अश्विनी बर्वे
घराबाहेर पडून जग बघण्याची इच्छा आपल्यातल्या बहुतेकांना असते. बघा ना लॉकडाऊनमध्ये मध्ये आपल्याला घरी थांबावं लागलं,पण मग भाजी घेण्यासाठी, किराणा घेण्यासाठी आपण गर्दी केली. तुम्ही म्हणाल, “अहो त्या गरजेच्या वस्तू आहेत,त्यासाठी पण आम्ही बाहेर पडायचं नाही का?” अगदीच गरजेसाठी,महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायलाच हवं. पण आपण ठिकठिकाणच्या पर्यटन स्थळावर गर्दी करतो आहे त्याचं काय मग? तुमचं म्हणणं बरोबर आहे, इतक्या दिवस घरात कोंडून ठेवल्यामुळे माणूस असं करू शकतो. आणि तुम्ही मला हे ही सांगाल की, केल्याने देशाटन,अंगी येई शहाणपण.” पण अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण पाहिल्याच नाहीत. त्या अगदी आपल्या समोर,घराच्या अंगणात आहेत. सगळ्यात सुंदर अशा आपल्या आसपासच्या गोष्टींबद्दल आपण एवढे बेफिकीर असतो की विचारू नका.
(Image : Google)
मी नुकतीच नजिम हिकमत यांची एक नज्म वाचली. ते म्हणतात..
सबसे खुबसुरत है वह समुद्र
जिसे अबतक देखा नही हमने
सबसे खुबसूरत बच्चा
अबतक बडा नही हुआ
सबसे खुबसूरत है वे दिन
जिन्हे अबतक जिआ नही हमने
सबसे खुबसूरत है वे बातें
जो अभी कहीं जानी है!
तुम्ही म्हणाल, की अहो आम्ही पण हेच म्हणतो आहे की,कितीतरी गोष्टी बघायच्या राहिल्या आहेत. पण मला वाटतं की, पृथ्वीवर ज्या ज्या सुंदर गोष्टी आहेत,त्या जाणून घेण्यासाठी पृथ्वी पालथी घालायची गरज नाही. आणि हो डोळे बंद करून घ्यायची गरज नाही. तर आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या आवाक्यातील गोष्ट जाणून घ्यायची. निसर्गातील अनेक गोष्टी बघत त्यातून शिकणे आपल्या हातात आहे हे मला सांगायचं आहे.
हे बोलत असतांनाच मला रविंद्रनाथ टागोर आठवले...
“अगदी तेच शब्द नाही पण तरी साधारण असे की, आपल्या परसातील दवबिंदू पहा, त्यांच्यात सारं आकाश सामावलं आहे. आपण सगळीकडे जातो पण आपल्या जवळच्या झाडावर आलेले दवबिंदू आपण पहात नाही.” मी खरंच माझ्या बाल्कनीतल्या झाडावरचे दवबिंदू बघितले. त्यांचे औट घटकेचे सौंदर्य बघितले. आणि मुख्य म्हणजे आभाळाला कवेत घेण्याची त्यांची वृत्ती मला दिसली आणि माझे डोळेच उघडले. मस्त वाटलं मला.
आपलं मन असं निरभ्र,निर्मळ आहे.
एखाद्या गोष्टीचा अर्थ इतरांनी सांगण्यापेक्षा आपला आपल्याला कळला की वेगळंच वाटतं नाही?