Join us  

नवरात्र स्पेशल : कसला आनंदच होत नाही? ही घ्या ३ सूत्र, ताण आणि दुःखावर करा मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 7:05 PM

Navratri 2022 : मनासारखी गोष्ट घडली की आनंद होतो. याचाच अर्थ मनाविरुद्ध गोष्ट घडली की दुःख होतं, अशावेळी काय करायचं याविषयी...

ठळक मुद्देआपला आनंद एका व्यक्तीने अमूक पद्धतीने वागण्यावर, एखादी गोष्ट अमूक पद्धतीने घडण्यावर किंवा परिस्थिती बदलण्यावर अवलंबून असू नयेआनंद हा माझा मूळ स्वभाव आहे, याची जाणीव मी स्वतःला करुन देईन.

सुचेता कडेठाणकर 

आपण दररोज करतो ती प्रत्येक कृती स्वतःच्या आनंदासाठीच असते. एखादीही कृती आपण मुद्दाम दुःख मिळवण्यासाठी करत नाही. असं का? कारण, दुःखी होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागत नाहीत. :). अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे आपण दुःखी होतो, आपला मूड जातो, आपण निराश होतो वगैरे वगैरे. पण एंजॉय  करण्यासाठी, आनंदी होण्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतात.  गंमत आहे, पण खरं आहे ना? आता आनंदाची ही भावना समजून घेण्यासाठी, आनंदाशी साधर्म्य असणाऱ्या भावना आणि आनंदाच्या विरुद्ध असणाऱ्या भावना बघूया  (Navratri 2022).

साधर्म्य असणाऱ्या भावना -  समाधान, तृप्ती, सुख, हर्ष

विरुद्ध भावना - दुःख, निराशा, असमाधान

आनंदाची भावना कशी निर्माण होते?

मनासारखी गोष्ट घडली की आनंद होतो. याचाच अर्थ मनाविरुद्ध गोष्ट घडली की दुःख होतं. मग आता विचार करा. आपल्याला आनंदी रहायचे आहे की दुःखी? अर्थातच आनंदी. पण मग आपला आनंद तर अवलंबून आहे, गोष्टी मनासारख्या घडण्यावर. आता अगदी शहाण्यासारखा विचार करुन बघा आणि स्वतःला विचारा की सतत, कायम, नेहमीच, प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडण्याची शक्यता किती आहे? समजा ५० टक्के. म्हणजे ५० टक्के वेळा गोष्टी मनाविरुद्धही घडू शकतात तर. मग याचा अर्थ आपण आयुष्यातला निम्मा वेळ दुःखी असणार? हे तर आवघड झालं.

मुख्य गोंधळ कुठे होतो?

आपला आनंद गोष्टी मनासारख्या घडण्यावर अवलंबून ठेवणं, हेच मुळात गोंधळाचं आहे. आपला आनंद एका व्यक्तीने अमूक पद्धतीने वागण्यावर, एखादी गोष्ट अमूक पद्धतीने घडण्यावर किंवा परिस्थिती बदलण्यावर अवलंबून असेल तर मला माझ्या या भावनेचं नियोजन करता येणार नाही. कारण मग आनंद माझ्या नियंत्रणात नसेल. 

(Image : Google)

या भावनेचं नियोजन कसं करायचं?

१. माझ्या जवळची व्यक्ती आनंदी झाली तर मी आनंदी होऊ शकते. म्हणजे आनंदी रहाण्याची शक्यता थोडीशी वाढली.

२. मनाविरुद्ध गोष्टी घडूच शकतात, याची तयारी मी ठेवू शकते. म्हणजे मनाविरुद्ध गोष्ट घडली, तरी माझी दुःखी होण्याची तीव्रता कमी होईल किंवा मी त्या दुःखात फार काळ रहाणार नाही. 

३. आनंद हा माझा मूळ स्वभाव आहे, याची जाणीव मी स्वतःला करुन देईन. म्हणजे आनंदी होण्यासाठी काही करावं लागणार नाही. 

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

sucheta@kohamschoolofyoga.com

टॅग्स :मानसिक आरोग्य