-सायली कुलकर्णी (सायकॉलॉजिस्ट)‘मी टाइम’. अलीकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही संकल्पना. स्वतःसाठी ठरवून, आवर्जून काढलेला वेळ म्हणजेच ‘मी टाइम.’ गमतीचा भाग म्हणजे लोक हा ‘मी टाइम’अगदी सोयीस्करपणे वापरताना दिसतात. एक मानसशास्त्रतज्ज्ञ म्हणून मला मात्र कायम असं वाटतं की ‘मी टाइम’चा विचार करताना 3 R लक्षात घेणे गरजेचे आहे.
3 R म्हणजे काय?तर हे ३ रिलॅक्स R म्हणजे (relax), रिचार्ज (recharge) आणि रिफोकस (refocus).
‘मी टाइम’साठी आपण जी ॲक्टिव्हिटी निवडू ती करताना आपल्याला शारीरिक-मानसिक विश्रांती मिळणे आवश्यक असते.ती मिळाली की आपल्याला आपल्या कामांत पुन्हा लक्ष केंद्रित/रिफोकस करण्यासाठी ऊर्जा मिळते. आपण रिचार्ज होतो.
त्याउलट ‘मी टाइम’साठी निवडलेल्या ॲक्टिव्हिटी करतानाच जर आपण थकून जात असू, ती केल्यानं रोजच्या दैनंदिन कामात अडथळा निर्माण होत असेल तर त्यातून आपल्याला ‘मी टाइम’मधून जे साधणे आवश्यक आहे, ते साधता येत नाही.
आणि मुख्य म्हणजे ‘मी टाइम’च्या नावाखाली रिल्स स्क्रोल करत राहणं, फोनवर तासन् तास गॉसिपिंग करणं, भरमसाठ शॉपिंग करणं, सेल्फी काढत सुटणं म्हणजे ‘मी टाइम’ आहे का? - असे प्रश्न स्वतःलाच नव्याने विचारण्याची गरज आहे.माहितीच्या भडिमाराच्या या युगात स्वतःला स्वत्वाशी कनेक्ट करणारा, जोडणारा ‘मी टाइम’ हा आवश्यक आहे किंबहुना तो हवाच! पण तो वापरण्यासाठी सुज्ञता मात्र हवी. ‘मी टाइम’ शहाणपणाने वापरण्यासाठी अनेक गोष्टी करणे शक्य आहे.
मी टाइम आणि मेडिटेशन१. मी टाइममध्ये करावी अशी परिणामकारक गोष्ट म्हणजे ‘मेडिटेशन’अर्थातच ‘ध्यानधारणा’. मेडिटेशनमुळे रिलॅक्स, रिचार्ज आणि रिफोकस हे 3R साधता येणे नक्कीच शक्य आहे.
२. नव्याने झालेल्या अनेक संशोधनांत असे सिद्ध झाले आहे की, मेडिटेशनच्या सरावामुळे मानवी मेंदूच्या संरचनेत आणि कार्यकुशलतेत लक्षणीय असे सकारात्मक बदल घडून येताना दिसतात.
३. मेडिटेशन नियमित केल्यानं मेंदूतील ग्रे मॅटरमध्ये वाढ होत असल्याचे अनेक अभ्यासांत दिसून आले आहे. हा ग्रे मॅटर स्मृती, निर्णय क्षमता, अवधान क्षमता, स्नायू व भावनिक नियंत्रण, वेदन-संवेदन यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
४. मेंदूचे बाह्य आवरण म्हणजेच कॉर्टेक्सच्या जाडीमध्ये वाढ होते, हे बाह्य आवरण सेंसरी प्रोसेसिंग, अवधान आणि भावनांचे नियमन करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.५. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता यासाठी प्रिफ्रंटल कॉरटेक्स मधील ॲक्टिव्हिटीज महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. माइंडफुलनेस मेडिटेशन सारख्या तंत्रांच्या वापरामुळे लक्ष केंद्रित करणे व ते टिकून ठेवणे या क्षमतेमध्ये वाढ झाल्याचे संशोधनांती दिसून आले आहे.
६. मेडिटेशनमुळे पूर्ववर्ती सिंग्युलेट कॉर्टेक्सची मजबुती होते. मानवी मेंदूचा हा भाग भावनिक प्रक्रिया आणि स्वनियमन, भावनिक नियमनाचे कार्य करतो. हा मेंदूचा भाग वेदनेबाबतची सहनशीलताही वाढवतो.७. वेगवेगळ्या बोधनिक कार्यामध्ये कार्यक्षमतेने बदल करण्याची क्षमता म्हणजे बोधनिक लवचिकता. बोधनिक लवचिकता असणारी व्यक्ती अधिक चांगल्या प्रकारे समस्या निराकरण करू शकणारी, सृजनशील आणि लवचिकपणे विचार करणारी असते. मेडिटेशनमुळे व्यक्तीच्या बोधनिक लवचिकतेत वाढ होते.
८. मेडिटेशनमुळे कॉर्टिसोल या संप्रेरकाची अर्थातच हार्मोनची पातळी कमी होण्यास मदत होते. याद्वारे ताणतणाव कमी होऊन स्थिरता, विश्रांती, मानसिक शांती अशा मानसिक स्थितीचा अनुभव येतो. ताणतणाव व ताणजन्य परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता वृद्धिंगत होते.९. मेडिटेशनमुळे नवीन न्यूरल कनेक्शन निर्माण करण्याची मेंदूची क्षमता वाढते. यामुळे आपला मेंदू नवीन अनुभव, माहिती यांच्याशी लवकर जुळवून घेऊ शकतो.
१०. मेंदूच्या विविध भागांमधील कम्युनिकेशन सुधारण्यास मदत होते. या मेंदूच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या नेटवर्किंगमुळे केवळ बोधनिक क्षमताच नाही तर भावनिक-मानसिक स्वास्थ्यही सुधारण्यास मदत होते.११. मेंदूतील अल्फा, थिटा यांसारख्या ब्रेनवेव्ज अर्थातच मेंदू लहरी या मन:शांती, सृजनशीलता आणि मानसिक स्पष्टतेला प्रोत्साहन देतात. यामुळेच मेडिटेशनच्या सरावामुळे विश्रांततेच्या खोल अवस्थेची अनुभूती येते.
१२. एकूणच मानवी मेंदूच्या संरचनेवर व कार्यावर ध्यानाचा सकारात्मक, प्रभावी परिणाम होताना दिसतो. ध्यानाच्या नियमित सरावामुळे आत्म-जागरूकता वाढीस लागते. बोधनिक, भावनिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशन हा अतिशय उत्तम मार्ग आहे. माइंडफुलनेस मेडिटेशन, बॉडी स्कॅन मेडिटेशन, गायडेड मेडिटेशन, चक्र मेडिटेशन, विपश्यना मेडिटेशन, मंत्रा मेडिटेशन, साऊंड मेडिटेशन हे आणि असे अनेक मेडिटेशनचे प्रकार नक्कीच ‘मी टाइम’ समृद्ध करू शकतो. वर्षातून एकदा मेडिटेशन डे म्हणून करण्याची ही गोष्ट नाही. नियमित राेजच मेडिटेशन करायला हवं. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ते शिकून घ्यायला हवं. गरज आहे ती सजगतापूर्वक दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवण्याची!
sayaliskulkarni@gmail.com