डॉ. श्रुती पानसे
गाणं आपल्या आवडीचं असेल तर नकळत आपले हात, आपले पाय त्या गाण्यावर ठेका धरायला लागतात. आपण त्या गाण्याला दाद द्यायला लागतो. गाणं फारच आवडलं असेल तर आपल्याला स्वस्थ बसवत नाही. आपल्याला मनापासून नाचावसं वाटतं. याचं कारण असं आहे की छान संगीत आपल्या मेंदूत अशा लहरी निर्माण करतं, की ज्यामुळे आपल्याला आनंद होतो. अगदी लहान बाळसुद्धा लक्षपूर्वक संगीत ऐकत असतं. त्यातून ते आनंदच मिळवत असतं.
आपण घरात असताना, वर्गात असताना कुठेही संगीताची एखादी सुरावट ऐकू आली की आपलं लगेच लक्ष जातं. आणि ते ऐकण्याचा प्रयत्न आपण नकळतच करतो. कारण हेच की, संगीत आपल्याला मुळापासूनच आवडत असतं.
हे संगीत आपल्या भावना हव्या तशा वळवू शकतं. जसं, एखादं संगीत आपल्याला गुणगुणायला लावतं, तर एखाद्या भीतीदायक सिनेमात वापरलेलं नुसतं संगीतसुद्धा आपल्या मनात भीती निर्माण करतं. एखादं गाणं असं असतं की ज्यामुळे आपण हळवे होतो. ढोल-लेझीमचा आवाज तर आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातो. कोणत्याही प्रकारचं चांगलं संगीत, चांगलं गाणं, चांगलं वाद्यवादन ऐकणं हे केव्हाही मेंदूला पोषक असतं.
(Image : Google)
संगीत ऐकत इफेक्टिव्ह काम कसं करता येईल?
१. अभ्यास करताना ऐका गाणी..
संगीत आनंद निर्माण करतं, म्हणून तर अभ्यासात संगीताचा वापर जरूर असावा, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अभ्यासाला बसताना किंवा अभ्यास चालू असतानाही मंद संगीत लावलेलं केव्हाही चांगलंच. अभ्यास रूक्ष वातावरणातच करायला हवा असं काही नाही. अगदी गाणं म्हणत, गुणगुणत केलेला अभ्यास परिणामकारक ठरतो. पाढे पाठ करणं हे खूप एकसुरी असतं. पण तेच जर तालासुरात म्हटले तर चटदिशी पाठ होतात असे प्रयोग झाले आहेत. तुम्हीही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. ज्या संकल्पना पाठ होत नाहीत, त्यांना छानशी चाल लावा. म्हणून बघा. अशा पद्धतीनं स्वत:च चाल लावली तर फारच चांगलं. नाही तर इतर कोणाची मदत घेऊन चाल लावायचा प्रयत्न करा. लवकर पाठ होतात.
आपण सततच वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवत असतो. अशा सर्व प्रकारच्या माहितीचा साठा करून ठेवणं हे देखील मेंदूचं एक काम असतं. ही माहिती संगीतमय असली तर मेंदू ती पटकन लक्षात ठेवू शकतो. अशा संगीतमय गोष्टी लक्षात ठेवणं मेंदूला फार सोपं पडतं.
(Image : Google)
२. मेंदूला चालना..
संगीत हे मेंदूच्या पेशींवर सकारात्मक परिणाम करत असतं. ज्यावेळेस आपण स्वत: कोणत्याही वाद्यातून एखादी सुरेल सजावट वाजवत असतो, तेव्हा आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूतली जास्तीत जास्त केंद्रं उद्दीपित झालेली असतात. वाद्यवादनामुळे मेंदूला चालना मिळत असते. तो एकप्रकारे मेंदूचा व्यायाम आहे.
एखादं उत्तम गाणं ऐकणं, गाणं म्हणणं, वाद्यवादन ऐकणं, नृत्य करणं या संगीताशी संबंधित गोष्टी मेंदूमध्ये आनंदाचं वातावरण तयार करतात. दिवसातून काही काळ जरी आपण उत्तम संगीताच्या सान्निध्यात राहिलो तरी मेंदूला त्यामुळे गती मिळते. आपण कुठलंही काम करताना संगीत ऐकू शकतो.
याचं कारण आपल्या मेंदूचा संगीताशी जवळचा संबंध असतो. प्रसिद्ध न्यूरो शास्त्रज्ञ डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी ‘संगीतविषयक बुद्धिमत्ता ’ही नवीन संकल्पना मांडली आहे. संगीत ही नुसती आपली आवड नसते. तो आपला छंद नसतो. तर ती एक बुद्धिमत्ता असते. असं ते म्हणतात.
(लेखिका मेंदू आणि अभ्यास तज्ज्ञ आहेत.)