वर्ष संपत आलं की अनेकजण या वर्षात काय गमावलं काय कमावलं याची पोस्ट लिहितात. किंवा फिरायला जातात. छान छान आठवणी, आनंद साजरा करतात. आणि त्यावेळी काहींना फेस्टिव्ह डिप्रेशनही छळतं. मात्र त्यापलिकडे जाऊन असं अनेकांना वाटतं की सगळ्यांच्या आयुष्यात असं सारं छान छान घडत असताना आपलं आयुष्य मात्र महाबोअर आहे. रोजचीच कटकट, रोजच्याच जुनाट भानगडी काही संपतच नाहीत आपले व्याप.
आपल्या मनाचं नेमकं काय होतं हे कळत नाही. मग घरातल्या लोकांवर चिडचिड करून, वैतागून आणि त्यांना चांगलं किंवा वाईट ठरवून आपल्या रंग उडालेल्या आयुष्याचं खापर फोडायला आपण एखादं डोकं शोधतो. घरबसल्या मनातच विचार करतो, भीती वाटते. बिनकामाचं स्क्रोलिंग करत आपण बसल्या जागी आयुष्य बदलत नाही म्हणून चिडचिडतच राहतो. पण असं केल्यानं आपले प्रश्न सुटणार आहेत का? नाहीच सुटत कारण सगळे प्रश्न आणि सगळ्या समस्या आपल्या मनात आणि आपल्या कल्पनेतच मोठ्या झालेल्या असतात आणि ते सोडवण्याची सुरुवात करायचीही आपल्याला भीती वाटते.
(Image :google)
मरगळ झटकून कामाला लागण्यात अनेकदा आपण स्वतःच एक फार मोठा अडसर असतो.
मरगळ झटकायची म्हणजे नेमकं करायचं काय?
१. आपल्याला काय करायला आवडेल, हे स्वतःला विचारायचं. अगदी प्रामाणिकपणे. त्यांची एक यादी करायची. २. या यादीत ताबडतोब करता येतील अशा गोष्टी कोणत्या, ते स्वतःलाच विचारायचं.३. आपण आता जे काही छोटंसं का होईना करणार आहोत, असं म्हणत छोटी कृती करायची. हजार विचारांपेक्षा एक लहानशी कृती फार महत्त्वाची असते.
४. करू-करू म्हणत ढकलून दिलेल्या एखाद्या तरी छोट्याश्या गोष्टीच्या मागे लागायचं. ती पूर्ण केली की दुसरी.५. अगदी लहानसं ठरवा, आज आपल्या आवडीचा पदार्थ करायचा आणि आपणच खायचा. आज पाणीपुरी खायला जायचं. आपण आपल्यापुरती आपली स्वप्नं पूर्ण करायची.
(Image :google)
६. आपल्या मनाला त्या सक्सेस स्टोरीची सवय करत जायचं आहे, त्यातूनच आपल्याला सकारात्मकता आणि ऊर्जा मिळणार आहे.७. रोज मनासारखं घडलेल्या गोष्टीची, केलेल्या कृतीची नोंद करा. बघा रोज जगण्यात मनासारखंच सगळं घडेल आणि मरगळ झटकून आपली सारी स्वप्नं पूर्ण होताना आपणच पाहू.