Lokmat Sakhi >Mental Health > राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं?

राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं?

आपल्या भावना समजून घेतल्या की इतरांच्याही भावना ओळखू येतात, त्या समजणं अनेक गोष्टी सोप्या करतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 PM2021-03-25T16:27:41+5:302021-03-25T16:31:39+5:30

आपल्या भावना समजून घेतल्या की इतरांच्याही भावना ओळखू येतात, त्या समजणं अनेक गोष्टी सोप्या करतं.

know your emotions, why you react, how your body reacts, here are the answers.. | राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं?

राग आला की ताडताड बोलतो, इमोशनल होवून वाट्टेल ते करतो, आपलं असं का होतं?

Highlightsआपण  आपल्या भावना समजून घेतल्या तर आपल्या बोलण्या-वागण्याची उत्तरं सापडत जातील.

- डॉ. संज्योत देशपांडे

परीक्षा सुरू व्हायला काही अवधीच होता. पण रूपालीचा घसा सतत कोरडा पडायला लागलाय, अशी तिला जाणीव होऊ लागली. उपजत गोड आवाज-सुरेल गळा अशी देणगी लाभलेल्या रूपालीला गाण्यात करिअर करावंसं वाटत होतं.. त्यासाठी तिनं यात प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिच्या गावात याची सोय नव्हती म्हणून त्यासाठी ती शहरात आली. पण परीक्षा आली की, तिचं काहीतरी बिनसून जात असे. मित्र-मैत्रिणी-नातेवाईक यांच्या घोळक्यात बुडणारा तिचा आवाज अगदी मिटून जात असे. ऐकणाऱ्या लोकांमध्ये गाण्यातली कोणी नामवंत व्यक्ती आहे असे समजलं की त्याचा तिच्या गाण्यावर परिणाम होत असे. तिच्या घशात अचानक खरखर-कोरड पडत असे. या सगळ्यामुळे आपण कधी गायिका बनूच शकणार नाही का हा विचार सतत तिच्या मनात साशंकता निर्माण करत असे.
‘तू उगाच आमच्यामध्ये पडू नकोस, आम्ही आमचं बघून घेऊ’ रोहन वैशालीला असं म्हणाला आणि वैशाली  खूपच दुखावली गेली. रोहन आणि वैशाली एकमेकांचे खास दोस्त. त्यांची अगदी घट्ट मैत्री. विशाल त्यांचा असाच जवळचा मित्र. काही कारणानं रोहन आणि विशालचं भांडण झालं. ते थोडंसं विकोपाला गेलं म्हणून वैशाली समजूत घालायला गेली तर रोहननं तिला चक्क उडवून लावलं. तिची काहीही किंमत नसल्यासारखं. वैशाली मनातून दुखावली गेली आणि एकदम गप्पच झाली.


आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशा अनेक छोटयामोठ्या घटना असतात आणि त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर, बोलण्यावर होत असतो.कधी आपण दुखावले जातो तर कधी आपल्याला राग येतो. कधी मन नैराश्यानं भरून जातं. तर कधी चिंतेचं काहूर मनावर पसरत जातं. कधी अपराधीपणाची भावना मनाला टोचत राहते. तर कधी वैफल्याची भावना मनाला पकडून राहते. रागाच्या भरात आपण कुणाला तरी काहीतरी बोलतो नाहीतर आतल्या आत धुमसत राहतो. चिंतेनं अस्वस्थ होतो. दु:ख झालं की स्वत:मध्ये मग्न राहतो. नैराश्य आलं की ऊर्जा संपल्यासारखे बसून राहतो. नैराश्य आलं की विनाकारण चिडचिड करत राहतो..
म्हणजेच आपल्या जगण्यात आपण विविध प्रकारच्या भावनांना सामोरे जात असतो. विविध प्रकारच्या भावना अनुभवत राहतो आणि त्याचा आजच्या वागण्यावर-बोलण्यावर परिणाम होतो. म्हणजेच आपल्या कोणत्याही कृतीमागे भावना या गोष्टीची ऊर्जा असते. आपल्या कृतीच्या मागची ताकद, आपल्या वागण्यावर, बोलण्यावर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे भावना.. या भावना खरंतर असतातच. अगदी लहानपणापासूनच आपल्या मनाच्या अंतरंगातला-जडणघडणीतला महत्त्वाचा भाग म्हणजे भावना..


भावना म्हणजे काय? कल्पना करा या भावनाच नसत्या आपल्या आयुष्यात तर काय? झालं असतं? आपलं जगणं कदाचित खूप यांत्रिक झालं असतं. रंगहीन झालं असतं. आपल्याला जे काही वाटत असतं, जाणवत असतं, ते कदाचित संपलं असतं. आणि कोणत्याच गोष्टीने कसलाच काहीच फरक पडला नसता. आपल्याला आनंद झाला नसता, प्रेम वाटलं नसतं, राग आला नसता, आपण कुणावर रुसलो नसतो. या भावना आहेत म्हणून आपल्याला काही वाटत राहतं. जाणवत राहतं म्हणजेच भावना ही एका अर्थानं आपल्या आत घडणाऱ्या किंवा बाहेर वातावरणात घडणाऱ्या घडामोडींना दिला जाणारा प्रतिसाद आहे. मला परीक्षेत कमी मार्क मिळाले तर ही मनात घडणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे माझ्या मनात ती भावना निर्माण होते ती चिंतेची आहे.
 परीक्षेचा निकाल लागला आणि मला खूपच कमी गुण मिळाले ही बाह्य जगात घडणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे माङया मनात निर्माण होणारी भावना नैराश्याची आहे. म्हणजेच भावना हा एक प्रकारचा प्रतिसाद आहे. माझ्या मनात किंवा बाहेर घडणाऱ्या घडामोडींना (ज्या मला महत्त्वाच्या वाटतात) दिला जाणार प्रतिसाद! भावना या आपल्या जगण्यात उपजत असतात. आपण अगदी माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात वाकून पाहिलं तर या भावनांचं अस्तित्व आपल्याला जाणवेल. माणूस जसजसा प्रगत होत गेला तसतसा कदाचित त्या भावनांमध्येही फरक पडत गेला, पण आदिमानवाच्या काळात माणूस जंगलात रहात असताना या भावनांमुळेच जगण्याची उत्तरं शोधत गेला. या लढ्यात जिवंत रहाण्याची ऊर्मी, स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची धडपड या पाठीमागे भावनाच कार्यरत होत्या. माणसाचा हा लढा काळानुरूप जीवन मरणाशी निगडित न राहता वेगळ्या गोष्टींसाठी बदलत गेला. आजही आपण धडपड करतो, झगडत राहतो याही पाठीमागे भावनाच आहेत.
म्हणजेच भावना ही एका प्रकारे आपल्या जगण्यातली ऊर्जा आहे. या भावनांच्या राज्यात आपण असेच काही समानार्थी शब्द वापरत असतो. ‘मूड’ ‘फिलिंग्ज. म्हणजे वाटणं. ‘काय आज मूड बरा दिसत नाही तुमचा?’ ‘सकाळपासून मूडच गेला माझा..’ असं काहीसं आपण नेहमीच बोलत असतो.. किंवा ‘त्याचा ना सारखा या ना त्या कारणानं पापड मोडतो..’ (म्हणजे सारखा मूड जातो) असे बरेचसे वाक्प्रचार आपण जेव्हा मूडबद्दल बोलतो तेव्हा वापरत असतो. भावना ही जसा प्रतिसाद त्यावेळी त्या क्षणाला जाणवणारी, काही थोडा काळ टिकणारी गोष्ट असेल; तर मूड मात्र बराच काळ राहणारी गोष्ट आहे. जसं की, आज दिवसभर माझा मस्त मूड होता’ पण मूड या गोष्टीची तीव्रता मात्र भावनेपेक्षा कमी असते.
भावनाचं एक खासगी स्वरूप म्हणजे वाटणं असंही म्हणायला हरकत नाही.
पण भावना म्हटलं की, त्यात नुसतंच काहीतरी वाटणं असतं किंवा तो प्रतिसाद असतो असं नाही. भावनांमध्येही अनेक गोष्टी अंतभरुत असतात.
1) वैचारिक विचारांच्या पातळीवर केलं जाणारं मूल्यमापन जे घडलं ते चांगलं की वाईट? चूक की बरोबर? मला ते आवडलं आहे की नाही?
2) शारीरिक पातळीवर दिला जाणारा प्रतिसाद/संवेदना : कोणत्याही भावनेमुळे शारीरिक पातळीवरही काही बदल होत राहतात. उदा. भीतीनं हृदयाची धडधड वाढते, घाम फुटतो, रागाने मुठी आवळल्या जातात. प्रेमाने शरीरात उत्तेजना निर्माण होते.
3) कृती : कोणत्याही कृतीच्या पाठीमागे काही भावना असते. उदा. राग आला म्हणून हातातली वस्तू फेकून दिली..
4) भावनांची अभिव्यक्ती : आपण सर्व जण आपल्या कळत नकळतपणो चेहऱ्यावरील हावभावातून शारीरिक हालचाली व भावना व्यक्त करत राहतो.
5)  भावना खऱ्या अर्थाने खोलवर समजून घ्यायची असेल तर तिचा या सर्व पातळ्यांवर विचार करायला हवा. आपल्याला सर्वानाच बऱ्याचदा घडणाऱ्या घटनांमुळे स्वत:विषयी किंवा इतरांविषयीही अनेक प्रश्न पडत राहतात.
 आपण त्यावेळी असं का वागलो?
 आपण  आपल्या भावना समजून घेतल्या तर आपल्या बोलण्या-वागण्याची उत्तरं सापडत जातील.

 

(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: know your emotions, why you react, how your body reacts, here are the answers..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.