Join us  

बाईपण भारी अवघड देवा! तुम्ही स्वत:ला सुपर वूमन समजता की तसं प्रेशर आहे तुमच्यावर?

By सायली जोशी-पटवर्धन | Published: July 08, 2023 9:50 AM

Is It Women's Choice to Be Super Women or Its Pressure on her : सुपर वूमन व्हायचं असं बायका स्वत: ठरवतात की त्यांनी तसं व्हावं म्हणून त्यांच्यावर सामाजिक प्रेशर असतं? त्यानं नेमकं बिघडतं काय?

सायली जोशी-पटवर्धन

‘मी चार दिवस नसले तर घराचा पार उकीरडा होऊन जातो. मी नसले तर काय होईल या माणसांचं!’ असं बायका कधी रागानं म्हणतात कधी प्रेमानं. चार दिवस सोडा एक दिवस मैत्रिणींचं गेट टूगेदर करायचं तर मुलांच्या शाळा ते घरातलं काम ते सासूसासऱ्यांना डॉक्टरकडे नेणे ते ऑफिसात मिटिंग अशी एका ना अनेक कारणं सांगतात. ती कारणं खोटी नसतात पण एवढं सगळं करुन स्वत:साठी आपण जगलोच नाही अशी भावना घेऊन जगतात. रडतात-कुढतात की कुणाला आपली कदरच नाही. मात्र तरीही सगळा संसाराचा गाडा स्वत: एकटीनं ओढायचा प्रयत्न करतात. असं का व्हावं? ‘सुपर वूमन’ होण्याचा आणि परफेक्टच असण्याची ही भावना बायकांमध्ये कुठून आली? कुणी निर्माण केली? मुळात आजही वाटतं का बायकांना की आपण सुपर वूमन व्हावं? की त्यांना मान्य आहे चुकणं, बिघडणं आणि काही गोष्टी न करणं (Is It Women's Choice to Be Super Women or Its Pressure on her)..

चर्चा तशी नेहमीची असली तरी जुनी नाही.

घरोघर आजही नोकरी करणाऱ्या न करणाऱ्या महिलांचं बघा काय होतं? आपण करतो म्हणून हे सगळं वेळच्या वेळी नीट होतं ही भावना सुखावणारी असली तरी एका पॉईंटला ही गोष्ट आपल्याला मनाने, शरीराने आणि मेंदूला थकवणारी असते हे लक्षातच येत नाही. घरातील रोजच्या गोष्टी, नोकरी किंवा व्यवसाय, सगळ्यांची आजारपणं, सणवार, लग्नकार्य या सगळीकडे धावताना सगळेच परफेक्ट कसे जमेल? पण ते जमवण्याचा आग्रह असतोच. अगदी दूध तापवण्यापासून ते विरजण लावून त्याचे तूप करण्यापर्यंत आणि घरातल्या चटण्या, खाऊचे डबे भरुन ठेवण्यापर्यंत सगळी जबाबदारी आपलीच असते असं अनेकदा वाटतं, ते कशाने? घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ ठेवण्यापासून ते प्रत्येकाच्या कपड्यांची कपाटं आवरण्यापर्यंत सगळी कामं स्वत:वर ओढवून घेतलेली असतात ती का? आणि हे करताना मनाला जो थकवा येतो त्याचा विचार कोण करणार?

(Image : Google)

समुपदेशक मानसी तांबे म्हणतात, विचारा स्वत:ला आपण आनंदी आहोत का?

आपण अनेकदा आजुबाजूच्या लोकांच्या अपेक्षांचं ओझं वाहत राहतो. ते वाहत असताना आपल्याला होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासांकडेही आपण दुर्लक्ष करतो. स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तर आपणच आपल्याला कमी लेखणे, मानसिक खच्चीकरण करुन घेणे आणि मनात एकप्रकारचा न्यूनगंड बाळगणे असे चक्र सुरू राहते. हे टाळण्यासाठी आपले सामर्थ्य तसेच आपल्या मर्यादाही आपल्याला माहित हव्यात. त्या ओळखूनच आपण स्वत:कडून अपेक्षा ठेवायला हव्यात. म्हणजे अवास्तव अपेक्षा न होता आपल्याला गोष्टी मॅनेज होणे सहज शक्य होईल. आपण एकदा स्वत:चा आहे तसा स्वीकार केला की इतरांनाही त्याची जाणीव करुन द्यायला हवी आणि आपली तुलना, अपमान होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी. सुपर वूमन म्हणजे सतत सगळ्यांसाठी धावणारी नाही तर आपली ताकद-मर्यादा ओळखून त्याची योग्य ती सांगड घालून निरोगी शारीरिक-मानसिक आरोग्य जपत स्वत:ला आणि इतरांना आनंदी ठेवणारी महिला होय.

बाईच्या श्रमाचं मोल कोण करणार? विचारतात, स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे..

सुपर वूमन होणं ही कोणत्याही महिलेची इच्छा नसते तर ते तिच्यावर लादलं जातं. तशा प्रकारचा दबाव महिलांवर टाकला जातो. महिलांना सतत एकप्रकारचा गिल्ट सतत दिला जातो. विशेषत: नोकरी करणाऱ्या महिलांच्या बाबतीत सतत तुझं घर पसरलेलं असतं, तुझ्या मुलांना चांगल्या सवयी नाहीत, तू मुलांचा अभ्यास घेत नाहीस असं सतत बोललं जातं. तू महिला आहेस त्यामुळे तुला जास्त पैशांची काय गरज, तू कुठे जास्त वेळ थांबून, अमुक जबाबदारी घेऊन काम करतेस? तुला तुझी वेळ झाली की घरी पळायची घाई असते असे टोमणे ऑफीसमध्ये सतत मारले जातात. म्हणजे दोन्हीकडून तिला सतत काही ना काही ऐकावं लागतं. अनेकदा असं काही ऐकावं लागू नये म्हणून ही महिला स्वत:ला स्ट्रेच करते आणि त्यात तिची आणखी कुचंबणा होत जाते. त्यामुळे हे सुपर वूमन होण्याचं प्रेशर महिलेवर सतत बिल्ट केलं जातं.

गृहिणी असलेली महिलाही अनेक पातळ्यांवर लढत असते आणि मल्टीटास्किंग करुन ती सतत स्वत:ला सिद्ध करत राहते. अनेकदा ती मल्टीटास्कींग करणारी आहे म्हणून तिचं कौतुकही केलं जातं, जे महिलांना आवडतं आणि म्हणून त्या जास्तीत जास्त जबाबदाऱ्या एकावेळी आपल्या खांद्यावर घेऊन त्या निभावत राहतात, मात्र ते चुकीचे असून त्याचा तिला त्रास होतो. मात्र टोमणे मारुन किंवा कौतुक करुन तिच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे ओझं लादणं हे चूकच आहे. महिला या चक्रात अडकल्या जातात आणि शेवटी फसतात. नाईलाज असल्याने त्या बऱ्याच गोष्टी ओढून ताणून करत राहतात, पण ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. बाईच्या फुकट श्रमांवर लग्नसंस्था आणि कुटुंब संस्था टिकून आहे.

सुपर वूमन सिंड्रोम म्हणजे काय?

कौटुंबिक , व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचं ओझं एकाच वेळेस वाहाणाऱ्या महिलांना सुपर वूमन सिंड्रोम होतो. सर्व प्रकारच्या कामांमध्ये या महिला इतक्या गुंतलेल्या असतात की स्वत:साठी थोडाही वेळ काढू शकत नाहीत. कामांच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यानं , त्यातून होणाऱ्या धावपळीमुळे एकही काम धड होत नाही. ठरवलेलं उद्दिष्ट्य साध्य होत नाही. अशी परिस्थिती ज्या महिलांच्या बाबतीत निर्माण होते त्या महिलांना सुपर वुमन सिंड्रोम ग्रासतो. प्रसंगी महिलांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर त्याचा परीणाम व्हायला लागतो. जे त्यांच्यासाठी अजिबात हिताचं नसतं. सुपर वुमन सिंड्रोम निर्माण होण्यास छोटी मोठी कोणतीही गोष्ट कारणीभूत ठरते. एकदा का हा सुपर वुमन सिंड्रोम निर्माण झाला आणि त्याकडे दुर्लक्ष झालं तर चिंता, नैराश्य या मानसिक समस्याही निर्माण होतात. अशा परिस्थितीत महिला प्रत्येक गोष्टीला स्वत:लाच जबाबदार मानतात. स्वत:चा दोष नसला तर प्रत्येक चुकीच्या गोष्टीला स्वत:लाच दोष राहातात.

सुपर वूमन सिंड्रोम मधून बाहेर पडायचं तर..

(Image : Google)

१. स्वत:चा स्वीकार करायला हवा, आपल्या मर्यादा आपण मान्य कराव्यात.

२. आपण नेहमी १०० टक्केच देऊ ही अपेक्षा करणं अवास्तव आहे

३. आपल्याकडून चूक होऊच शकत नाही असं वाटणं, हेही स्वत:कडून खूप जास्त अपेक्षा ठेवणं आहे.

४. लहान मोठ्या गोष्टींवरुन स्वत:वर शिक्कामोर्तब करणं योग्य नाही. 

५. सतत सगळ्या पातळ्यांवर परफेक्ट असण्याचा अट्टाहास न करणं. 

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइल