आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा घटना असतात आणि त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर, बोलण्यावर होत असतो.कधी आपण दुखावले जातो तर कधी आपल्याला राग येतो.कधी मन नैराश्यानं भरून जातं. तर कधी चिंतेचं काहूर मनावर पसरत जातं. कधी अपराधीपणाची भावना मनाला टोचत राहते. तर कधी वैफल्याची भावना मनाला पकडून राहते.रागाच्या भरात आपण कुणाला तरी काहीतरी बोलतो नाहीतर आतल्या आत धुमसत राहतो. चिंतेनं अस्वस्थ होतो. नैराश्य आलं की ऊर्जा संपल्यासारखे बसून राहतो. विनाकारण चिडचिड करत राहतो..म्हणजेच आपल्या जगण्यात आपण विविध प्रकारच्या भावनांना सामोरे जात असतो. विविध प्रकारच्या भावना अनुभवत राहतो आणि त्याचा आजच्या वागण्यावर-बोलण्यावर परिणाम होतो. म्हणजेच आपल्या कोणत्याही कृतीमागे भावना या गोष्टीची ऊर्जा असते. आपल्या कृतीच्या मागची ताकद, आपल्या वागण्यावर, बोलण्यावर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे भावना. या भावना खरंतर असतातच. या भावना आहेत म्हणून आपल्याला काही वाटत राहतं. जाणवत राहतं म्हणजेच भावना ही एका अर्थानं आपल्या आत घडणाऱ्या किंवा बाहेर वातावरणात घडणाऱ्या घडामोडींना दिला जाणारा प्रतिसाद आहे. मला परीक्षेत कमी मार्क मिळाले तर ही मनात घडणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे मनात ती भावना निर्माण होते ती चिंतेची आहे.परीक्षेचा निकाल लागला आणि मला खूपच कमी गुण मिळाले ही बाह्य जगात घडणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे मनात निर्माण होणारी भावना नैराश्याची आहे. म्हणजेच भावना हा एक प्रकारचा प्रतिसाद आहे. मनात किंवा बाहेर घडणाऱ्या घडामोडींना (ज्या मला महत्त्वाच्या वाटतात) दिला जाणार प्रतिसाद! भावना या आपल्या जगण्यात उपजत असतात. आपण अगदी माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात वाकून पाहिलं तर या भावनांचं अस्तित्व आपल्याला जाणवेल. माणूस जसजसा प्रगत होत गेला तसतसा कदाचित त्या भावनांमध्येही फरक पडत गेला, पण आदिमानवाच्या काळात माणूस जंगलात रहात असताना या भावनांमुळेच जगण्याची उत्तरं शोधत गेला. या लढय़ात जिवंत रहाण्याची ऊर्मी, स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची धडपड या पाठीमागे भावनाच कार्यरत होत्या. माणसाचा हा लढा काळानुरूप जीवन-मरणाशी निगडित न राहता वेगळ्या गोष्टींसाठी बदलत गेला. आजही आपण धडपड करतो, झगडत राहतो याही पाठीमागे भावनाच आहेत.
म्हणजेच भावना ही एका प्रकारे आपल्या जगण्यातली ऊर्जा आहे. या भावनांच्या राज्यात आपण असेच काही समानार्थी शब्द वापरत असतो. मूड -फिलिंग्ज.‘काय आज मूड बरा दिसत नाही तुमचा?’ ‘सकाळपासून मूडच गेला माझा..’ असं काहीसं आपण नेहमीच बोलत असतो.. किंवा ‘त्याचा ना सारखा या ना त्या कारणानं पापड मोडतो..’ (म्हणजे सारखा मूड जातो) असे बरेचसे वाक्प्रचार आपण जेव्हा मूडबद्दल बोलतो तेव्हा वापरत असतो. भावना ही जसा प्रतिसाद त्यावेळी त्या क्षणाला जाणवणारी, काही थोडा काळ टिकणारी गोष्ट असेल; तर मूड मात्र बराच काळ राहणारी गोष्ट आहे. जसं की, आज दिवसभर माझा मस्त मूड होता’ पण मूड या गोष्टीची तीव्रता मात्र भावनेपेक्षा कमी असते.कोणत्याही गोष्टीचा अतिशय वैयक्तिक पातळीवरचा अनुभव असतात या भावना. या वाटण्याला एक प्रकारचा खासगीपणा असतो. कारण त्या क्षणाला जे काही जाणवत असतं ते त्याच माणसाला जाणवत असतं. म्हणजेच भावनाचं एक खासगी स्वरूप म्हणजे वाटणं असंही म्हणायला हरकत नाही.भावना या आपल्या रोजच्या जगण्यातल्या आणि आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी..त्यामुळे आपण आपल्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे. भावना न नाकारता, आपण असेच का वागलो असे न म्हणता, आपल्या भावना ओळखून रिॲक्ट न करता, रिस्पॉन्स करायला शिकलं पाहिजेे..आपण स्वत:शी संवाद वाढवला तर हे भावना समजून घेणं जमेलही आपल्याला. भावना कण्ट्रोल करण्याचा विचार करण्यापेक्षा त्यांना आपण देत असलेला प्रतिसाद समजून घेऊ.मग आपला मूड सारखा सारखा जाणार नाही.