Join us  

नवरात्र स्पेशल : धाडस करायला आपण का घाबरतो? धोका पत्करताना नेमके कुठे अडखळतो आणि का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2022 11:25 AM

Navratri 2022 Special How to Become Brave : स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल करण्याखेरीज दुसरा पर्यायच नाही अशी जाणीव होते तेव्हा धैर्य निर्माण होतं.

ठळक मुद्देधैर्य निर्माण होण्याची क्षमता आपल्यात नाहीच असं मानणं गोंधळाचं आहे.आपल्यात बदल घडवणं हे आपल्या हातातच नाही असं वाटायला लागलं की मात्र धैर्य निर्माण न होता, हतबलता येते.

सुचेता कडेठाणकर

धैर्य, धाडस, वीरश्री असे शब्द ऐकले की आपल्याला शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर असे लोक डोळ्यासमोर येतात. म्हणजे नकळत आपण धैर्याची ही भावना असामान्य, अद्वितीय, पराक्रमाशी जोडून टाकलेली असते. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपला आणि धैर्याचा काय संबंध येणार असं आपल्याला वाटतं. पण खरं पाहता, शाळेच्या पहिल्या दिवशी आईला सोडून शाळेत स्थिरावणारं इवलंसं मूल कमालीचं धैर्य दाखवत असतं. कोणतीही गोष्ट जबाबदारीने पार पाडताना आपण प्रत्येक जण कमालीचे धैर्यवान बनत असतो. त्यामुळे, धैर्याची ही भावना समजून घेताना तिच्याबद्दल मनात नकळतपणे असलेला दुरावा आपण घालवूयात (Navratri 2022 Special How to Become Brave) .

(Image : Google)

साधर्म्य असणाऱ्या भावना -  शौर्य, वीरता, धाडस, साहस

विरुद्ध भावना - भीती, निराशा, हतबलपणा

भावना कशी निर्माण होते?

आपल्यावर इतरांची जबाबदारी आली आणि ती जबाबदारी उत्तमरितीने पेलण्याखेरीज आपल्याकडे काही पर्यायच नसेल, तर धैर्य निर्माण होतं किंवा स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल करण्याखेरीज दुसरा पर्यायच नाही अशी जाणीव होते तेव्हा धैर्य निर्माण होतं. म्हणजे व्यसनामधून बाहेत पडू पहाणाऱ्या माणसाला, आता इथून पुढे स्वतःत बदल घडवून आणायलाच हवा अशी आतून जाणीव होते त्यावेळी तो मनुष्य धैर्याने याला सामोरा जातो. याउलट, आपली प्रगती खुंटते आहे हे माहीत असूनही, आपल्यात बदल घडवणं हे आपल्या हातातच नाही असं वाटायला लागलं की मात्र धैर्य निर्माण न होता, हतबलता येते.

आता बघू, गोंधळ कुठे आहे?

धैर्य निर्माण होण्याची क्षमता आपल्यात नाहीच असं मानणं गोंधळाचं आहे. आपण असं मानतो, कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे धैर्याची भावना आपण आपल्यापासून दूर नेऊन ठेवतो. 

(Image : Google)

या भावनेचं नियोजन कसं करायचं?

१. लहानपणापासून आपण त्या त्या वेळी केलेल्या धाडसाच्या, धैर्याच्या गोष्टी आठवू. त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला वाटलेला आत्मविश्वास आठवू.

२. योगासनाच्या सरावातील पाठीचा कणा मागे वाकवणारी म्हणजेच छाती रुंद करणारी आसनं देखील याबाबतीत उपयोगी ठरु शकतात.

३. उर्जा निर्माण करणारा भस्त्रिका सारखा प्राणायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे उपयोगी होईल.

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

sucheta@kohamschoolofyoga.com

टॅग्स :मानसिक आरोग्यनवरात्री