- गौरी पटवर्धन
जगभर चित्र असं दिसतं, की अनेक बायकांची तक्रार एकच, पुरुष माणसं घरातली कामं करत नाहीत. या लॉकडाऊन काळात तर ही चर्चा फारच झाली. काहीजण काम करु लागले, पण त्यातले सातत्य हा वेगळ्या चर्चेचा विषय. पण हा मुद्दा फक्त एवढाच नाही पुरुष घरात काम करत नाहीतच पण त्या कामांचा अजिबात विचार करत नाहीत. त्यातही, निदान शहरी भागात, विभक्त कुटुंबात, थोड्या पुढारलेल्या विचारसरणीच्या घरात, नवरा बायको दोघंही नोकरी करत असतील तर घरातली पुरुष मंडळी घरात ‘मदत’ करतात. अगदीच नाही असं नाही. पण अजूनही त्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे. आणि त्यातही जे करतात ते ‘मदत’ म्हणून करतात.
आता प्रश्न असा येतो की ‘मदत’ म्हणून केलं तर बिघडलं कुठे? काम झालं म्हणजे बास! त्यातून मग नवरे बायकांना सांगतात, “तू सांग काय करू? मी करतो.”
अर्थात पुरुषांनी घरातली इकडची काडी तिकडे न करण्याचीच पद्धत असलेल्या समाजात बायकोने सांगितलेली कामं कामं करणारे नवरे मंडळी ही सुधारीत आवृत्ती असतात हे बरोबर आहे. काहीच काम न करण्यापेक्षा थोडं, जमेल तेवढं, जमेल तसं, सांगितल्यानंतर का असेना काम करणं हे केव्हाही बरं. पण प्रश्न असा आहे की ते पुरेसं आहे का? ‘तू सांगशील ती ‘मदत’ मी करतो.’ यात काहीतरी मूलभूत चुकतंय का?
तर एक माणूस दुसऱ्याला ‘मदत’ केव्हा करतो? तर जेव्हा ती जबाबदारी एका माणसाची असते तेव्हा! म्हणजे घराघरात असं गृहीत धरलेलं असतं, की घरकाम ही घरातल्या बायकांचीच जबाबदारी आहे. आणि एकदा ती बाईची जबाबदारी आहे असं म्हंटलं की पुरुषाने त्याचा विचार करण्याची काही गरज उरत नाही. आणि अडचण नेमकी तिथेच होते.
घर चालवणे ही मल्टिटास्किंगची परिसीमा असते. नवरा बायको, दोन मुलं आणि सासू सासरे असं एक बेसिक कुटुंब बघितलं, तर ते घर कोणाचीही अडचण न होता सुरळीत चालवण्यासाठी अनेक कामं एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर करावी लागतात. ती कामं करावी लागतात आणि त्याच वेळी त्या कामांचं प्लॅनिंगही करावं लागतं. ते प्लॅनिंग इतकं चोख असावं लागतं, की घरातली जी व्यक्ती ही कामं करत नसते तिला असं वाटतं जणू काही ही कामं आपोआप होतायत.
ही कामं कुठली कुठली असतात याची जर यादी केली, तर लक्षात येतं, की ही कामं किती विविध प्रकारची असतात. आपल्याला जनरली घरकाम म्हंटलं, की दोन वेळचा स्वयंपाक करणं एवढंच डोळ्यासमोर येतं. तो स्वयंपाक बायको / आई / मुलगी / वहिनी / मामी / आत्या / मावशी / आजी / काकू दोन तासात हातावेगळा करतांना आपण कायमच बघत असतो. आणि मग आपल्याला हे कळतच नाही, की ‘घरात फार काम असतं’ असं बायका सतत का ओरडत असतात.
दोन वेळचा स्वयंपाक हा आधी भयंकर मोठा विषय असतो. त्याला अनेक बाजू आणि अनेक कंगोरे असतात. त्यामुळे दोन वेळचा स्वयंपाक हे म्हणायला जरी किरकोळ वाटत असलं, तरी त्यात संपूर्ण स्वयंपाकघराची मॅनेजमेंट येते. बरं ही मॅनेजमेंट एकाच वेळी अनेक पातळ्यांवर करावी लागते. दिवसाची, आठवड्याची, महिन्याची आणि वर्षाची!
पण इथे हे नियोजन संपत नाही, तर इथून ते सुरु होतं. आणि मग वाढत जातो मेण्टल लोड!
(लेखिका पत्रकार आहेत.)