Lokmat Sakhi >Mental Health > भूक किती आहे असं ‘तिने’ विचारलं तर घरातली माणसं का चिडतात? सोप्या प्रश्नाचं अवघड उत्तर

भूक किती आहे असं ‘तिने’ विचारलं तर घरातली माणसं का चिडतात? सोप्या प्रश्नाचं अवघड उत्तर

तिची मात्र घरातली कामं पार रात्री झोपेपर्यंत चालू राहतात. पण दुसऱ्या दिवशीच्या कामांचा विचार त्यानंतरही थांबत नाहीच, तिचा मेंटल लोड कुणालाच दिसत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 01:46 PM2021-05-18T13:46:45+5:302021-05-18T13:54:08+5:30

तिची मात्र घरातली कामं पार रात्री झोपेपर्यंत चालू राहतात. पण दुसऱ्या दिवशीच्या कामांचा विचार त्यानंतरही थांबत नाहीच, तिचा मेंटल लोड कुणालाच दिसत नाही.

Mental load -women- stress of kitchen & home management, too much work no rest | भूक किती आहे असं ‘तिने’ विचारलं तर घरातली माणसं का चिडतात? सोप्या प्रश्नाचं अवघड उत्तर

भूक किती आहे असं ‘तिने’ विचारलं तर घरातली माणसं का चिडतात? सोप्या प्रश्नाचं अवघड उत्तर

Highlightsरात्री झोपायला गेल्यानंतर परत उठून येऊन साबुदाणा किंवा कडधान्य भिजवलं नाही अशी बाई शोधून सापडणार नाही.

गौरी पटवर्धन

भाजी कोणती करायची? या गहन प्रश्नातून फक्त एका वेळेला भाजी कशी करायची? एवढाच प्रश्न सुटतो. मग त्याबरोबर पोळी का भाकरी?  मुलांना पोळी आणि आजीआजोबांना भाकरी? वरण मुगाचं का तुरीचं? साधं की फोडणीचं? का झणझणीत तडका घालून? का हे सगळं बाजूला ठेऊन कढी करायची? भात लावायचा की नाही? का सरळ खिचडी करायची? समजा खिचडी केली तर ती मसाल्याची करायची? का बिनमसाल्याची साधी करायची? त्याबरोबर पापड तळायचे का? ताक लागेल का? लोणचं पुरेल का ताजी चटणी किंवा ठेचा करायचा?
हे सगळं ठरलं की पुढचा प्रश्न, किती करायचं? कोण किती जेवणार ते माहिती नाही. तसं विचारलं तर डायरेक्ट अपमान होतो. बरं समजा अपमान झाला नाही, तरी दोन तासानंतर आपण किती जेवणार हे कसं सांगणार? त्यात कुठली भाजी केली याने माणूस किती जेवेल यात फरक पडतोच. म्हणजे शेवभाजी किंवा बटाट्याचा रस्सा केल्यावर तीन चार पोळ्या खाणारी माणसं दुधी भोपळ्याची भाजी केल्यावर डायरेक्ट दोन पोळ्यावर येतात. त्यात त्या दिवशीची भाजी कशी झाली आहे हा मुद्दाही महत्वाचा असतोच. आता हे सगळे व्हेरिएबल्स एकत्र करून किती स्वयंपाक करायचा याचा अंदाज बांधायचा.
उरलं तर दुसऱ्या दिवशी ते शिळं कोण खाणार? ते बहुतेक वेळा घरातल्या बाईलाच संपवावं लागतं. म्हणजे कोणाला तर जिने गॅसपाशी उभं राहून अक्षरशः घाम गाळून स्वयंपाक केला, तिला दुसऱ्या दिवशी केलेला ताजा स्वयंपाक बाजूला ठेऊन आदल्या दिवशीचं शिळं संपवावं लागतं. आणि समजा केलेला स्वयंपाक कमी पडला तर? तर घरातल्या बाईला स्वतःपुरतं दुसरं काहीतरी करून घ्यावं लागतं, किंवा नुसता भात किंवा लोणचं पोळी खावी लागते. पण तो महत्वाचा असला तरी वेगळा विषय आहे. 
आत्ताच विषय हा आहे की किती स्वयंपाक करायचा?

तर हळू हळू अन्न उरत, कधी कमी पडत बायका अंदाज बांधायला शिकतात. पण किती स्वयंपाक करायचा हे ठरलं की त्यापुढचा विषय असतो तो म्हणजे त्यासाठी काही पूर्वतयारी करायला लागणार आहे का?
म्हणजे उसळ करायची असेल तर ती किमान सात आठ तास भिजवून एखादा दिवस फडक्यात बांधून ठेवली तर तिला मोड येतात. हे वेळेचं गणित उन्हाळा हिवाळा पावसाळा यात वेगवेगळं असतं. उसळीबरोबर दही किंवा ताक लागणार असेल तर त्याचं विरजण किमान सहा तास आधी लावायला लागतं. तसं असेल तर त्याच्या आधी घरात तेवढं जास्तीचं दूध असावं लागतं. म्हणजे घरी दुधाचा रतीब लावलेला असेल, तर त्याला वेळेवर जास्तीचं दूध घालायला सांगावं लागतं. तसं नसेल तर वेळेवर कोणालातरी सांगून किंवा स्वतः जाऊन जास्तीचं दूध आणावं लागतं. ज्या घरी विरजण लावून दही करत नाहीत तिथे लक्षात ठेऊन दही किंवा ताक विकत आणायला लागतं.
साबुदाणा आदल्या रात्री भिजवावा लागतो, इडलीचं पीठ भिजवून वाटून आंबवायला लागतं… आणि हे सगळं करण्यासाठी त्याचा कच्चा माल आधी घरात असावा लागतो.
म्हणजे किराणा, भाज्या, फळं, अंडी, मटण-चिकन-मासे यातलं जे काही घरात खात असतील आणि त्या भागात मिळत असेल ते, मधल्या वेळचा तयार खाऊ, पटकन करण्यासारखे इन्स्टंट नूडल्ससारखे पदार्थ आणि हे शिजवायला गॅस!
म्हणजे नुसता स्वयंपाक करायचा तर त्या घरातल्या बाईला गॅस सिलिंडर कधी बदलला होता, पुढचा सिलिंडर नोंदवला का? तो आला का? इथपासून ते एकदम घरी आणलेल्या भाज्यांमधल्या पालेभाज्या आधी संपवायच्या, मग शेंगा, मग फळभाज्या आणि शेवटी कांदेबटाटे आणि मग पिठलं-शेवभाजी असे प्रकार या प्लॅनिंगपर्यंत सगळे विचार सतत मनात ठेवावे लागतात. त्यात नॉनव्हेज खाण्याचे आणि न खाण्याचे वार असतात, उपास असतात…
रात्री झोपायला गेल्यानंतर परत उठून येऊन साबुदाणा किंवा कडधान्य भिजवलं नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. स्वयंपाकघरातून जरा बाहेर पडून हॉलमध्ये येऊन बसावं तर बाईला तिथला पसारा दिसतो. घड्या न केलेले पेपर्स, नीट न ठेवलेल्या उश्या, चुरगळलेली दिवाणावरची चादर, टिपॉयवरची धूळ… बरं बाकीचेही सगळे त्याच हॉलमध्ये बसलेले असतात. पण त्यांना हा सगळा पसारा दिसत नाही. आणि चुकून दिसलाच कधी, तर तो आवरणं ही आपली जबाबदारी आहे असं मनातच येत नाही. 
मग काहीजण बायकोला तोंडावर सांगतात,
“ए काय गं! हॉल किती घाण झालाय… लक्ष कुठे असतं तुझं?”
त्यात त्यानेच टाकलेले मोज्यांचे बोळे, कपाटात न ठेवलेले बूट, आंघोळ करून डोकं पुसता पुसता टाकलेला टॉवेल, खाऊन झाल्यावर मिरच्या आणि कढीपत्ता बाजूला करून ठेवलेली खरकटी ताटली, तळाला घोटभर चहा उरलेला आणि कडेला साय चिकटून कोरडा झालेला चहाचा कप, घडी न करता तसाच टाकलेला पेपर, सोफ्यावरून टीव्हीशेजारीसुद्धा न नेऊन ठेवलेला रिमोट असं सगळं असतं. आणि वर तोंड करून तोच बायकोला जाब विचारतो, “काय गं? लक्ष कुठे असतं तुझं?”
कारण…
ही सगळी कामं आपण करायची आहेत हे त्याला कधीच कोणी शिकवलेलं नसतं. काहीजण तोंडावर बोलतात, काही त्यातल्या त्यात सभ्य असतात ते भामट्यासारखे गप्प बसून राहतात. कधीतरी बायको किंवा आई किंवा बहीण किंवा मुलगी किंवा वहिनी आवरतेच सगळा पसारा… मग त्या स्वच्छ हॉलमध्ये पुसलेल्या टीपॉयवर पाय ठेऊन बसल्यावर त्याला चहा प्यायची तलफ येते. मग तो तिला हाक मारून सांगतो,
“अगं जरा चहा टाक गं…”
पण आपण काहीच आवराआवरी केलेली नाहीये, तर निदान जिने केली आहे तिला आपण चहा करून द्यावा असं त्याच्या मनातसुद्धा येत नाही.
कारण…
हे काम आपण करायचं आहे हे त्याला कधीच कोणीच शिकवलेलं नसतं. 
आणि तिची मात्र घरातली कामं पार रात्री झोपेपर्यंत चालू राहतात. पण दुसऱ्या दिवशीच्या कामांचा विचार त्यानंतरही थांबत नाहीच...

(लेखिका पत्रकार आहेत.)

Web Title: Mental load -women- stress of kitchen & home management, too much work no rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.