आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी आनंद तर कधी दु:ख असतेच. सतत आनंदी आणि खूश असणे वाटते तितके सोपे नाही. काही ना काही ताण असतातच आणि त्यांच्याशी डील करताना आपणही कधीतरी डाऊन होतो. मग पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्यासाठी आपण स्वत:ला चार्ज करतो. इतकेच नाही तर निराशेच्या वातावरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण आजुबाजूचे वातावरण आणि लोक यांच्यामुळे स्वत:ला फार काळ फ्रेश ठेवणे प्रत्येकालाच शक्य होईल असे नाही (Mental Health Tips For Women's). मात्र सतत उदास किंवा निराश राहील्याने आपलेच आयुष्य विनाकारण नकारात्मक होते. महिला या पुरुषांपेक्षा जास्त भावनाप्रधान असल्याने त्यांना लहानसहान गोष्टींमुळे नैराश्य येऊ शकते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार १४ ते २५ वर्षातील तरुणींमध्ये या वयातील तरुणांपेक्षा दुप्पट प्रमाणात नैराश्य असते. महिलांमध्ये तयार होणारे हार्मोन्स आणि इतरही अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. मात्र असे नैराश्यात न राहता महिलांना स्वत:ला खूश आणि आनंदी ठेवण्यासाठी काय करता येईल असा विचार जर तुम्ही करत असाल तर आज आपण त्यासंबंधी काही उपाय पाहणार आहोत.
१. नियमित व्यायाम
एंडोर्फीन हे हार्मोन आपल्या शरीरात आनंदाची निर्मिती करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हार्मोन आहे. व्यायामामुळे शरीराला चालना मिळते आणि एंडोर्फिन हार्मोनची निर्मिती होते. या हार्मोनमुळे आपला ताण कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते. नियमित व्यायाम केल्याने तब्येत चांगली राहण्यास मदत होतेच पण झोपेचे आरोग्यही सुधारण्यास त्याची अतिशय चांगली मदत होते. तसेच व्यायामामुळे भिती आणि नैराश्याची भावना कमी होण्यास मदत होते.
२. उत्तम आहार
तुम्ही संतुलित आणि पोषक आहार घेत असाल तर तुमची तब्येत नकळत चांगली राहण्यास मदत होते. मन ताजेतवाने हवे तर गोड खाणे टाळायला हवे. तसेच कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्याचे प्रमाण अतिशय कमी ठेवायला हवे. त्यामुळे तुमच्या मनावरचा ताण आणि वैताग दूर होण्यास मदत होते. तुम्हाला उदास वाटत असेल तर आहारात सेलेनियम, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फोलेट, व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम, लोह, झिंक, व्हिटॅमिन्स यांचा आहारात समावेश करायला हवा.
३. आवडीचे करिअर निवडा
अनेकदा महिलांचा आनंद हा त्यांच्या कामात दडलेला असतो असे दिसते. तुम्ही करत असलेले काम तुमच्या आवडीचे असेल तर तुम्ही नकळतच आनंदी राहता. मात्र तुम्ही करत असलेले काम तुमच्या आवडीचे नसेल तर तुम्ही निराश आणि उदास होण्याची शक्यता असते. म्हणूनच महिलांनी आपले करिअर निवडताना आपले काम आपल्याला आवडेल याची काळजी घ्यायला हवी.
४. स्वत:ची काळजी
घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता महिला अनेकदा स्वत:ची काळजी घेणे विसरतात. मात्र आपण आपली काळजी घेतली नाही तर दुसरे कोणी आपली काळजी घेणारे नसते. त्यामुळे वेळच्या वेळी आपणच आपल्या तब्येतीची, आपल्या आवडीनिवडींची, आपल्या मनाची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे आपण नक्कीच फ्रेश राहू शकतो.