प्राची पाठक
आपल्या फोनमध्ये, क्लासमध्ये, जॉबच्या ठिकाणी आणि एकूणच आयुष्यात सतराशे साठ मित्र आहेत. भरलं घर आहे. तरीही आपण एकटे आहोत असं वाटतंय. इतके व्हॉट्स अप ग्रुप, सततचे फॉरवर्ड्स काय? कामाचे, जर ते आपल्याला आपण एकटं असल्याची भावना देत असतील तर? आपले आयुष्य आहे घरबसल्या? फ्लॅशी असे काहीच नाहीये आपल्याकडे. आपल्यात मजेदार असे काहीच नाही, आपली पर्सनॅलिटी धड नाही, असेही बरेच मनात यायला सुरुवात होते. जणू मनाचा ताबा घेऊन टाकतात हे विषय. घरात काही बोलायची सवयच केलेली नसते. त्यामुळे, घरातले आणि आपण दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर चढून बसलेलो असतो. एकटेपण आणखी वाढत जाते. जीव नकोसा होऊन जातो. त्यात शरीराचे काही वेगळेच सुरु असते. कधी आपल्या आवाक्यातले केमिकल लोचे असतात, कधी आपल्या समजेच्या बाहेरचे आणि नकळत घडणारे.
अशा कोणत्याही एकटं पाडणाऱ्या क्षणी आपल्या मनातली धोक्याची घंटा वाजली पाहिजे मोठ्याने.
काय काय करता येईल?
मनातले बोलायचे आहे, हे स्वतःला बजावणे ही पहिली टीप.
दुसरी टीप म्हणजे मनातले बोलायची सवय करणे. मनात नेमके बिनसले काय, ते नीट मांडता येणे. त्यासाठी ते आपल्याला पुरेसे समजलेले असणे.
आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष समोर असतील असे कोणी, ज्यांच्याशी आपण मोकळेपणी बोलू शकू आणि आपली गुपिते तिथे सुरक्षित राहतील असे आपल्याला वाटते, त्यांच्याशी छान नाते डेव्हलप करायचे. त्यात त्यांची सोय सुद्धा बघायची. नाहीतर, मी निवडले नां ह्यांना, तर ह्यांनी वेळ दिलाच पाहिजे, मैत्री केलीच पाहिजे माझ्याशी अशी सक्ती नको. ही तिसरी टीप.
ठराविक दिवसांनी स्वतःलाच विचारायचे. काय बाबा, कसं चाललं आहे, सगळे ठीक नां? जेवण खाण, झोप, व्यायाम, हाताला-डोक्याला पुरेसे काम आहे? रुटीन कसे सुरु आहे? त्यात काय सुधारता येईल? करायची आपलीच एक चेक लिस्ट आणि ती अधिकाधिक उत्तमरित्या फॉलो करत जायचे.
तरीही आपल्या आवाक्यात नाहीये काही, सतत काहीतरी खुपतं आहे, एकटं वाटतं आहे, जीव नकोसा झालाय, असेच सारखे वाटत राहिले तर जवळचा समुपदेशक नक्कीच गाठायचा. त्यात जराही कमीपणा बाळगायचा नाही. पोट दुखले- गोळी घेतली, हे जितके सहज असते, तितकेच सहज मन दुखले, उपाय केले असे मानायचे.
दुसरे कोणी अशी मदत घेत असतील त्यांच्यासाठी, तर त्यांनाही न हसणे, वेडे न ठरवणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी असते. त्यातूनच तर एक शरीर- मनाने सुदृढ समाज तयार होत असतो.
मनाच्या आरोग्याची धोक्याची घंटा वाजली की सावध तर व्हायचेच आणि तज्ज्ञांची मदतही घ्यायचीच. लगेच फरक जाणवेल आपला आपल्यालाच. जगायला नवा हुरूप येईल. लाईफ ट्रॅक सोडणार नाही. मग पुढचा प्रवास झकासच होतोय की!
(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरणाच्या, सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)