तुमच्याकडे फेसबूकवर एखादी क्विझ येते. तुम्ही मागच्या जन्मी कोण होता, तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे, तुमच्या जन्मतारखेवरुन स्वभाव सांगतो अशा अनंत प्रोफाइल क्वीझ. तुमचे मित्रमैत्रिणी त्या लिंक क्लिक करतात. मग तुम्ही पण करता. चार घटका विनोद, मनोरंजन होते. तुम्ही विसरुन जाता. पण या साऱ्यातून आपल्या प्रायव्हसीचा जास्तच खेळ होतो हे तुमच्या लक्षात येतंय का?
ते अँप किंवा गेम, क्विझ नेक प्रकारच्या परवानग्या मागतं. आपणही देऊन टाकतो. या परवानग्या दिल्या नाही, तरीही एकदा अँप डाउनलोड केलं की त्या अँपला आपल्या फोनमध्ये, लॅपटॉप किंवा डेस्क टॉपमध्ये जागा मिळते. आणि मग आपली खासगी माहिती ही अँप्स सहज मिळवू शकतात. मिळवतातही. माणसांच्या वैयक्तिक माहितीला आताच्या घडीला सगळ्यात जास्त किंमत आहे. त्याची खरेदी विक्री मोठ्याप्रमाणावर चालते. आपण आपल्याही नकळत आपली सगळी माहिती अँप्सच्या माध्यमातून विविध कंपन्यांना देऊ करतो.
आपली खासगी माहिती, फोटो, व्हिडिओ, लोकेशन असा कशाकशाचा ॲक्सेस आपण देऊन बसतो याची आपल्याला कल्पनाही नसते. आपण आपल्या फोनची दारं अशी सताड अजिबात उघडू नयेत. मुळात या क्विझ आपल्याला अत्यंत फालतू गमतीशीर दिसत असल्या तरी त्यांचा उद्देश लोकांची माहिती गोळा करणे, त्यांच्या डेटाचा ॲक्सेस मिळवणे हाच असतो.
(Image : Google)
करायचं काय?
१. मुळात अनावश्यक लिंक, क्विझ ओपनच करु नका.
२. सगळे असे गमतीशीर मोह टाळा, अजिबात क्लिक करू नका.
३. प्रायव्हसी सेटिंग बदला सांगणारे क्विझ घेऊ नका.
४. आणि चुकून घेतलेच तर आपले पासवर्ड बदला.
५. सोशल मीडीयामुळे तसेही आता खासगी काही राहिलेले नाही. पण तरीही होता होईतो काळजी घ्याच.