सुचेता कडेठाणकर
पूर्वी सणासुदीच्या दिवसांत नवीन कपड्यांची खरेदी होत असे. त्यामुळे त्या नवीन कपड्यांचं खूप अप्रूप वाटे. सध्या नवीन कपडे खरेदी करणं हे सणासुदीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पण तरीही दिवाळीची कपड्यांची खरेदी मात्र एकदम खास - स्पेशल असतेच. दिवाळीचे चार दिवस आपण सकाळ-संध्याकाळ नवीन कपडे घालणार, छान दिसणार. हे सगळं करताना आपण अनेक वेळा आरशात सुद्धा पहाणार. जेव्हा जेव्हा आपण आरशात बघू, तेव्हा असा विचार करुन बघता येईल का (Know Yourself Personality Development)?
आरशात बघणारी मी (मी १ ) - Hi! कोण गं तू?
आरशातली मी (मी २) - मी सुचेता
मी १ - कोण सुचेता?
मी २ - सुचेता - म्हणजे अमूक अमूक ची मुलगी, अमूकची मावशी, बहीण, आत्या….
मी १- बरं. मग, तुला संदर्भ देणारे हे सर्व लोक समजा काही कारणाने दूर गेले, तर तू कोण?
मी २ - मग, मी योग शिक्षिका..
मी १ - बरं, मग उद्या काही कारणांमुळे तू योग शिकवणे बंद केलेस, तर तू कोण?
हे करणं गंमतीचं होऊ शकेल, नक्कीच. आपण अशा उत्तरापर्यंत स्वतःला आणून ठेवू शकतो, जिथे आपल्याला इतर कोणीतीही उपाधी नसताना आपल्या स्वरुपाचा शोध लागेल. दिवाळीत नवीन कपडे घालतो, सुंदर दिसतो तसंच आपण वेगवेगळ्या भूमिकांचे कपडे घालत असतो, त्या त्या भूमिकेत सुंदर वागण्या-बोलण्याचा प्रयत्नही करतो. करायलाच हवा. पण, ज्याप्रमाणे या सणाचे कपडे घातले काय किंवा घरगुती कपडे घातले काय, आपलं शरीर बदलणार नाही. त्याचप्रमाणे, निरनिराळ्या भूमिका वेगवेगळ्या वेळी निभावल्या तरी आपलं स्वरुप बदलणार नाही. आणि ते, जे बदलत नाही ते आपलं स्वरुप असतं. मग या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने आपल्यामधलं, जन्मापासून आपल्याबरोबर असलेलं, कधीच आपल्यापासून दूर न जाणारं आणि भविष्यातही आपल्या बरोबर विनाअट राहिल असं आपलं स्वरुप काय, हा प्रश्न विचारुयात का?
(लेखिका योगतज्ज्ञ आहेत)