मानसी चांदोरीकर
सध्या आपण ज्या पद्धतीची जीवनशैली जगत आहोत, त्या जीवनशैलीमध्ये आपण स्वतःला हरवत चाललो आहोत, स्वतःची ओळख विसरत चाललो आहोत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतःची "मनःशांती" गमावू लागलो आहोत. मनःशांती या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे "ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्या मनाला शांतता मिळते, आनंद मिळतो, समाधान मिळते, त्याला मनःशांती असे म्हणतात. "मानसशास्त्र असे सांगते की, ज्या माणसाचे मानसिक आरोग्य उत्तम असेल तो मनुष्य आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरा जाऊ शकतो. मन:शांती ही प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. पण सध्याच्या काळात पैशाच्या मागे, सुखसुविधांच्या मागे धावताना आपण नेमकी ही मनःशांतीच गमावत चाललो आहोत. कशी मिळवावी ही मनःशांती? काय गरज आहे या मन:शांतीची? हे जाणून घेऊया (Know How To be mentally Peaceful)..
तिला कसला आलाय मानसिक आजार, नाटकं करते नुसती..! - सर्व्हेचा दावा, महिलांना कुटुंबच देते त्रास
जेव्हा आपले मन शांत असते, समाधानी असते तेव्हा आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. यासाठी आपण समाधानी असणे फार गरजेचे असते. समाधानी असलो की मनःशांती ही आपोआपच मिळते. जर आपण सतत पैशाच्या मागे धावत राहिलो, दुसऱ्यापेक्षा स्वतःला वरचढ सिद्ध करण्यासाठी स्पर्धेत वाटेल त्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपण सतत अस्वस्थच राहतो. कारण अशा परिस्थितीत आपल्याला कितीही मिळाले तरी समाधान नसते आणि पर्यायाने "मनःशांती"..
मनःशांती हवी असेल तर..
1) प्रथम स्वतःला ओळखा. "स्व" ची ओळख करून घ्या. अर्थात माझ्याकडे कोणते चांगले गुण आहेत? आणि माझ्या मर्यादा कोणत्या आहेत? त्या एकदा समजल्या की मग आपण आपले ध्येय निश्चित करू शकतो आणि त्या दृष्टीने प्रवास करू शकतो.
2) या प्रवासात इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा केली आणि ती क्षमता व मर्यादांचा समतोल साधून केली तर आपली मन:शांती कधीही ढासळणार नाही.
3) आपण अयोग्य स्पर्धा टाळून योग्य मार्ग निवडला तर आपल्याला "मनःशांती" आपोआपच मिळेल.
4) ही मनःशांती मिळवण्यासाठी रोज थोडेसे "प्राणायाम" करणे, "ओंकार" म्हणणे, काही काळ स्वतःपुरता देऊन "स्वचिकित्सा" करणे, स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहणे आणि स्वतःसाठी काही काळ आनंदात घालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आपण आपली गमावलेली "मन:शांती" पुन्हा मिळवू शकतो.
पावसाळी कुंद वातावरणातही आनंदी राहायचं तर करा फक्त ५ गोष्टी, मनावरचे मळभ होईल गायब
5) आपण जर हे प्रयत्न केले नाहीत आणि स्पर्धेत शांत मनाने उतरू शकलो नाही तर आपण ताणतणाव, मानसिक समस्या, आक्रमक वर्तन, यासारख्या अनेक गोष्टींना अगदी सहज बळी पडतो. म्हणूनच "मनःशांती जपा आणि आनंदी राहा."
(लेखिका समुपदेशक आहेत)
संपर्क - 8888304759
इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com