Join us  

नवरात्र स्पेशल : लहान सहान गोष्टींवरुन राग येतो? सतत चिडचिड-भांडणं होतात? ३ उपाय , राग होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 9:41 AM

Navratri 2022 How to Control Anger: मनाच्या तळात अगदी लहानपणापासून दडून बसलेली अशी अन्यायाची भावना किंवा अविश्वास रागाला कारणीभूत असतो.

ठळक मुद्देराग व्यक्त करु पण थोडा उशीरा. तोवर, राग हा नाराजीच्या पातळीपर्यंत खाली उतरला असेल.एखादी घटना घडल्यावर आपण तडक प्रतिक्रिया देत सुटलो तर रागाचे प्रसंग वाढणार आणि त्यांची तीव्रता सुद्धा.

सुचेता कडेठाणकर 

आला राग, गेला राग- असं झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. परंतु तसं होत नाही. राग येतो आणि मग तो ठिय्या मांडून बसतो. वरवर गेलाय असं वाटतं पण मग नकळत दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीवर, तो विनाकारण निघतो. कधी कधी रागाची तीव्रता कमी असते. अशावेळी तो चिडचिड, वैताग या स्वरुपात असतो. कधी कधी मात्र राग तीव्र स्वरुपात म्हणजे रौद्र रुपात येतो. राग “येतो” असं आपण म्हणतो. म्हणजे काय होतं? तो आपोआप, त्याचा तोच येतो असं आपल्याला वाटतं. पण खरं म्हणजे तो आमंत्रणाविना आलेला पाहुणा नसतो. आपल्या नकळत आपण त्याला बोलवणं धाडलेलं असतं आणि म्हणून आपल्या आमंत्रणाचा मान राखून तो येतो (Navratri 2022 How to Control Anger).

(Image : Google)

रागाची ही भावना समजून घेण्यासाठी, रागाशी साधर्म्य असणाऱ्या भावना आणि रागाच्या विरुद्ध असणाऱ्या भावना बघू-

साधर्म्य असणाऱ्या भावना -  चिडचिड, वैताग, संताप, नाराजी

विरुद्ध भावना - शांतता, समाधान, खुशी

रागाची भावना कशी निर्माण होते?

अन्यायाची भावना बहुतांशवेळा रागाला कारणीभूत असते. मी ज्या गोष्टी मिळवण्यासाठी लायक आहे, त्या मला मिळत नाहीत आणि त्या मला न मिळण्याचं कारण मी नसून माझ्या आजुबाजुच्या व्यक्ती आहेत. मनाच्या तळात अगदी लहानपणापासून दडून बसलेली अशी अन्यायाची भावना किंवा अविश्वास रागाला कारणीभूत असतो. आता पुन्हा एकदा शहाण्यासारखा विचार करुन बघा. एखादा प्रसंग किंवा एखाद्या व्यक्तीचं वागणं रागाला कारणीभूत होत असेल, तर त्याच प्रसंगात असलेल्या किंवा त्याच व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकालाच राग यायला हवा. पण तसं होत नाही. म्हणजे, रोगाचं हे मूळ आपल्या बाहेर नसून आत आहे.

(Image : Google)

आता बघू, गोंधळ कुठे आहे?

आपला राग नियंत्रणात आणण्यासाठी बाह्य गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करणं, इथे गोंधळ आहे. कारण बाहेरच्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. मग आपल्या नियंत्रणात काय आहे? राग उत्पन्न करणाऱ्या प्रत्येक प्रसंगात आपण दिलेली प्रतिसाद आपल्या नियंत्रणात आहे. एखादी घटना घडल्यावर आपण तडक प्रतिक्रिया देत सुटलो तर रागाचे प्रसंग वाढणार आणि त्यांची तीव्रता सुद्धा.

या भावनेचं नियोजन कसं करायचं?

१. राग आल्यावर होणाऱ्या नुकसानापेक्षा राग ज्या पद्धतीने व्यक्त होतो, त्या पद्धतीमुळे आपल्याला आणि आजुबाजुच्या व्यक्तींना जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे राग व्यक्त करु पण थोडा उशीरा. तोवर, राग हा नाराजीच्या पातळीपर्यंत खाली उतरला असेल.

२. दररोज भरपूर शारिरिक व्यायाम करु.

३. दररोजच्या वागण्यामध्ये हात जोडून किंवा खाली वाकून नमस्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी निर्माण करु.

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

sucheta@kohamschoolofyoga.com 

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइलरिलेशनशिप