सुचेता कडेठाणकर
“रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल” - ही ओळ शाळेत असताना प्रथम वाचली होती त्यावेळी मला “आशा” या भावनेचा पुरेपूर अर्थ कळला. जगातलं एकमेव सत्य काय, असं विचारलं असता बुद्ध म्हणतात - दुःख हे एकमेव सत्य - सर्वम् दुःखम्. पण त्याच्या पुढे ते लगोच पुश्ती जोडतात - सर्वम् क्षणिकम्. म्हणजे सगळं दुःखमय जरी असलं, तरी सगळं क्षणिक सुद्धा आहे. येणारा प्रत्येक क्षण सरणारा असल्यामुळे सध्याच्या क्षणात जाणवणाऱ्या दुःखाचा लोप पुढच्या क्षणात होण्याची आशा आहेच. पतंजली मुनी सुद्धा योगदर्शनामध्ये हेच सांगतात. ते म्हणतात, हेयम् दुःखम् अनागतम् - जे अजून आलेलं नाही, ते दुःख टाळत्या येण्याजोगं आहे (Navratri 2022 How to live with the Hope in Darkness).
आशेच्या या भावनेशी साधर्म्य असलेल्या आणि विरुद्ध असलेल्या भावना बघू
साधर्म्य असणाऱ्या भावना - विश्वास, श्रद्धा, शक्ती
विरुद्ध भावना - निराशा, हतबलता, दुर्बलता
आशेची भावना कशी निर्माण होते?
आशा निर्माण होण्यासाठी मुळात निराशेचा अनुभव यावा लागतो. निराशा नसेलच तर मनुष्याला आशेची भावना जाणवणारच नाही. निराशेमधून आशा उत्पन्न होण्यासाठी लागते श्रद्धा, लागतो विश्वास. मग ती श्रद्धा देवावर असेल, स्वतःच्या क्षमतेवर असेल, जवळच्या माणसांवर असेल, किंवा नशिबावर असेल. या अगाढ श्रद्धेमधून निराशेच्या प्रसंगी आशा उत्पन्न झाली की बुद्धी विपरीत चालू लागत नाही. बुद्धी शाबूत राहाते आणि मग निराशेच्या प्रसंगामधून बाहेर पडण्यासाठी मनुष्य कृती करायला लागतो. कृतीची जोड नसलेली आशा बिनकामाची असते. नुसत्याच फोल आशेवर राहून प्रत्यक्ष कृती न करता बसून रहाणं म्हणजे “असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी” असं म्हटल्यासारखं होईल. ही आशा आपल्या कामाची नाही.
आता बघू, गोंधळ कुठे आहे?
वर सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या कर्माची जोड न देता आशा ठेवणं, किंवा कोणताही आधार नसताना उगीचच सकारात्मक, आशावादी असणं हे गोंधळाचं आहे. स्वतःच्या क्षमतांची योग्य जाणीव नसेल, तर असं होऊ शकतं. माझ्यामध्ये १० किमी धावण्याची क्षमता आहे की नाही, त्यासाठी माझी तयारी आहे की नाही याचा अभ्यास न करता मी १० किमी धावण्याच्या स्पर्धेत गेले आणि प्रथम क्रमांक मिळवायची आशा ठेवली, तर गोंधळ होणार आणि अखेरीस पदरी निराशाच पडणार.
या भावनेचं नियोजन कसं करायचं?
१. आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे, त्यासाठी लागणारी सर्व कौशल्या आत्मसात करु, त्यासाठी लागणारी तयारी करण्यासाठी वेळ देऊ, आपल्याकडून १०० टक्के प्रयत्न करु.
२. आपली आशा डळमळीत करणाऱ्या बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु.
३. आपल्या प्रगतीचा सतत आढावा घेत राहू.
(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)
sucheta@kohamschoolofyoga.com