Join us  

नवरात्र स्पेशल : कधीकधी विनाकारण भिती वाटते? का आणि कशामुळे, ओळखा कारणे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2022 4:49 PM

Navratri 2022 How to Cope up With Fear : धोका जाणवला की भीती जाणवू लागते. परंतु, नसलेल्या धोक्यालाही धोका मानून विनाकारण भीती वाटून घेणं हे टाळता येण्याजोगं आहे.

ठळक मुद्देभीतीला चिंतेच्या पातळीवर, चिंतेला काळजीच्या पातळीवर कसं आणता येईल हे बघू. भीती टाळण्यापेक्षा, तिची तीव्रता कमी करण्याचा विचार करु.मुळात भीतीला कारणीभूत ठरणारे प्रसंग, वाक्य, व्यक्ती, आठवणी आपल्याला माहीत आहेत का, हे बघू. नसतील तर माहीत करुन घेऊ.

सुचेता कडेठाणकर 

भित्यापाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात. खरं म्हणजे ब्रह्मराक्षस पाठी लागल्यामुळे भीती वाटायला हवी. पण ही म्हण उलटं सांगते. भीती ही देखील आशेप्रमाणेच आपल्याला भविष्यामध्ये नेणारी भावना आहे. रागाप्रमाणे भीती हीसुद्धा माणसांची आदिम भावना असून मनुष्याला जिवंत रहाण्यासाठी ती उपयोगी पडते. जीवाला किंवा अस्तित्वाला असणारा धोका ओळखण्याचं सामर्थ्य प्रत्येक जीवाकडे जन्मतः असतं. त्यामुळेच धोका जाणवला की भीती जाणवू लागते. परंतु, नसलेल्या धोक्यालाही धोका मानून विनाकारण भीती वाटून घेणं हे टाळता येण्याजोगं आहे (Navratri 2022 How to Cope up With Fear).

(Image : Google)

साधर्म्य असणाऱ्या भावना -  चिंता, असुरक्षितता, दडपण, धोका

विरुद्ध भावना - बिनधास्तपणा, शौर्य, धैर्य

भावना कशी निर्माण होते?

गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊ लागल्या की अज्ञात परिणामांची भीती वाटायला लागते. आगीच्या जवळ गेल्याने चटका बसू शकतो, रस्ता ओलांडताना खबरदारी घेतली नाही तर अपघात होऊ शकतो. हे आपल्याला माहीत असलेले परिणाम आहेत. त्यामुळे हे धोके असूनसुद्धा आपण त्यांना सहज सामोरे जातो. कारण परिणाम ज्ञात असतात. परंतु परिणाम अज्ञात असतील तर भीती वाटते. उदाहरणार्थ, प्रथमच अनेक लोकांसमोर जाऊन स्टेजवर बोलण्याची भीती वाटते. 

आता बघू, गोंधळ कुठे आहे?

भीतीची ही भावना नैसर्गिक आहे, हे मान्य न करणं गोंधळाचं आहे. भीती मुळेच आदिम काळापासून आत्तापर्यंत मनुष्य तग धरुन राहिलेला आहे, त्यामुळे ही आदिम भावना आपला पिच्छा सोडणार नाही हे मान्य करायला हवं. म्हणजे, मला भीती वाटताच कामा नये, असा हट्ट सोडून दिला जाईल. भीती मान्य केली, की मग त्याचं नियोजन करता येईल. भीतीपासून दूर न पळता या भावनेला स्वतःच्या प्रगतीसाठी कसं वापरता येईल हे बघता येईल. त्यामुळे, भीती उत्पन्न करणारे प्रसंग टाळणे किंवा भीती वाटल्यावर ती दूर नेण्याचे प्रयत्न करणे किंवा भीती वाटली तरी आपल्याला भीती वाटतच नाही असं दाखवणे, हे सगळंच गोंधळाचं आहे.

(Image : Google)

या भावनेचं नियोजन कसं करायचं?

१. अज्ञात परिणामांची भीती वाटत असली, तरी मुळात भीतीला कारणीभूत ठरणारे प्रसंग, वाक्य, व्यक्ती, आठवणी आपल्याला माहीत आहेत का, हे बघू. नसतील तर माहीत करुन घेऊ.

२. भीती वाटली, तर त्याबद्दल बोलू आणि मदत मागू. 

३. भीतीला चिंतेच्या पातळीवर, चिंतेला काळजीच्या पातळीवर कसं आणता येईल हे बघू. भीती टाळण्यापेक्षा, तिची तीव्रता कमी करण्याचा विचार करु.

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

sucheta@kohamschoolofyoga.com 

टॅग्स :मानसिक आरोग्यनवरात्री