Lokmat Sakhi >Mental Health > काहीही झालं तरी खचून जायचं नाही हे शिकवणारा निसर्ग असतोच सोबत, आपण पाहिलं तर..

काहीही झालं तरी खचून जायचं नाही हे शिकवणारा निसर्ग असतोच सोबत, आपण पाहिलं तर..

प्रभात पुष्प  : निसर्ग शिकवतोच आपल्याला, पुन्हा पुन्हा स्वत:ची काळजी घेणं... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 04:29 PM2022-07-14T16:29:48+5:302022-07-14T16:34:16+5:30

प्रभात पुष्प  : निसर्ग शिकवतोच आपल्याला, पुन्हा पुन्हा स्वत:ची काळजी घेणं... 

nature teaches us how to live happy, listen to nature : Prabhat Pushpa | काहीही झालं तरी खचून जायचं नाही हे शिकवणारा निसर्ग असतोच सोबत, आपण पाहिलं तर..

काहीही झालं तरी खचून जायचं नाही हे शिकवणारा निसर्ग असतोच सोबत, आपण पाहिलं तर..

 अश्विनी बर्वे


सकाळी/पहाटे फिरायला जाशील तेव्हा छत्री घेऊन बाहेर पड. एक सल्ला. आमची कॉलनी म्हणजे एक अखंड सल्लागार मंडळ आहे. इथे तुम्हाला कशावरही आणि कोणीही सल्ला देऊ शकते. प्रत्येकाच्या क्षमता अप्रतिम आहेत. अर्थात त्याबद्दल परत नंतर कधीतरी.
एक तर माझी छत्री मला कधीच सापडू नये, अशी मी नी ऽऽऽऽट ठेवलेली होती. पण माझं छोटंसं दुःख मी कोणाला सांगायचा प्रयत्न केला नाही.
छत्री का तर, आमच्या घरासमोरच्या आंब्यावर कावळ्यांनी घरटी केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सामुदायिक सोहळा झाल्याचे मला आठवले. कारण एका घरट्यात कावळा किंवा कावळी आपल्या घरट्यात बसली होती आणि त्यांचे बांधव अभिनंदन करण्यास मोठ्या संख्येने जमले होते. मूल जन्माला येण्याचा आनंद ते कॉलनीत प्रचंड कावकाव करून साजरा करत होते. कदाचित ते हे माणसांकडूनच शिकले असतील.
त्या आंब्याच्या झाडावर चार-पाच घरटी होती, त्यामुळे आम्ही झाडाखालून जात असताना ते सगळे कावळे जोरजोरात ओरडायचे. ज्या लोकांना माहीत नव्हते त्यांना कावळ्यांनी टोच्या मारल्या. काहींना त्यांची चोच डोक्याला जबरदस्त लागली, त्यामुळे जखम झाली.
आम्ही गच्चीतून दुर्बीण घेऊन कावळ्यांच्या घरट्यात पाहायचो, तर ते आमच्याभोवती कलकलाट करायचे. आम्हाला पाहायचे होते की, खरंच कोकिळा त्या घरट्यात अंडी घालते का? पण कावळ्यांना त्यांच्या खासगी प्रश्नात लक्ष घातलेले आवडत नव्हते. ज्यांच्या अंगणात आंब्याचे झाड होते त्यांना तर घराबाहेर, गच्चीवरसुद्धा जाणे मुश्कील झाले होते. त्यांनी कावळ्यांना कितीही हाकलायचा प्रयत्न केला तरी ते मुळीच दाद देत नव्हते. शिवाय घरातील काही सदस्य कावळीण व तिच्या पिल्लांच्या बाजूचे होते. कॉलनीत एक शाळा आहे, त्या शाळेच्या भिंतीवर अनेकजण कोणी पाहत नाही असं बघून भात, पोळ्या ठेवत होते. त्यामुळे कावळ्यांची खाण्या-पिण्याची सोय झाली आणि सगळ्या कॉलनीभर खरकटे सांडू लागले. कावळे-कावळीण चांगली धष्टपुष्ट झाली, त्यांची बाळही अंड्यातून बाहेर आली. त्यामुळे तर आवाजात आणखीनच वाढ झाली.

(Image : Google)

मी छत्री घेऊन गेले तर कावळ्याने छत्रीवर हल्ला केला. त्यांच्या बाळांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची होती.
एक दिवस कसे ते माहीत नाही पण कावळ्याची पिल्ले झाडावरून खाली पडली आणि सगळा कावळा समाज रस्त्यावर येऊन उभा राहिला. मग त्या रस्त्यावरून गाड्या जाणे मुश्कील झाले. गाडीवाल्याच्या पाठी २०-२५ कावळ्यांचा समुदाय लागे, त्यामुळे तो गाडी चालवू शकत नसे. एकजण तर गाडीवरून पडला, त्या माणसाच्या डोक्याला जबर जखमा झाल्या. दिवसभर असं काही ना काही होतच होतं. पण त्यादिवशी अचानक पावसाचे खूप भरून आले, अंधार झाला तसा कावळ्यांचा आवाज शांत झाला. पावसामुळे रहदारी कमी झाली होती. रात्र झाली तसे सगळ्यांचेच तिथले लक्ष कमी झाले. जो-तो आपल्या घरच्या चौकटीत आणि टीव्हीच्या चौकटीत नेहमीपेक्षा वेगळ्या दुनियेचा आस्वाद घेत झोपी गेला.
मनात आलं या सगळ्या निसर्गाकडे मी माझाच एक भाग म्हणून पाहायला शिकायला हवे. म्हणजे कितीही संकटं आली तरी आपण खचून जाणार नाही. काही ना काही मार्ग काढूच.

ashwinibarve2001@gmail.com

Web Title: nature teaches us how to live happy, listen to nature : Prabhat Pushpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.