Lokmat Sakhi >Mental Health > Mother's day : कोरोनाकाळात ‘आईच्या’ वाट्याला आलेल्या न्यू नॉर्मलची  गोष्ट ! जी म्हणतेय, बचेंगे तो....

Mother's day : कोरोनाकाळात ‘आईच्या’ वाट्याला आलेल्या न्यू नॉर्मलची  गोष्ट ! जी म्हणतेय, बचेंगे तो....

कोरोनाकृपेनं वर्क फ्रॉम होम सुरु झालं, घरची भांडी घासा आणि ऑफिसची कामंही उपसा असं न्यू नॉर्मल सुरु झालं. त्यात रोज ऐका, नोकरी टिकवायची असेल तर पळा, लाइफ इज रेस, भागो. आणि मुलं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि क्वालिटी टाइम देणं ही पण आईचीच जबाबदारी असं ठरलं तो लॉकडाऊन काळ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:29 PM2021-05-09T12:29:01+5:302021-05-09T14:48:29+5:30

कोरोनाकृपेनं वर्क फ्रॉम होम सुरु झालं, घरची भांडी घासा आणि ऑफिसची कामंही उपसा असं न्यू नॉर्मल सुरु झालं. त्यात रोज ऐका, नोकरी टिकवायची असेल तर पळा, लाइफ इज रेस, भागो. आणि मुलं, त्यांच्यावर संस्कार करणं आणि क्वालिटी टाइम देणं ही पण आईचीच जबाबदारी असं ठरलं तो लॉकडाऊन काळ..

Mother's Day : life of a mother in corona lockdown & story of a motherhood in new normal. | Mother's day : कोरोनाकाळात ‘आईच्या’ वाट्याला आलेल्या न्यू नॉर्मलची  गोष्ट ! जी म्हणतेय, बचेंगे तो....

Mother's day : कोरोनाकाळात ‘आईच्या’ वाट्याला आलेल्या न्यू नॉर्मलची  गोष्ट ! जी म्हणतेय, बचेंगे तो....

Highlightsकोरोनाकाळानं आईलाच परीक्षेला असं बसवलं. पण आईच ती अशी परीक्षांना थोडीच घाबरणार..

अनन्या भारद्वाज


परवाचीच गोष्ट मोठा वाद झाला मैत्रिणीशी. ती मला सांगत होती की, तुझा मुलगा तिसरीत जाणार तर त्याला तू आता ड्रॉइंग, अब्याकस, गाण्याचा क्लास, तबल्याचा क्लास असं काहीतरी लाव की ऑनलाइन.
जरा शांत बसेल एकाजागी पोरगं. आणि शिकेलही काहीतरी. फार महत्वाचं आहे, आता अनेक गोष्टी शिकणं.
केवढा वाद घातला तिच्याशी की, हे ऑनलाइन शिक्षणच मला मान्य नाही. आठ-नऊ वर्षाच्या मुलांना काय कम्प्युटरवर शिकवायचं? ते काय शिकणार? लोळू दे घरात.
त्यामुळे आपलं मूल ढ गोळा राहिलं तरी चालेल पण शिकवण्या त्याही ऑनलाइन सुरु करायच्या नाही यावर मी ठाम होते. पण मग शाळेनंच कळवलं की, आम्ही ऑनलाइन येतोय. जास्त नाही फक्त सव्वा तास ऑनलाइन बाकी ऑफलाइन शिकवू.
आलं का परत संकट?
माझा तर ऑनलाइन शिक्षणालाच विरोध आहे.
पण मग  विचार केला की मी कोण?


शहरी मध्यमवर्गीय नोकरदार आई. माझ्याच कंपनीत रोज उटून कोणकोणाला काढलं या बातम्या ऐकूनही मी हतबलच असते. काही पेटून उठूत नाही. घरात निमूट काम करते की ही तर आपलीच जबाबदारी आहे म्हणत. आणि सामाजिक जबाबदारी म्हणून फार तर मदतीला येणाऱ्या मावशीना दरमहा पगार घेऊन जा असं सांगतेय.
याहून जास्त माझ्या हातात आत्ता नियंत्रण म्हणून तरी काय उरलं आहे?
त्यामुळे हताश न होता, जे पर्याय समोर आहेत त्याचा विचार करावा.
जगभरात लोक सांगत आहेत ना सध्या प्रॉब्लम ओरिएंटेड नाही सोल्यूशन ओरिएंटेड व्हा.
मग होऊ म्हटलं तसंच.
म्हणून मग मुलालाच समोर बसवलं.
त्यालाच सांगितलं की, तुझी शाळा, शाळेतल्या टिचर रोज तुला ऑनलाइन शिकवणार आहेत. तू बसणार का त्या वर्गात? ( तेवढीच घरात लोकशाही झिंदाबाद, उद्या त्यानं म्हणू नये की मला हवं होतं तू नाही म्हणालीस!’)
तर तो म्हणाला हो, ते झूम करणार की गुगल डय़ुओ की गुगल क्लासरुम? फार होमवर्क देणार, की थोडाच देणार? आणि बोअर झालं तर मी बसणार नाही .हे चालेल?
मी हो म्हणाले.
आणि ठरवून टाकलं, तासभर एकाजागी शांत बसतंय ना पोरगं तर बसू देत. शिकलं काही तर उत्तम. नाहीतर रोज ;तो मोबाइलवर गेम खेळतोच, युटय़ूबवर कार्टुन पाहतोच.
अजून एक, कोरोना काळात मन मारत सारं जग जगलं, तोच अनुभव लेकरांच्या वाट्यालाही आलाच. आठवणी बऱ्या नसतील या पण मोठे, जाणते होतील तेव्हा ‘माणूसपण’ आठवेल त्यांना, या काळातलं.
बाकी आई म्हणून आपण काय करु शकतो या काळात?
पण सोपं नव्हतचं गेलं वर्षभर हे आईपण निभावणं.
कितीदा वाटलं, पळून जावंसं. वैताग वैताग झालाय असंही वाटलं.
आणि वरुन सल्ले ऐका, वर्तमानपत्रत लिहिणाऱ्या (काही) महिला आणि पुरुषांचे की, बायकांनाच सुपरवूमन व्हायचं आहे, त्याच फुटबॉल मॉम झाल्या आहेत.
त्यांना सांगावंसं वाटतं, बाबा किंवा बाई तू ये, कर माझी चार कामं मग बोल.
तर हे मरो, हे जुनंच नॉर्मल आहे.
आता नवीन नॉर्मलची कथा ऐका.
कोरोनाकृपेनं वर्क फ्रॉम होम सुरु झालं, घरची भांडी घासा आणि ऑफिसची कामंही उपसा असं न्यू नॉर्मल सुरु झालं. त्यात रोज ऐका, नोकरी टिकवायची असेल तर पळा, लाइफ इज रेस, भागो.
आणि नवरा घरीच, मुलं तर काय घरीच, सगळे घरीच, त्यात फोनवर विविध पाककृतीदर्शन सोहळे, मुलांना शिकवूनच सोडण्याचे अट्टहास सुरु झाले.
म्हणजे डोक्याला ताप वाढला, आपण तिथंही कमीच पडणार हे माहिती.
तर हे सगळं नव्यानं अगं अगं म्हशी मला कुठं नेशी सुरु झालं.
त्यात त्या झूम मिटिंगा, ते वेबिनार, ते ऑनलाइन प्रवचनं सगळं सुरु झालं.
तर आता कालचीच गोष्ट, माझ्या बॉसला टीमला मोटिव्हेट करायची हुक्की आली. 
म्हणजे येतेच ती तशी अधुनमधुन.
तर त्यांनी लिंक धाडली शुक्रवारी सकाळी १० वाजता, सी यू ऑल, लेट्स टॉक समथिंग लाइफ चेंजिग!
न ऐकून सांगतो कुणाला, केले अंगठे वर!
त्याच दिवशी सायंकाळी मुलाच्या शाळेकडून मेसेज आला की, शुक्रवारी दहा वाजता पालकांचं ऑनलाइन ओरिएंटेशन. शाळा ऑनलाइन सुरु होणार आहे.
आलं की नाही धर्मसंकट ? तिकडे बॉस, इकडे मुलगा.
काय बुडवावं असा विचार सुरुच होता, बॉसला तर काही सांगूच शकत नाही, वर्कफ्रॉमहोम करताना झूम कॉलमध्ये कुणाच्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला तरी बॉसेसचे चेहरे असे होतात जसे  लहानपणी हे कधी रडलेच नाही.
मग मुलाला सांगितलं की, बाबा रे तुझ्या शाळेचं ओरिएंटेशन आहे पण मला नाही जमणार बाबाला सांगू. पण तेवढय़ात बाबा म्हणाला, मला उद्यापासून ऑफिसला जायचंय मला धरु नका आता तुमच्यात.
झाला ना वैताग?
चि-ड-चि-ड झाली. कलकलाट नुस्ता, कुणाच्या डोक्यात आपला कम्प्युटर घालावा काही कळेना.
पण मग म्हटलं बाई गं, हेच न्यू नॉर्मल आहे.
मुलगा ऑनलाइन शिकणार, तू वर्क फ्रॉम होम आहे.
होऊ द्या आता पुनश्च हरिओम.
या गोष्टीत मार्ग कसा काढला म्हणता? - बॉसच्या बॉसने त्याचवेळी त्यांची झूम लावली त्यामुळे ती लाइफ चेंजिंग झूम मिटिंग काही झाली नाही, आणि मी शाळेच्या संचालकांच्या प्रवचनाला बसले, पालकांनी कसं आता मूलकेंद्री शिक्षणाला सहाकार्य करायला हवं यावर बोधामृत प्राशन केलं!
आणि मग सुरुच राहिली वर्षभर ही कहाणी. कोरोनाकाळानं आईलाच परीक्षेला असं बसवलं.
पण आईच ती अशी परीक्षांना थोडीच घाबरणार..
जगभरात आया अशा परीक्षा देत आहेत, म्हणत आहेत बचेंगे तो और भी लडेंगे!


(लेखिका मुक्त पत्रकार आहे आणि १० वर्षाच्या मुलाची आई आहे.)

Web Title: Mother's Day : life of a mother in corona lockdown & story of a motherhood in new normal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.