Join us  

‘नकोशी ’ असा जन्मत: ठप्पा मारलेल्या मुलींच्या मानसिक संघर्षाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:59 PM

मुलगी नकोच या वृत्तीतून ज्या मुलींना जन्मापासून कमी लेखले जाते, त्यांच्या वाट्याला किती मोठा मानसिक झगडा येतो, याची आपल्याला कल्पना तरी आहे का?

ठळक मुद्देकाहीही चूक नसताना जन्मताच अनेक मुलींच्या वाट्याला हा मानसिक झगडा येतो.

डॉ. निलेश मोहिते

मागच्या महिन्यात माझ्या एका काउन्सिलर मैत्रिणीचा फोन आला. म्हणाली, मला कौन्सिलिंगची गरज आहे. कारण की कुठल्याही पेशंट बरोबर बोलताना त्यांच्या आईवडिलांचा विषय निघाला की या मैत्रिणीलाच एकदम  त्रास व्हायला लागायचा. तिला स्वतःचं लहानपण आठवायचं.विदर्भातील ग्रामीण भागातून अत्यंत हालाखीच्या कठीण परिस्थितीतून ही मैत्रीण पीएचडीपर्यंत शिकल. तिच्या आईला पहिल्या दोन मुली झाल्यामुळे तिच्या वडिलांनी तिच्या आईशी फारकत घेऊन दुसरं लग्न केलं होतं. एकटीने दोन मुलींना सांभाळणं तिच्या आईला फार अवघड गेलं. तिच्या आईबरोबरच माझी ही मैत्रीण या सर्व प्रवासामध्ये भरडली गेली. आपण जन्माला आल्यामुळे आपल्या आईला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला या समजुतीमुळे तिच्या मनात लहानपणापासून अपराधी भावना निर्माण झाली. आईची ओढाताण, चिडचिड, गरिबी आणि अपराधीपणाची भावना यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला.आपण जन्मालाच का आलो जन्मताच मरून का गेलो नाहीत असे विचार सारखे तिच्या मनात कधीकाळी येत. प्रेम करणारे इतरांचे वडील बघितले कि आपल्याला वडील नसल्याची जाणीव प्रचंड त्रास द्यायची. या त्रासाला कंटाळून तिने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.तिच्याशी बोलल्यावर, तिनेही स्वत:वर काम केल्यावर हा मनातला गुंता सुटेल अशी आशा आहे.

मात्र हा प्रश्न तिच्या एकटीचा आहे का?तर नाही. काहीही चूक नसताना जन्मताच अनेक मुलींच्या वाट्याला हा मानसिक झगडा येतो. अजूनही भारतातल्या बऱ्याचशा भागामध्ये मुलीचा जन्म अडचणीचा मानला जातो. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्येसुद्धा स्री भ्रूण हत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. काही वर्षांपूर्वी गाजलेलं बीड मधील डॉक्टर मुंडे प्रकरण सगळ्यांना आठवत असेल.        अजूनही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बऱ्याचशा मुलींचे नाव "नकोशी" म्हणून ठेवले जाते. जेव्हा प्रथम मी हे नाव ऐकले त्यावेळी मला विश्वासच बसला नाही. नंतर समजले एका सामाजिक संस्थेने साधारण ३०० नकोशी नाव असलेल्या मुलींचे नाव बदलण्यासाठी मदत केली होती. " नकोशी " हे नाव आपल्याला का दिले गेले या गोष्टीचा विचार करताना तीच्या बालमनावरती काय परिणाम होत असतील याचा आपल्या समाजाने कधी विचारच केला नाही का...?नकोशी म्हणून जन्माला आलेल्या मुलींबरोबरच त्यांच्या आईच्या मनावर या गोष्टीचा काय परिणाम होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. अजूनही खूप मुलींना गर्भधारणा झाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा मुलगा असेल कि मुलगी असेल या चिंतेनेच ग्रासले जाते त्यामुळे खूप गरोदर स्त्रिया डिप्रेशनच्या शिकार होतात. सरकारकडून गरोदर स्त्रियांना लोह आणि कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटप केले जाते. पण शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित कसे राहता येईल याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. इथे फक्त स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा विचार न करता तिच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करणं गरजेचं असतं. होणारे अपत्य मुलगा किंवा मुलगी काहीही असले तरी त्यांचा विवेकबुद्धीने स्वीकार करणं आपल्या समाजाला शिकवण्याची गरज आहे.काही महिन्यांपूर्वी मला अमेरिकेमध्ये मध्ये राहणाऱ्या एका भारतीय जोडप्याचा फोन आलेला. होणाऱ्या आईचे मानसिक स्वास्थ्य कसे जपता येईल यासाठी त्यांना मार्गदर्शन हवे होते. अशा प्रकारचा कॉल मला पहिल्यांदाच आला होता. त्यांना मार्गदर्शन करताना सतत मला आपल्या ग्रामीण भागातील असंख्य असह्य महिला आठवत होत्या. कदाचित तिकडे असणारी आर्थिक आणि सामाजिक सुबत्ता यासाठी कारणीभूत असावी असा विचार मनात येऊन गेला. आपल्याला ती सुबत्ता मिळवण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागणार आहे किंवा कदाचित आपण तिथे कधीच पोहचू शकणार नाही. हा विचार करत असतानाच मला आमचे गरीब आणि मागासलेले समजले जाणारे आदिवासी आठवले. भारतभरातल्या आदिवासी समाजामध्ये स्री पुरुष समानता नैसर्गिकरीत्या आढळते. त्यांच्याकडे मुलीचा जन्म कलंक म्हणून बघितला जात नाही. खरंच कोण मागासलेलं आणि कोण पुढारलेलं हे ठरवण्याची वेळ आता आपल्यावर येऊन ठेपली आहे.

( लेखक कम्युनिटी सायकॅट्रिस्ट असून आसाम-अरुणाचल प्रदेशात कार्यरत आहेत.)nmohite9@gmail.com

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्यस्त्रीभ्रूणहत्या