गौरी पटवर्धन
“ सिमला मिरची आणली का?”“अगं… मी ऑफिसमधून बाहेर पडेपर्यंत भाजी मार्केट बंद झालं होतं.”“मग?”“मग काय? नाही मिळाली…”“असं काय करता नेहमी, एक काम सांगितलं तर तेही करत नाही. बरं उशीर होतोय हे लक्षात आलं तेव्हा कळवायचं तरी, मी घेऊन आले असते कोपऱ्यावरून! आता ऐन वेळेला सिमला मिरची कुठे मिळेल?”“ए बाई… दुसरी कुठलीतरी भाजी कर मग. एवढ्याश्या गोष्टीवरून किती कटकट करतेस? नाही मिळाली सिमला मिरची तर एवढं काय आभाळ कोसळणार आहे?”“तुम्हाला काय जातंय दुसरी भाजी कर म्हणून सांगायला? जाऊदे. मी बघते काय करायचं ते…”असं बोलून बायको रागारागात स्वयंपाकघरात निघून जाते, आणि ऑफिसमधून आलेला नवरा फ्रेश व्हायला निघून जातो तेव्हा त्याच्या मनात एकच विचार असतो,‘या बायका एवढ्याश्या गोष्टीवरून किती कटकट करतात. आता ही ती सिमला मिरची सोडून देणार नाही. पुढचे चार दिवस ऐकवत राहील त्याच्यावरून…’
घरोघरी वारंवार घडणाऱ्या प्रसंगांचं हे एक उदाहरण आहे. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. ‘तीन शिट्ट्या झाल्या की कूकर बंद करणे’ ‘दूध वर आलं, की गॅस बंद करणे’ ही त्यातली सगळ्यात वैश्विक दोन उदाहरणं आहेत. आईने किंवा बायकोने हे काम सांगितलं नाही असा एकही संसारी पुरुष सापडणार नाही आणि सांगितलेलं तेवढं एकच कामही धड न केल्यामुळे शिव्या खाल्लेल्या महापुरुषांचीही यादी भली मोठी होईल यात शंका नाही.घरं बदलतात, नाती बदलतात, व्यक्ती बदलतात, परिस्थिती बदलते, प्रसंग बदलतात... पण ‘एवढंसं काम विसरलो तर ही बाई एवढी चिडचिड का करते?’ हा सनातन प्रश्न बदलत नाही. समजा कूकरच्या तीन ऐवजी चार किंवा पाच किंवा सहा शिट्ट्या झाल्या तर इतकं काय बिघडलं? किंवा दूध उतू गेलं तर ओटा धुवायला लागेल एवढंच ना? पाहिजे तर ओटा मी धुवून देतो पण त्यावरून कटकट करू नकोस अशी समस्त पुरुषवर्गाची भूमिका असते. या वर्गामध्ये ज्या काही थोड्या मुलींना कधीच कोणी स्वयंपाकघरातली कामं सांगत नाही अशांचाही समावेश होतो, नाही असं नाही. पण एकूण समाज आणि समाजाची मानसिकता याचा विचार केला, तर त्यांची संख्या नगण्य आहे. स्वयंपाकघर किंवा एकूणच घर चालवणे हे ज्यांना कधीच करावं लागत नाही अशा वर्गामध्ये बहुतेक वेळेला पुरुष मंडळीच असतात.आत्तासुद्धा हा लेख वाचणारे पुरुष बुचकळ्यात पडलेले असतील, की ती सिमला मिरची न मिळालेली बाई एवढी का चिडली असेल? सिमला मिरची म्हणजे काय गुलाबजाम आहेत का की त्यासाठी कोणी इतकं व्याकूळ व्हावं?किंवा कूकरच्या जास्त शिट्ट्या झाल्या तर आई त्यावरून इतकी कटकट का करते?आणि अखिल जगातल्या पुरुषांना पडणारा अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे…‘एखादं’ काम विसरलं तर त्यावरून बायका इतकी कटकट का करतात? इतकी चिडचिड का करतात? दिवसचे दिवस त्यावरून टोमणे का मारतात?त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांच्या प्रश्नातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे.‘एखादं’ काम विसरलं तर घरातल्या बायका त्यावरून इतकी कटकट का करतात याचं सगळ्यात सरळ आणि थेट उत्तर म्हणजे पुरुषांना मुळात घरातलं ‘एखादंच’ काम सांगितलेलं असतं. त्याच्या आधीची अक्षरशः अगणित कामं त्या बाईने अत्यंत एफिशियंटली उरकलेली असतात. ते ‘एखादं’ काम आपणहून करण्याचं नवऱ्याला किंवा मुलाला सुचलेलं नसतं, तेही तिने सांगितलेलं असतं. त्यावाचून तिची पुढची कामं अडणार असतात, आधीच घरातल्या न संपणाऱ्या कामांमध्ये अजून काही कामांची भर पडणार असते आणि त्याच घरात राहून तिच्या या धावपळीची गंधवार्ताही नसलेली पुरुषमंडळी, आपल्या वाट्याला आलेलं ‘एखादं’ कामसुद्धा धड न करता फक्त बायका कशा चिडचिड करतात याचे जोक्स फॉरवर्ड करत निवांत बसलेले असतात.आणि मग म्हणतात काय, लहानसहान गोष्टींवरुन कटकट करते.
(लेखिका पत्रकार आहेत.)