Join us  

कोरोनात १४ दिवस स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का एकटेपणा..? करून बघा 'हे' उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 7:39 PM

कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक गृहिणींना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक त्रासांना सामाेरे जावे लागत आहे. पोस्ट कोविड स्टेज म्हणून ही अवस्था ओळखली जाते. १४ दिवस घरातल्या एकाच खोलीत कोंडून राहिल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का असा एकटेपणा ? तुमच्याही मनात येतेय का रिक्तपणाची भावना. काही दिवसांची ही फेज चटकन संपवायची आहे ना ? मग हे उपाय नक्की करून पहा.

ठळक मुद्देएकाच खोलीत बंदिस्त असल्याने कोणतीही विशेष शारिरीक हालचाल होत नसल्याने अनेकींची रात्रीची झोपही गायब झाली आहे.यामुळे भूकेवरही परिणाम होऊन आणखीनच अशक्तपणा येत आहे. 

कोरोना झाल्यानंतर कोविड केअर सेंटरमध्ये राहण्यापेक्षा आपलेच घर बरे, हा विचार करून अनेकांनी आनंदाने होम आयसोलेशनचा पर्याय निवडला. काही जणांनी खरोखरच घरी आनंदात दिवस घालविले आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर आपले ऑफिस किंवा इतर कामांना नेहमीप्रमाणे दणक्यात सुरूवातही करून टाकली. पण सगळ्यांनाच हे होम आयसोलेशन काही मानवलेले नाही. विशेषत: अनेक गृहिणींना  चौदा दिवसांच्या या एकांताचा मानसिक त्रास झाला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही 'ते' चौदा दिवस आठवून त्यांना आणखीनच एकटे वाटू लागले आहे.आपल्याला कोरोना झाल्याचा धसका, कोरोनामुळे होणारा शारिरीक त्रास आणि त्यातून निर्माण झालेली एकटेपणाची भावना अनेकींना त्रासदायक ठरते आहे.

आपल्याच घरात राहून असे एका खोलीत स्वत:ला कोंडून घेणे, सगळे जग आपापल्या कामात गुंतलेले असताना आपण मात्र सगळ्या जगापासून अलिप्त होऊन जाणे अनेकींना मानवलेले नाही. याशिवाय या १४ दिवसांचा विरंगुळा म्हणजे मोबाईल आणि टीव्ही. त्यामुळे या दोन गोष्टींच्या अतिवापरामुळेेही अनेक महिलांना मानसिक त्रास होत असून नैराश्य, चिडचिडेपणा, अस्थिरता, असुरक्षितता अशी भावना त्यांच्यात वाढत चालली आहे.

कसा घालवायचा एकटेपणा

  • आपल्याविना घर चालू शकते, ही भावना सगळ्यात आधी स्विकारा आणि त्याचा आनंद वाटू द्या.
  • तुम्ही खोलीत एकट्याच होत्या, पण तुमच्या घरातले लोक मात्र त्यांच्या विश्वात अडकलेले होते. त्यामुळे त्यांनी आपल्याशी आता भरभरून बोलावे, आपल्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे वाटत असेल तर हा विचार सोडून द्या.
  • सगळे घर एकाच दिवसात पुर्वपदावर आणायचे, हा अट्टहास नको. आधी तुमची तब्येत सांभाळा आणि मग घर आवरायला काढा.
  • मोबाईल, टीव्ही अशा ज्या गोष्टी त्या १४ दिवसांमध्ये तुमचे करमणूकीचे साधन बनल्या होत्या, त्यांना थोडे दिवस दूर ठेवा. आभासी जगातून बाहेर या आणि वास्तवात मन रमवा.
  • तुमची बाग, बागेतील फुलं यांचा भरभरून आनंद घ्या.
  • भाजी आणणे किंवा इतर काही कामे करण्यासाठी स्वत:हून घराच्या बाहेर पडा.
  • गाडीने जाण्याऐवजी पायी फिरा आणि लहान- सहान खरेदीचा आनंद घ्या.
  • एखादी नवी रेसिपी आवर्जून ट्राय करून पहा.
  • घरातल्या शोभेच्या वस्तू हलवणे, पडदे बदलणे यासारखे थोडे हलके- फुलके बदल नक्की करून पहा. हा बदलही तुम्हाला सुखावह वाटेल आणि काहीतरी चेंज झाल्याचा आनंद मिळेल. 
टॅग्स :आरोग्यमानसिक आरोग्यकोरोना वायरस बातम्यामहिला