सुचेता कडेठाणकर
सुखी आणि दुःखी यांच्यामध्ये नेमका फरक काय, याचा विचार करताना मला कायम आचार्य अत्रे यांची एक कविता आठवते. आपल्या स्वतःच्या महालात, मलमलच्या मऊ सूत गादीवर झोपून देखिल झोप न लागणारा धनिक आणि त्याच महालाखाली रस्त्यावर गार फरशीवर शांत निजलेला मजूर यांची (Navratri 2022 How to Overcome on Sadness).
उंच पाटी पालथी उशाखाली, हात दोन्हीही आडवे कपाळीफरसबंदीची शेज गार गार, शांत घोरत पसरला वर मजूर
दुःखाची ही भावना समजून घ्यायला खरं म्हणजे अगदी सोपी आहे.
साधर्म्य असणाऱ्या भावना - निराशा, नाराजी, खंत, वेदना
विरुद्ध भावना - सुख, मोद, समाधान
दुःखाची भावना कशी निर्माण होते?
कमतरतेची भावना बरेचदा दुःखाला जन्म देते. कमतरतेची ही भावना निर्माण होते, तुलनेमधून. दुसऱ्याकडे माझ्यापेक्षा जास्त काही आहे, म्हणजे ती व्यक्ती सुखी आणि मी दुःखी. कमतरतेची ही भावना आपला आत्मविश्वास, स्वतःबद्दलचा आदर या सर्वांवर परिणाम करायला लागते आणि आपण दुःखी बनत जातो. आता वेदना आणि दुःख यामध्ये काय फरक आहे ते समजून घेऊया. एखादी व्यक्ती किंवा प्रसंग आपल्याला वेदना देऊ शकते. पण एखादी व्यक्ती किंवा प्रसंग आपल्याला दुःख देऊ शकते का? मला अमूक एका व्यक्तीने वेदना दिली आणि मी दुःखी झाले, असं होतं.
आता बघू, गोंधळ कुठे आहे?
दुःख न भोगण्याच्या आपल्याकडे असलेल्या पर्यायाचा वापर न करणं, हे गोंधळाचं आहे. वेदना मिळाली की दुःख भोगायचं की नाही हे आपल्या हातात असतं. कदाचित म्हणूनच, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेमभंग, परिक्षेमध्ये नापास होणं अशा वेदनादायक प्रसंगातून काही जण बाहेर येतात, पण काही येत नाहीत. कारण, ते दुःख भोगत राहतात.
या भावनेचं नियोजन कसं करायचं?
१. दुःखाचं मूळ वेदना असते. ती वेदना देणारा स्रोत शोधू. तो नष्ट झाला असेल, तर दुःख भोगायचं कारण नाही, हे स्वतःला सांगू. म्हणजे परीक्षेत नापास झाल्याचं दुःख असेल, तर त्याचा स्त्रोत असलेली परीक्षा आणि त्याचा निकाल आता घडून गेलं आहे. त्यामुळे त्यावरचं दुःख न भोगणं आपल्या हातात आहे, हे समजून घेऊ.
२. स्त्रोत नष्ट झाल्याचा खात्री पटली की पुन्हा त्याच कारणामुळे वेदना निर्माण न होण्याची तयारी करु आणि त्यासाठी सज्ज राहू. म्हणजेच, पुढच्या परीक्षेची तयारी करु.
३. दुःखाचा स्त्रोत सापडत नसेल तर मात्र या विनाकारण जाणवणाऱ्या दुःखासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ.
(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)
sucheta@kohamschoolofyoga.com