरी शांती लाभेल. काही माणसं मात्र स्वभावत:च सोडून द्यायचं, खटकलं तरी मनात ठेवायचं नाही, पटलं नाही तरी मनावर घ्यायचं नाही, क्षमा मागण्याची गरज भासू द्यायची नाही आणि ती मागण्याआधी करुनच टाकलेली असते अशा वृत्त्तीची असतात. आतूनच शांत, समाधानी असणं त्यांचा सहजभाव असतो.

अलिकडेच वाचलेल्या बा.भ. बोरकरांच्या ओळी आठवतात.
'कशास नसत्या चिंता खंती, वेचू पळती सौम्य उन्हे
तिमिर दाटता बनुनि चांदणे, तीच उमतील संथपणे
सले कालची विसरुनि सगळी भले जमेचे जीवी स्मरु
शिशुहदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करु'

या ओळी ओळी मधून जीवनतत्वंच सांगितली आहेत जणू. नसत्या चिंता करत, खंती बाळगत समोर असलेले छान अनुभव दूर का लोटायचे? आणि खरंच, उणिवा मोजण्यापेक्षा जे जे लाभत गेलं त्याची जाणीव स्वत:ला करुन देत राहिलं तर सगळं जग नव्यानं सुंदर भासू लागेल. मनावरची नको त्या गोष्टींची पुटं गळून पडली तर बालकाच्या निर्मल दृष्टीनं जग पाहू शकू, प्रेम करु शकू.

(Image : Google)
(Image : Google)

 इतर कोणासाठी नव्हे तर स्वत:च्या मन:स्वास्थ्यासाठी क्षमाशील होणं आवश्यकच. कोणाहीबद्दलचा कडवटपणा, आकस, घड्न गेलेल्या गोष्टींबद्दल राग मनात ठेवण्याचा त्रास स्वत:ला जास्त होतो खरं तर. पुन्हा पुन्हा मन त्या विचारांच्या आवर्तात गरगरत राहातं. पुन्हा पुन्हा त्रस्त होत रहातं. आणि स्वास्थ्य बिघडवून घेतं. मनाचं, शरीराचं. संवादाचे सेतू या सर्वातून पार नेऊ शकतात. क्षमाशील वृत्तीचा माणूस, शांत, समाधानी, संवादसन्मुख आणि नदीच्या संथ प्रवाहासारखा आश्वासक असतो. असा सह्दया सुहद जवळचा वाटतो.

परवाच कोणीतरी म्हटलं की, या आठवड्यात जागतिक फरगिव्हनेस डे आहे. त्या त्या गोष्टींचं महत्त्व समजण्यासाठीच असे कोणकोणते दिवस साजरे केले जातात ना.. मग या दिवशी, ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत काहीतरी चुकलं अशा खंती, मन खात असतील त्या सर्वांना आवर्जून म्हणूया, ' अच्छा चलो जी बाबा माफ कर दो..!' आणि ज्यांना ज्यांन आपल्याला बाबतीत असे म्हणायचेय पण जमत नाहीये त्यांना आधीच म्हणून टाकूया. ' अच्छा चलो माफ कर दिया!'

 

Web Title: Is it Easy or Hard to Say Sorry and Forgive Someone : Have you ever sincerely apologized to someone? Have you admitted you were wrong?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.