Lokmat Sakhi >Mental Health > घरकामाच्या ओझ्यानं जीव नक्को झाला तरी बायका मुकाट सगळी कामं करतात; ते का ?

घरकामाच्या ओझ्यानं जीव नक्को झाला तरी बायका मुकाट सगळी कामं करतात; ते का ?

Mental Load : हळूहळू बायका जगण्याच्या बाबतीत नीरस होत जातात. न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना स्वतःसाठी वेळच काढता येत नाही.आणि पुढे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 05:11 PM2021-05-19T17:11:41+5:302021-05-19T17:27:27+5:30

Mental Load : हळूहळू बायका जगण्याच्या बाबतीत नीरस होत जातात. न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना स्वतःसाठी वेळच काढता येत नाही.आणि पुढे..

Mental Load : burden of housework, multitasking women, how to manage it | घरकामाच्या ओझ्यानं जीव नक्को झाला तरी बायका मुकाट सगळी कामं करतात; ते का ?

घरकामाच्या ओझ्यानं जीव नक्को झाला तरी बायका मुकाट सगळी कामं करतात; ते का ?

Highlightsकोणी म्हणेल की बायकाच हे सगळं आपणहून गळ्यात बांधून घेतात. त्यांनाच मोकळेपणाने मजा करता येत नाही. त्या कशाला चार चार वेळा फोन करून चौकश्या करतात?

गौरी पटवर्धन


प्रत्यक्ष घरकामाचा बायकांना जितका ताण येतो तेवढाच ताण त्याचा सतत विचार करण्याचा येतो. कारण त्यामुळे त्यांचं सगळं आयुष्य घराभोवती बांधलेलं राहतं. त्या कुठलंही काम, कुठलीही ऍक्टिव्हिटी पूर्ण मोकळ्या मनाने करू शकत नाहीत. त्यात आपल्याकडची समाजाची मानसिकता अशी आहे, की घरातला प्रत्येक सदस्य घरातल्या बाईवर अनेक दृश्य - अदृश्य कामं सतत टाकत राहतो. त्यातली अनेक कामं अशी असतात की ज्याने त्याने स्वतःची स्वतः करायला खरं म्हणजे काही हरकत नसते.
एकदा एका बॅडमिंटन कोचला एक बाई विचारत होत्या, की मला संध्याकाळी साडेपाचच्या बॅचला ऍडमिशन मिळेल का? तो कोच त्यांना सांगत होता की संध्याकाळच्या सगळ्या बॅचेस फक्त कॉम्पिटिटिव्ह खेळणाऱ्यांसाठी आहेत. अमॅच्युअर खेळणाऱ्यांना, नवीन शिकणाऱ्यांना साडेचारच्या बॅचला ऍडमिशन मिळू शकते. त्या म्हणत होत्या की साडेचारला नाही हो जमणार मला. आणि त्याचं कारण काय? तर त्या बाई एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचं कॉलेज दुपारी चार वाजता संपतं. तिथून खरं म्हणजे डायरेक्ट बॅडमिंटनला यायचं, साडेचार ते साडेपाच व्यायाम करायचा आणि मग सहाला घरी जायचं हे शेड्युल त्यांना सगळ्यात सोयीचं आहे. पण घरी सासूसासरे असतात. त्यांना दुपारचा चहा साडेचार वाजता लागतो. तो करून देण्यासाठी या प्राध्यापक बाईंना घरी जावं लागतं. आणि सव्वाचारला घरी गेलं की मग चहा करून साडेचारला त्या बॅडमिंटनला पोचूच शकत नाहीत. इन फॅक्ट एकदा घरी गेलं की पुन्हा बाहेर पडणं, तेही व्यायामासाठी हे त्यांना फारच कठीण वाटत होतं. पण काहीतरी करून साडेपाचच्या बॅचला येण्याचं आपण जमवूया असं त्यांना वाटत होतं.
आता दुपारचा चहा करून देण्यासाठी त्या बाईंनी घरी जाणं याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? जी बाई घरचा स्वयंपाक करून, त्यानंतर सकाळी आठ ते चार कॉलेजला शिकवते तिला त्यानंतरचा एक तास तिच्या सोयीने का का मिळू नये?
पण असं होत नाही.

घरातली कामं संपत नाहीत कारण घरातल्या माणसांच्या अपेक्षा संपत नाहीत. काही अपेक्षा या परंपरेतून आलेल्या असतात. म्हणजे घरात सून आली की तिने सगळ्यांना सगळं हातात द्यायचं. अगदी पाणीसुद्धा कोणी उठून घेत नाही इथपासून ते तिने सगळ्यांची आवडनिवड जपायची वगैरे कल्पना समाजाच्या मनात इतक्या घट्ट बसलेल्या आहेत, की त्याला हात लावणं वाटतं तितकं सोपं नाही. बरं त्या सासूने तिच्या काळात हेच सगळं केलेलं असतं. त्यामुळे आता सेवा करून घ्यायची माझी पाळी आहे असं तिला वाटत असतं. बरं, ही नवीन सून जी असते तिच्या मनाची तयारी तिच्या माहेरच्या लोकांनी करून घेतलेलीच असते. कारण सासरी जाऊन तिला हे सगळं करावंच लागणार आहे असं त्यांनाही वाटत असतं.
तीही आधी स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात हे सगळं करत जाते. कधी प्रेमाने करते. कधी जबाबदारी म्हणून करते. कधी करावंच लागतं म्हणून करते. कधी पर्याय नसतो म्हणून करते. आणि मग हळूहळू हे सगळं कायमचं तिच्याच गळ्यात येऊन पडतं. आणि मग बावीस चोविसाव्या वर्षी लग्न झाल्यापासून ती जी घर या संस्थेचा विचार मनात बाळगायला लागते ती पार तिला सून येईपर्यंत! आणि मग हे दुष्टचक्र असंच चालू राहतं.
घरातल्या बाईला घरचा विचार कधी बंद करताच येत नाही. त्यातून तिची कधी सुटकाच होत नाही. बरं ही सगळी कामं अत्यंत कंटाळवाणी, रटाळ आणि कमालीची एकसुरी असतात. त्यातल्या त्यात ज्या बायकांना खरोखर स्वयंपाक करायला आवडतो, त्यांना त्यात काहीतरी आनंद मिळतो. पण एरवी घर झाडणे, पुसणे, किराण्याची यादी करणे, दिवसातून दहा वेळा चहा करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, फर्निचर झटकणे असली कामं कोणी स्वतःची आवड म्हणून करत असेल यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.
आणि त्याहूनही एक काम संपलं की पुढच्या कामाचा विचार सतत करत राहणं हे तर कमालीचं दमवणूक करणारं आहे. आणि मग हळूहळू बायका जगण्याच्या बाबतीत नीरस होत जातात. न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना स्वतःसाठी वेळच काढता येत नाही. काहीतरी आयडिया करून कसातरी वेळ काढला तरी तो पूर्ण मोकळा नसतो. अगदी मैत्रिणींबरोबर कुठेतरी ट्रीपला गेलेल्या बायकोसुद्धा चार चार वेळा घरी फोन करून सगळे वेळेवर जेवले का? मुलं शाळेत गेली का? असे प्रश्न विचारत असतात. कारण आपण त्या जागेवरून हललो, की बाकी सगळं घर आपोआप व्यवस्थित चालेल यावर त्यांचा विश्वास नसतो. त्यांचा अनुभवही तसा नसतो.
यावर कोणी म्हणेल की बायकाच हे सगळं आपणहून गळ्यात बांधून घेतात. त्यांनाच मोकळेपणाने मजा करता येत नाही. त्या कशाला चार चार वेळा फोन करून चौकश्या करतात? घरचे लोक बघतील काय ते… पण बायकांच्या दृष्टीने त्यातला खरा मुद्दा असा असतो, की त्यांच्या अनुपस्थितीत घरात जे काही गोंधळ झालेले असतात ते परत गेल्यावर त्यांना निस्तरायचे असतात. ट्रीपहून घरी गेलो आणि मस्त झोपलो असं करता येईल याची त्यांना खात्रीच वाटत नाही.
आणि तेच, मेण्टल लोड काही कमी होत नाही.

 

(लेखिका पत्रकार आहेत.)

Web Title: Mental Load : burden of housework, multitasking women, how to manage it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.