कुटुंबातील जबाबदाऱ्या, स्वयंपाक, साफसफाई, पाहुणेरावळे, सणवार, मुलांचे शेड्यूल, नवऱ्याचे ऑफीस आणि टूर, आपल्या ऑफीसच्या कामाचा ताण, इतर सामाजिक तणाव हे सगळे होतच राहील. कधीही न थांबणाऱ्या या सगळ्या गोष्टी वर्ष संपली तरी होतच राहणार. या सगळ्या व्यापातूनही आपण आपल्यासाठी थोडा वेळ, पैसा, स्वत:ची स्पेस यांना जपायला नको का. त्यामुळे इतरांसाठी जगताना, कुटुंब, ऑफीस, मित्रमंडळी, नातेवाईक यांना जपताना स्वत:लाही जपायला हवं ना. वर्ष संपताना गेल्या वर्षानं आपल्याला काय दिलं याचा विचार करत असाल तर पोतडीत नक्कीच चांगल्या-वाईट गोष्टी असतीलही. पण संसाराचा गाडा ओढता ओढता होणारी दमछाक काही सोपी नाही. त्यामुळे आपलं जगायचं राहूनच गेलं की असं म्हणायची वेळ स्वत:वर येऊ देऊ नका. आणखी फार उशीर झाला नाही हे लक्षात घ्या आणि येणाऱ्या नवीन वर्षात स्वत:साठी आवर्जून काही गोष्टी करा...आता या काही गोष्टी म्हणजे नक्की काय? नवीन वर्षात तुम्ही स्वत:शी दोस्ती कशी वाढवू शकता, स्वत:च्या आनंदाच्या जागा शोधून त्यासाठी काय काय करु शकता याचा विचार करा...यासाठीच काही सोप्या टिप्स...
१. आपल्या सौंदर्यासाठी वेळ द्या
अनेकदा आपण घाईगडबडीत केसांवर कंगवा फिरवतो आणि घरातून बाहेर पडतो. मग ऑफीसला थोडं प्रेझेंटेबल हवं म्हणून वाटेत नाहीतर थेट ऑफीसला पोहोचल्यावर घाईतच काजळ किंवा लिपस्टीक लावतो. पण नवीन वर्षात स्वत:साठी थोडा वेळ काढा आणि आपल्या भुवया, आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांपासून असलेले पिंपल्स, काळे डाग, ब्लॅकहेडस, चेहऱ्यावर नको असताना आलेले केस यांकडे प्रेमाने पाहा. या सगळ्या अवयवांना आपल्या प्रेमाची गरज आहे हे तुम्हाला लक्षात येईल. हे घालवण्यासाठी माहित असतील आणि शक्य असतील तर घरगुती उपाय करा. नाही तर पार्लरमध्ये किंवा तज्ज्ञांकडे जाऊन याविषयीचा योग्य तो सल्ला घ्या. घाईगडबडीत आपण अनेकदा स्वत:कडे नीट पाहातही नाही. पण तसे न करता आपले सौंदर्य कायम राहावे असे वाटत असेल तर थोडा वेळ आवर्जून काढा.
२. करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आवर्जून करा (छंद जोपासा)
चेहऱ्यावरील सौंदर्याबरोबरच मनाचं सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं असतं तेव्हा तुमचे मन रमेल अशा गोष्टींसाठी दिवसातून, अगदीच शक्य नसेल तर आठवड्यातून नक्की वेळ काढा. बरेचदा कामाच्या नादात आपण कित्येक वर्षात आपल्या आवडीच्या गोष्टी केलेल्या नसतात. यामध्ये पेंटींग, एखादे वाद्य वाजवण्याची कला, गाण्याची कला, नृत्यकला अगदी मनसोक्त भटकायला जाणे, ट्रेकींग यांसारखे काहीही असू शकते. रोजच्या धकाधकीत आपण आपली आवड, आपण पूर्वी आवर्जून जोपासत असलेली एखादी कला पूर्णपणे विसरुन गेलेले असतो. मात्र नव्या वर्षाचा संकल्प करताना या गोष्टींना आवर्जून आपल्या आयुष्यात स्थान द्यायला हवे.
३. आपल्या आवडीचे खा
आपण इतरांची आवड सांभाळता सांभाळता आपल्याला काय आवडतं तेच अनेकदा विसरुन जातो. मुलाला अमुक भाजी आवडते, नवऱ्याला अशी आमटी केलेली आवडते. मुलीला किंवा सासूला अमुक प्रकारचा पदार्थ त्या पद्धतीने केलेला आवडतो म्हणून त्यांच्या आवडी जपताना आपण आपली आवड पार विसरुन जातो. स्वत:ला आवडते म्हणून एखादी डीश बनवण्याची गोष्टी कित्येक महिने, वर्ष मागे पडलेली असते. असेच तुम्हाला आवडणारे पदार्थ आवर्जून करा आणि मनसोक्त खा. इतकेच नाही तर बाहेर तसे पदार्थ मिळत असतील तर बदल म्हणून ते खायला जायला अजिबात विसरु नका. सगळ्यांची पथ्य, पौष्टीकता हे पाहताना आपल्या जिभेचे चोचले पुरवणेही तितकेच महत्त्वाचे नाही का...असे केल्याने तुम्ही आतून खूश व्हाल.
४. आरामासाठी महिन्यातून एक सुट्टी आवर्जून काढा
आठवडाभर ऑफीस आणि घरातल्या कामांची धावपळ असते. मग एक साप्ताहिक सुट्टी मिळाली की घराची साफसफाई, घरातील सगळ्यांच्या खाण्या-पिण्याच्या फर्माइशी आणि बाहेरची कामे यातच वेळ जातो. त्यामुळे आठवड्याच्या दिवसांपेक्षा या दिवशी जास्त थकून जायला होते. त्यामुळे आरामासाठी असा वेळच मिळत नाही. त्यामुळे महिन्यातून एकदा फक्त स्वत:साठी, आपल्या आरामासाठी, चक्क लोळत पडून राहण्यासाठी नक्की सुट्टी काढायचा संकल्प करा. अनेकदा आपण इतके अडकलेले असतो की आजारी पडलो तरी तसेच स्वत:ला खेचत राहतो आणि दुखणे अंगावर काढतो. पण आपले शरीर, मन थकते याचे भआन असू द्या आणि आरामाला प्राधान्य द्या.