Join us  

दमलेल्या मेंदूची गोष्ट ! - कोरोनाच्या अस्वस्थतेने मेंदूला शिण आला तर काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 1:27 PM

इटलीत महिला शिक्षकांसाठी माइण्डफुलनेसचा एक ८ आठवड्यांचा उपक्रम चालवण्यात आला. अस्वस्थता आणि कठीण काळ यात कोण कसं वागतं?

ठळक मुद्देजेव्हा हातात काहीच नसतं, तेव्हा स्वत:ला समजून घेत, प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणं एवढं तरी आपल्या हातात नक्कीच असतं.

अनन्या भारद्वाज 

२०२० उजाडलं तेव्हा कुणाला वाटलं होतं की, या वर्षात कोरोना नावाचं संकट येईल आणि आपण सारेच घरबंदी होऊन कोंडून घेऊ आपलंच आयुष्य. पण तसं झालं. मानवी बुध्दी आणि नियंत्रण यांच्या आवाक्यात नसल्यासारखं हे संकट आलं आणि सारं जग हतबल झालं. एकाएकी जगण्याचा ताण वाढला. तणाव इतका की कार्यपध्दती बदलल्या. हाती असलेली साधनं मर्यादित तर झालीच पण पैशाची आवक घटली. जगात कुणीही माणूस यासाऱ्यापासून लांब राहू शकला नाही, प्रत्येकाला त्याची झळ बसली. अस्वस्थतेनं घेरलं माणसांना, जगण्याचे श्वास कोंडले गेलेच पण सारंच किती तात्पुरतं आहे, आपल्यापासून आपली माणसंही सोशल डिस्टन्सिंग म्हणून दुरावली हे सारंच भयप्रद होतं.परिणाम असा की अस्वस्थता, ताण, टोकाची चिडचिड, भय आणि अस्थैर्यानं माणसांना घेरलं. याचकाळात मग जगभर माणसं शोधू लागली की आपली जगण्याची रीत काही चुकतेय का? 

आपण काय केलं तर आपलं आयुष्य अधिक सुखकर होईल, स्थैर्य येईल आणि जरा शांतताही मिळेल.

त्याचं एक उत्तर जगानं याकाळात माइण्डफुलनेस या शास्त्रात शोधण्याचा प्रयत्न केला. वर्तमानात नव्हे तर प्रत्येक क्षणात जगा, जे आहे ते अनुभवा, डाेक्यातला कलकलाट कमी करा, हे सारं सांगणं सोपं पण करणं अवघड.

मात्र याच काळात इटलीत शिक्षकांसाठी, त्यातही महिला शिक्षकांसाठी माइण्डफुलनेसचा एक उपक्रम चालवण्यात आला. ८ आठवड्यांचा. या शिक्षकांच्या मनस्वास्थ्यावर त्यांच्या या माइण्डफुलनेस ध्यानाचा काय परिणाम होतो, ते अस्वस्थता आणि कठीण काळ कसा हाताळतात याचा अभ्यास करण्यात आला. अमेसिओ मेटीज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला. तोच अभ्यास अलीकडेच इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेण्ट रीसर्च ॲण्ड पब्लिक हेल्थमध्ये नुकतास प्रसिध्द करण्यात आला. हा अभ्यास म्हणतो की, जेव्हा काळ कठीण असतो, अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात, ताण वाढतो, अनियंत्रीत भवतालाशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं त्याकाळात स्वसंवाद आणि मेंदूला देण्यात येणाऱ्या सूचना, भावना पाहत त्यांना हाताळणं हे सारं स्व नियंत्रित टप्प्याून केलं तर त्याचा उपयोग अस्वस्थता कमी करण्यासाठी होऊ शकतो. आपण अगदी ‌थकून गेलो आलो आहोत, मेंदूला शीण आला आहे त्या थकव्यातून मेंदूला बाहेर काढून वर्तमानात जगणं आणि उमेद ठेवून प्रयत्न करत राहणं हे या माइण्डफुलनेस ध्यानातून होऊ शकतं असं या अभ्यासाचं म्हणणं..

जेव्हा हातात काहीच नसतं, तेव्हा स्वत:ला समजून घेत, प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणं एवढं तरी आपल्या हातात नक्कीच असतं.

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्य