- माधुरी पेठकर
जगभरात कोरोनाने कुणाला जास्त जेरीस आणलं असेल तर ते बायकांना. त्यांच्या मन:स्वास्थ्याला! मात्र त्याचा परिणाम म्हणून बायकांमध्ये विविध ॲडिक्शनचा वाढता धोका दिसतो. कोरोनाकाळात घरून काम, घरकाम यानं तर लॉकडाऊन काळात भयंकर दमछाक केलीच; पण गृहिणींनाही या काळानं फार दमवलं! भारतात या काळात बायकांचं मन:स्वास्थ्य कसं होतं याची आकडेवारी हाताशी उपलब्ध नसली तरी अलीकडेच एक अमेरिकन अभ्यास वाचला. अमेरिकेन मेण्टल हेल्थ इंडेक्सचा हा अभ्यास. महिलांच्या मानसिक आरोग्याबाबतचे पाहणी निष्कर्ष त्यांनी नुकतेच जाहीर केले. त्यांचं म्हणणंच आहे की, गेल्या सप्टेंबरपासून आतापर्यंत महिलांमधील ड्रग आणि व्यसनाचा धोका ६५ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणजे महिलांमधे अपुऱ्या झोपेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नोकरी करणाऱ्या महिलांमधे स्लीप ॲप्निआ (झोपेत श्वास बंद होण्याचा) धोका १२६ टक्क्यांनी वाढला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा की महिलांमध्ये ताण, भीती आणि नैराश्य वाढलेलं दिसत आहे. मात्र, त्याचा परिणाम महिलांच्या वाढत्या व्यसनावर होऊ शकतो, असंही हा अभ्यास सांगतो.
मानसिक अस्वास्थ्य आणि महिलांमधली व्यसनाधीनता यांचं काही नातं खरोखर असतं का, ते आपल्या समाजातही दिसतं का? यासंदर्भात ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर सांगतात, आपल्याकडे महिलांमधे ड्रग्ज, दारू, सिगारेट, तंबाखू, विशिष्ट औषधांचं सेवन या स्वरूपाचं व्यसन केलं जातं. पूर्वी हे प्रमाण अगदीच कमी होतं; पण गेल्या वीस वर्षांपासून मात्र हे चित्रं बदलतंय. महिलांमधलं व्यसनाचं प्रमाण वाढतंय. पुरुषांइतकं नसलं तरी प्रमाण वाढतंय हे नक्की. मुख्य म्हणजे कोणत्या एका विशिष्ट सामाजिक स्तरातल्या महिलांमधेच व्यसनाची समस्या वाढते आहे असं नाही, तर गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय या सर्वच सामाजिक स्तरातील महिला व्यसन करतात. आता महिलांनी व्यसन करण्यास एक सामाजिक स्वीकार्यता आली आहे. पूर्वी हा स्वीकार नव्हता. पार्ट्यांमध्ये आता पुरुषांइतकाच महिलांनाही मद्य प्राशनाचा आग्रह केला जातो. महिलांच्या दारू पिण्याला एक ग्लॅमर, स्टेटस चिकटलं आहे. आता तर हिंदी, मराठी चित्रपटातही महिलांनी दारू पिण्याचं उदात्तीकरण होऊ लागलं आहे. त्यामुळे तरुण मुलींमधेही याचं आकर्षण निर्माण झालं आहे.
हे सगळं होत असताना दुसरीकडे ताणाचे वाढते प्रश्न आहेत. घरात तणाव असला, मनावर कसलं ओझं असलं तर ती शेजारीपाजारी बोलून-रडून मोकळी व्हायची; पण आताच्या महिलांमध्ये घुसमट वाढली आहे. आपण शिकलेल्या आहोत. स्ट्राँग आहोत, रडगाणी गाणं आपल्याला कसं शोभेल या विचाराने अनेकजणी दु:ख, ताण स्वत:कडेच ठेवतात. या नकारात्मक बाबी मनातच दाबल्या गेल्याचा त्रास व्हायला लागतो आणि मग हा त्रास व्यसनासारख्या चुकीच्या पद्धतीने हाताळला जातो.
मात्र, त्याचे परिणाम गंभीर दिसतात.
१. महिलांमधील व्यसनाधीनतेचा परिणाम व्यापक आणि जास्त गंभीर असतो. स्वत:साठी आणि इतरांसाठीसुद्धा. महिलांमध्ये व्यसनामुळे त्यांचं शारीरिक नुकसान जास्त होतं. प्रजनन ही स्त्रीमधील वैशिष्ट्य आणि ताकदही असते. व्यसनाचा मोठा दुष्परिणाम महिलांच्या प्रजनन यंत्रणेवर होतो. त्यामुळे मूल न होणं, वारंवार गर्भपात होणं या समस्या दिसून येतात. व्यसनाचा महिलांच्या लिव्हरवर जास्त आणि पटकन परिणाम होतो.२. शारीरिक दुष्परिणामांसोबतच कुटुंबावर, नातेसंबंधावर होणारे परिणामही गंभीर असतात. घरातील महिला किंवा आई ही जर व्यसन करीत असेल तर संपूर्ण कुटुंब कोलमडून जातं. मुलांवर, त्यांच्या मानसिकतेवर मुलांसोबतच्या नात्यावर परिणाम होतो.
या व्यसनांवर ताबा कसा ठेवायचा?- मुक्ता पुणतांबेकर सांगतात,महिलांमधे वयानुरूप नैराश्याची समस्या उद्भवते, तसेच वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत शरीरात हार्मोनल बदल होत असतात. काही जणींना पाळी येण्याआधी नैराश्य येतं. काही जणींना पाळी सुरू असताना, काही जणींना पाळी झाल्या झाल्या किंवा चाळिशीनंतर डिप्रेशन येतं. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजेच बाळंतपणानंतरचं नैराश्य ही देखील महिलांमधील मोठी समस्या आहे आणि ती वाढतच चालली आहे. डिप्रेशन महिलांमधील व्यसनाचं महत्त्वाचं कारण आहे. जवळच्या माणसांशी बोलायला हवं, आवश्यक तिथं व्यावसायिक समुपदेशनाची मदत घ्यायला हवी. जर डिप्रेशन जास्त गंभीर असेल तर समुपदेशनाबरोबरच औषधोपचारांची गरज असते. ताणतणाव-व्यसन-कलह-नैराश्य आणि व्यसन ही साखळी तोडणं सहज शक्य आहे. फक्त महिलांनी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
madhuripethkar29@gmail.com