आपलं जगणं सुखकर करण्यासाठी किती भौतिक साधनं आज आपल्या दिमतीला आहेत. पण म्हणून आपण आनंदी आहोत का? आनंदी असण्यासाठी लागणारं आनंदी मन आपल्याकडे आहे का? असा प्रश्न विचारला तर अनेकजण म्हणतात आजूबाजूला काय काय घडतंय, आयुष्यात कामाचा किती ताण आहे, किती टेन्शन्स आहेत कसं असेल मन आनंदी? असं प्रश्नाला प्रश्न करणारं उत्तर मिळतं. मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात आपल्या मनाला कोणतीही भौतिक वस्तू आनंद देऊ शकत नाही. बाहेरुन कोणीही आपल्या मनाला आनंदी करु शकत नाही. आपल्या मनाला आनंदी करण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे. तो म्हणजे मनातले नकारत्मक विचार काढून टाकणे.
Image: Google
तज्ज्ञ म्हणतात, की मनातले सगळे नकारात्म विचार काढून टाका आणि आनंदी व्हा हे इतकं सोपं काम नाही. घरातला कचरा काढण्याएवढं सोपं तर मुळीच नाही. मनातला नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी एकदा झाडू मारुन उपयोगाचा नाही. त्यासाठी मनालाच नकारात्मक विचारांशी लढण्याचं बळ द्यावं लागेल. हे बळ मिळवण्याचे उपाय देखील आपल्यालाच करावे लागतात. तज्ज्ञ सांगतात की मनातले नकारात्मक विचारांचं ओझ वाढत गेलं तर शारीरिक आजारांसोबतच मनाची दुखणी मागे लागतात. सतत नकारात्मक विचार केल्यानं रक्तदाब वाढणे, मधुमेह , हदयाशी संबंधित आजार जडणं, थकवा येणं, चिडचिड होणं, रात्रीची झोप गायब होणं अशा अनेक समस्या उद्भवतात.
हा सर्व धोका टाळण्यासाठी 'मन करा रे प्रसन्न' हाच उपाय आहे. हा उपाय साध्य होण्यासाठी मनातले नकारात्मक विचार काढून टाकणं गरजेचं आहे. मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी औषध नाही तर काही युक्त्या प्रभावी काम करतात. या युक्ता सोप्या आहेत पण त्या एकदा नाही तर रोज अमलात आणाव्या लागतील.
आनंदी मनासारखं सुख दुसरं नाही, ते मिळवायचं असेल तर या सोप्या युक्ता रोज अमलात आणण्यास कोणाची ना असेल?
Image: Google
मनातली नकारात्मकता कशी काढाल?
1. संगत पॉझिटिव्ह शोधा
ज्याच्या सोबत आपण राहातो त्याचा प्रभाव आपल्या विचारांवर , वागण्यावर पडतोच. वाण नाही पण गुण लागतो ना, ते खरं आहे. म्हणून तज्ज्ञ सांगतात की नकारात्मक विचार करणार्या लोकांच्या सोबत राहिला तर आपल्याही मनात नकारत्मक विचारच येतात. ते टाळण्यासाठी सतत सकारात्मक राहाणार्या माणसांसोबत राहावं, त्यांच्याशी बोलावं. दुसर्याचे पॉझिटिव्ह विचार ऐकून आपल्या मनातील नकारात्मक विचारांकडे लक्ष जाऊन ते काढण्याची गरज निर्माण होते.
2. स्वत:ला सांगा बी पॉझिटिव्ह
केवळ आनंदी आणि सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहून आपले नकारात्म्क विचार सकारात्मक होणार नाही. फक्त स्वत:च्या नकारात्म विचारांवर काम करण्याची गरज निर्माण होईल. आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी स्वत: सकारात्मक विचार करायला लागणं हाच उपाय. कुठलीही गोष्ट, घटना, व्यक्ती समोर आली की आधी त्याचा नकारात्मक विचार न करता त्याबद्दल चांगला विचार करावा. आपल्याला हे जमणारचं नाही असं म्हणण्यापेक्षा जमवण्याचा प्रयत्न करतो असं म्हणा. तज्ज्ञ म्हणतात, की मनात नकारात्मक विचार आले की जागेवरुन उठून जरा चालून यावं, घरात असाल तर बाहेर पडावं. आपल्याला ज्यातून आनंद मिळेल ती गोष्ट पाच मिनिटं का होईना करावी. यामुळे मन नकारात्मक विचारांकडून चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होईल.
Image: Google
3. माफ करा
कोणी आपल्याला बोललं, वाईट वागलं की लगेच आपल्याला वाईट वाटतं. त्या व्यक्तीचा राग येतो, त्याच्याबद्दल नकारात्मक विचार यायला लागतात, त्याचा परिणाम म्हणजे आपण आपल्यालाच दोष द्यायला लागतो. स्वत:लाच चुकीचं आणि कमी समजतो. हे टाळण्यासाठी जे वाईट घडलं ते पटकन विसरण्याचा प्रयत्न करावा, समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या बोलण्याचा, वागण्याचा त्रास न करुन घेता त्यांना माफ करुन टाकावं. माफ केलं की लगेच मनावर आलेला ताण कमी होतो. त्या व्यक्तीबद्दल मन नकारात्मक विचार करायचं थांबवतं.
4. मदत करण्याचा आनंद मिळवा
आपल्या मनात नकारात्मक विचार आला, की पटकन उठून कोणाची तरी मदत करा. मदत केल्यानं वेगळं काम करायला मिळतं. मनातल्या नकारत्मक विचारांवरचं लक्ष दूर होतं. आपल्या मदतीनं समोरच्याला झालेला आनंद बघून आपल्यालाही छान वाटतं. स्वत:बद्दल मन सकारात्मक विचार करायला लागतं.
Image: Google
5. व्यायाम करा फिटनेस वाढवा
शरीराची हालचाल कमी झाली, शरीराला काही काम नसलं की मन उगाच नाही त्या गोष्टींचा विचार करत बसतं. म्हणून सतत स्वत:ला कामात गुंतवा. शारीरिक हालचाल जास्त होईल याकडे लक्ष द्यावं. तज्ज्ञ म्हणतात, की रोज सकाळी 45 मिनिटं कसून व्यायाम केल्यानं शरीराला ऊर्जा आणि मनाला प्रसन्नता मिळते. व्यायामामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात. तसेच काम करताना मनात नकारात्मक विचार आले तर थोडे स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत किंवा जागेवर बसून डोळे मिटून किमान दोन मिनिटं दीर्घ श्वसन करावं. मन हलकं होऊन आपण करत होतो त्या कामात लक्ष लागेल.