डॉ. माधवी भट
आजवर तिच्यावर अनेक हल्ले झाले. कधी तिला गावाच्या सीमेवर रोखण्यासाठी, तर कधी तिच्या
दौऱ्यातल्या वाहन ताफ्यावर बॉम्ब फेकले, तिने एका बलात्कार पीडितेला न्याय मिळावा म्हणून धरणं
धरलं होतं, तेव्हा तर पोलिसांनी तिचे केस धरून फरपटत गाडीत भरलं होतं, एकदा तिच्या घराच्या
वाटेवरच तिच्यावर हल्ला झाला. कवटीला जबर दुखापत झाली. मात्र प्रत्येक हल्ल्यानंतर ती दुप्पट
ताकदीनं आणि निग्रहानं उभी राहिली. आपला इतिहास सांगतो. अशाप्रकारे भर रस्त्यावर, जाणकार आणि
जबाबदार अधिकाऱ्यांच्या समोर एका स्त्रीला, तिचे केस धरून खेचत आणल्यावर काय होतं ?
यावेळीही तिच्यावर हल्ला झाला, पायाला दुखापत झाली. मात्र, तिनं प्रचार थांबवला नाही.
व्हीलचेअरवरून ती फिरली. कोणी म्हणालं, हे तिचं नाटक आहे. तिला सहानुभूती मिळणार नाही. तिची
थट्टा कधी शूर्पणखा म्हणून झाली. तिच्यावर अत्यंत घाणेरडे मिम्स आपल्याच समाजात तयार झाले.
लोकांनी ते चवीनं चघळले.
समाज म्हणून आपण किती गंडलो आहोत हे आता नव्यानं सांगायची गरज नाही.
बाई, मग ती कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारी का असेना तिच्या निरीला हात घालून तिच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलणारे आपणच आहोत जे नवरात्रात शक्तीची उपासना करतो. कला, समाज, अर्थ, राजकारण सर्वत्र हेच ! यातून ना आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान सुटल्या, ना सुषमा स्वराज, ना सोनिया गांधी, ना आजच्या स्मृती इराणी, महुआ मैत्र ! भर विधानसभेत जयललितांच्या साडीचा पदर ओढणारा भद्र समाज
आपलाच आहे. मात्र, त्याही जयललिताच होत्या. सर्वांना पुरून उरल्या.
आणि आता ममता बॅनर्जी.
दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
राजकारण हा भाग जरा बाजूला ठेवला तर व्यक्ती म्हणून ममतांचा विचार करणं क्रमप्राप्त आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका निम्न मध्यमवर्गीय घरात जन्मलेली मुलगी. वडील
लहानपणीच वारलेले. घरची स्थिती फार चांगली नाही. त्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तिनं
पूर्ण केलं. ती वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी विद्यार्थी संघटनेचं काम सुरू करते काय, बघता बघता तिची
धडाडी स्थानिक नेत्यांना जाणवते काय आणि तिचा वेगात उदय होतो काय. १९७५ साली जयप्रकाश
नारायण यांचा निषेध म्हणून त्यांच्या कारवर तिनं केलेलं धाडसी नृत्य वर्तमानपत्राच्या चौकटीत येतं. सगळ्या नजरा वळतात. त्या ममता बॅनर्जी भारतातल्या सर्वांत तरुण खासदारांपैकी एक आहेत.
काँग्रेससोबत मतभिन्नतेमुळे तृणमूल काँग्रेस या स्वत:च्या पक्षाची स्थापना केल्यावर आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य
ममतांनी ठेवलं ‘मा, माटी, मानुष’. ते फार बोलकं आणि सामान्य नागरिकाच्या मनाला हात घालणारं होतं.
तेच ममतांच्या पहिल्या कवितासंग्रहाचंही नाव होतं. पहिली महिला रेल्वे मंत्री, पहिली महिला कोळसा
मंत्री ही सगळी पदं त्यांनी जबाबदारीनं भूषविली.
पांढरी सुती साडी, तिला निरनिराळ्या रंगांचे काठ, खांद्यावर शाल असा पोशाख. पायात साध्या
निळ्या पट्ट्यांच्या स्लीपर्स. कालीघाट परिसरातलं त्यांचं छोटं घर. तिथं त्या राहतात,
लिहितात, कविता करतात. आजवर त्यांची सुमारे तेरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्या चित्रकारही
आहेत. रवींद्रसंगीतावर श्रद्धा असणाऱ्या ममता अनेकदा आपल्या घरात की बोर्डवर रवींद्रसंगीत वाजवितात.
वरवर पाहता अतिशय कठोर दिसणाऱ्या ममतांची एक कविता ‘छोटो मेये’ (छोटी मुलगी) एकदा वाचावी.
लहान मुलीचं निरागस जग, तिचा खेळ, अचानक तिच्या आयुष्यात घडलेले प्रसंग, तिचा इवला घाबरलेला जीव, तिला अधिकच घाबरविणारा भवताल आणि दुर्दम्य शक्ती मनात बाळगत त्यावर मात करणारी मुलगी असा तिचा प्रवास त्यांनी लिहिलाय.
थामबे ना, थामबे ना, कोनो बाधाई शे मानबे ना
एक दिन शे उठलो ज्वले, मोनेर जोरे, मोनेर बले
(नाही आता ती थांबणार नाही, कोणतीच बंधनं ती मानणार नाही, एक दिवस ती पेटून उठली मनाची
ताकद आणि मनोबल घेऊन..)
एका साध्या निरागस मुलीचा थक्क करणारा प्रवास म्हणजे ममता बंदोपाध्याय!
भारताच्या सांप्रत राजकीय पटाकडे पाहिलं तर लक्षात येईल, जयललिता आता नाहीत. सुषमा स्वराज
नाहीत. समग्र हिंदुस्थानात प. बंगाल हे एकमेव राज्य असं आहे जिथं महिला मुख्यमंत्री आहे. यंदाच्या
निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वांत बलवान पक्षानं बंगालात घातलेलं लक्ष, झालेले वार, पलटवार, टीका,
हल्ले आणि सगळ्या देशाचं लक्ष लागलेला निकाल घोषित झाला. दीदीचा पक्ष निवडून आला. कारणांची
मीमांसा नंतर करता येईल; पण पुरुषप्रधान समाजात सर्व हल्ले थोपवून निकरानं लढा देणारी बलवान,
बुद्धिमान स्त्री म्हणून ममता बॅनर्जी नक्कीच प्रशंसनीय आहेत.
(लेखिका प्राध्यापक आणि बंगाली भाषा-संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
madhavpriya.bhat86@gmail.com