-वंदना अत्रे
दुसऱ्या लाटेचा जीवघेणा तडाखा उग्र होऊ लागला तेव्हाची गोष्ट. कोणी तरी प्रियजन गमावल्याची बातमी देणारा एक तरी फोन दिवसातून यायचा. मावळत्या संध्याकाळी गच्चीवरील छोट्याशा बागेत बसून आसपासची हलणारी नारळाची झाडे बघताना रोज एकच विचार मनात यायचा. आजही आपण वाचलो, जगण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला. अशावेळी आकाशातील एखाद्या ढगाच्या आडून डोकावणाऱ्या किरणांच्या आड मला त्याचा चेहरा दिसायचा. मिश्कीलपणे हसणारा...! जन्म- मरणाच्या अरुंद टोकदार धारेवर आपले आयुष्य सततच उभे असते; पण त्याची तीव्र जाणीव या काळात झाली. या जाणिवेने ओळख करून दिली कृतज्ञ भावाची...!
कृतज्ञता मला निरोगी राहण्यासाठी साथ देणाऱ्या शरीराबद्दल. या शरीराच्या आरोग्याचा तोल सांभाळणाऱ्या पंचमहाभूतांबद्दल. ही जाणीव तुम्ही कधी अनुभवली आहे? कधी स्वस्थ बसून आपल्याच शरीराच्या कारभाराकडे बारकाईने बघितले आहे? अन्नाचे पचन करून त्यावर कित्येक गुंतागुंतीच्या प्रक्रिया करणारे, दिवसभरात हजारो संदेशांची मेंदूबरोबर देवाण-घेवाण करणारे, एका वेळी कित्येक आघाड्यांवर काम करीत राहणारे आणि त्याची जाणीवही करून ना? देणारे हे शरीर नावाचे अद्भुत यंत्र, तेही एक छदाम ना? मोजता मिळालेले...! कधी मनोभावे कृतज्ञ होऊन त्याचे आभार मानले आहेत?
शरीर आपलेच मग आभार मानणारे आपण वेगळे कसे? पण तरीही मनात त्याची जाणीव तर हवी ना? भोवताली आपल्या आसपास हाकेच्या अंतरावर संसर्गाच्या लाटा येऊन माणसांना गिळत असताना आपल्याला जराही स्पर्श न करता ती लाट कशी आणि का निघून गेली, हा प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे? मी स्वतःला कित्येकदा विचारला, विचारीत राहिले..! अशा वेळी आपले रक्षण करणाऱ्या शरीराच्या प्रतिकारशक्ती नावाच्या कवच-कुंडलांची जाणीव प्रकर्षाने झाली आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या शरीराबद्दल मनभरून कृतज्ञ भाव ओसंडून आला. डोळ्यात पाणी आणणारा हा भाव गेल्या महिन्या-दीड महिन्यात वारंवार अनुभवला आणि त्यानंतर ज्याच्याबद्दल कृतज्ञ राहावे अशा कित्येक गोष्टी भोवताली दिसू लागल्या... आजवर दुर्लक्षित राहिलेल्या!
भीष्मराज बाम सरांच्या सत्रांमध्ये ते कित्येकदा टीम आणि टीम स्पिरिट याबद्दल बोलायचे. टीम ही फक्त क्रिकेटच्या किंवा फुटबॉलच्या मैदानावर असते, असा आपण समज करून घेतला आहे. प्रत्यक्षात आपल्या प्रत्येकाच्या जगण्यात आपली म्हणून एक टीम असते, जिचा आपण कधी विचारही करीत नाही. आपल्या सुखरूप राहण्यात कुटुंबातील माणसांचा मोठा वाटा असतो, असे आपण मानत असतो. कारण ती आपल्या अवतीभोवतीच असतात. मुद्दाम लक्ष देऊन बघितले, तर आपल्या निर्वेध जगण्यासाठी मदत करणारी कितीतरी माणसे आपल्याला परिघावर उभी दिसतील. ज्यांच्याकडे सहसा आपले लक्षच जात नाही, मग कृतज्ञ असणे दूर राहो...! घरात काम करणारी मोलकरीण- स्वयंपाक मावशी, कचरा नेणारा बिल्डिंगचा रखवालदार, दूध-पेपर घरपोच देणारी माणसे, कोपऱ्यावरचा भाजीवाला, नाक्यावरचा किराणा दुकानदार, असे कित्येक...! आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचा कृतज्ञ भाव कधी त्यांच्याकडे व्यक्त केलाय?
कोरोनाने बदलून टाकलेल्या जगात आपल्याला अनेक गोष्टी नव्याने कराव्या लागणार आहेत. त्यातील एक गोष्ट असेल, रोज स्वतःच्या शरीराला आणि अशा माणसांना कृतज्ञतेने नमस्कार करण्याची! आपल्या भटकण्यात आपल्याला साथ देणारे पाय, कित्येक कामांमध्ये सहभाग देणारे हात, डोळे, कान, मेंदू, रसाळ चवींची जाणीव देणारी जीभ आणि दात, मान-पाठ... डोक्यापासून पायापर्यंत या शरीराबरोबर मनाने काही सेकंद प्रवास करा आणि आभार माना त्याचे, रोज!
कृतज्ञ भाव मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. महत्त्वाची बाब म्हणजे, सकारात्मक ऊर्जा आणि आपली प्रतिकारशक्ती यांचे फार जवळचे नाते आहे. नैराश्य शरीराच्या प्रतिकारशक्तीला दुबळे करून टाकत असतो, हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे...!
तर या बदललेल्या जगात, तुम्हाला ज्यांना-ज्यांना thank you म्हणावेसे वाटते, त्याचे एकेक नाव कुटुंबातील प्रत्येकाने घरात असलेल्या व्हाइट बोर्डवर लिहायला हरकत नाही! मनातील भाव जाहीर करून बघण्याचा हा प्रयोग खरच एकदा करून बघाच. तुमच्या भोवतालचे सगळे जग बदलून जाईल, अधिक आनंदी असेल ते...!
(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)
vratre@gmail.com