सुचेता कडेठाणकर
चिंतेचा विचार केला, की मला गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी यांची चिंतातुर जंतू ही कविता आठवते. त्याच्या शेवटी ते म्हणतात-
देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी
या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी
माणसाला अडकवून ठेवणारी ही भावना खरं म्हणजे गंमतीची आहे. कारण ही भावना कायम आपल्याला वर्तमानातून भविष्यात ढकलत असते. अर्थातच, सततची चिंता असली म्हणजे प्रत्येक क्षणी आपण पुढच्या क्षणात जगल्यासारखं वावरु लागतो. आपण गेलेल्या काळाचा विचार करणे जसे अयोग्य, तसंच अजून न आलेल्या काळाची चिंता करणं देखिल अयोग्य. मग काय योग्य? म्हणजे भविष्यासाठी विचार करुन नियोजन करायचंच नाही की काय. नेहमीप्रमाणे समानधर्मी आणि विरोधी भावना बघू (Navratri 2022 How to Get Relief From Care).
साधर्म्य असणाऱ्या भावना - काळजी, सावधगिरी, भीती
विरुद्ध भावना - निर्धास्तपणा, सुरक्षितता
चिंतेची भावना कशी निर्माण होते?
आपल्याला असुरक्षितता जाणवली की चिंता निर्माण होते. एखाद्या परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीशी सामोरं जाताना आपली तयारी नसल्याची भावना असुरक्षितता निर्माण करते. कधी कधी ही चिंता टोकाची असते. विमानात बसल्यावर, घरातून बाहेर पडून २ इमारती दूर जाताना, इंटरव्ह्यूला जाताना, रोजचा स्वयंपाक करताना, कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी एखादा निर्णय घेताना अशा सर्व गोष्टींमध्ये ही चिंता डोकावू लागते. परंतु, काही वेळा मात्र ही चिंता मदतीला धावून येते. एखादी कृती करताना, त्याच्या परिणामाचा केलेला विचार आणि त्याच्या विपरीत परिणामांसाठी केलेली मनाची तयारी - या स्वरुपात चिंता असेल तर ती मात्र चांगली चिंता.
आता बघू, गोंधळ कुठे आहे?
चिंता भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची असते. आपल्या एखाद्या कृतीने भविष्यात घडणाऱ्या फक्त विपरीत परिणामांचाच विचार करणं, हे गोंधळाचं आहे. आपल्या मनाचा झुकाव नकारात्मक गोष्टींकडे जास्त असतो. ते नैसर्गिक आहे. आपल्याला भविष्याचं नियोजन करायला ते उपयोगीच आहे. पण आपलं लक्ष नियोजनाकडे नेणारी चिंता उपयोगी आणि केवळ विपरीत परिणामांची भीती दाखवणारी चिंता मात्र निरोपयोगी.
या भावनेचं नियोजन कसं करायचं?
१. योग्य मार्गदर्शनाखाली आणि नियमितपणे प्राणायाम, धारण, आसनांचा सराव. योगाभ्यास हा चिंतेपासून मुक्तीचा सर्वोत्तम उपाय आहे.
२. आपल्या नेमक्या कोणत्या कृतीच्या, कोणत्या परिणामांची चिंता वाटते, हे लिहून काढायचं. त्या कृतीचा इच्छित परिणाम काय हे देखील लिहायचं. इच्छित परिणाम घडण्यासाठी कृतीत काय बदल करायला हवेत, याची यादी करायची.
(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)
sucheta@kohamschoolofyoga.com