Lokmat Sakhi >Mental Health > काय हरवलं? काय कमावलं? -वर्ष संपताना हिशेब मांडलाच तर काय हाती लागेल आपल्या?

काय हरवलं? काय कमावलं? -वर्ष संपताना हिशेब मांडलाच तर काय हाती लागेल आपल्या?

New year resolution : जुनं वर्ष सरताना, नव्याचे स्वागत करताना आपण नेमका कसला हिशेब मांडणार आहोत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 05:28 PM2023-12-26T17:28:18+5:302023-12-28T17:15:06+5:30

New year resolution : जुनं वर्ष सरताना, नव्याचे स्वागत करताना आपण नेमका कसला हिशेब मांडणार आहोत?

New year and hope for new life, gain and loss-year end- what to count? | काय हरवलं? काय कमावलं? -वर्ष संपताना हिशेब मांडलाच तर काय हाती लागेल आपल्या?

काय हरवलं? काय कमावलं? -वर्ष संपताना हिशेब मांडलाच तर काय हाती लागेल आपल्या?

Highlightsकोणीतरी थोपवलेल्या मतांमध्ये अडकून पडलो तर आपणच आपल्याला ओळखेनासे होऊ असे वाटते.

अश्विनी बर्वे

नवीन वर्षाची सुरुवात होणार म्हटलं की लगेचच आपण मागच्या वर्षीचा आढावा घ्यायला बसतो. अनेकवेळा तो माध्यमातून आपल्याला कळतो किंवा माध्यमे सांगतात की हे असं झालं होतं आणि मग त्याचा परिणाम असा झाला. मग तोच परिणाम सामान्य माणूस एकमेकाला सांगत राहतो. समजा माध्यमे नसतीच तर हा असा आढावा घ्यायचा असतो हे सामान्य माणसाला कळलं असतं का? अर्थात वर्तमानपत्र, टीव्ही नसला तरी आता अनेकांकडे मोबाइल आहे आणि त्यामुळे सर्व अभासी जग हातात आलं आहे, त्यामुळे नवीन वर्ष येत आहे हे कळतेच. खरेतर मागची काही वर्षे आणि आजही उद्याचा दिवस उगवेल की नाही या धास्तीने माणूस जगत आहे. काही माणसांची धास्ती खरी ठरली तरी, त्यातले आपल्यासारखे बरेच जण नवीन वर्ष बघायला आहेत. त्याकडे स्वच्छ नजरेने बघण्याची आपली क्षमता या येणाऱ्या वर्षाने वाढवावी, अशी इच्छा राहून राहून मनात येत राहते.

मागच्या वर्षात नक्की काय बदल झाला याचा विचार करताना माझ्यासमोर असणाऱ्या लहान मुलांकडे बघत होते.
या मुलांचे आयुष्य किती बदलले आहे. त्यांचा होमवर्क मोबाइलवर येतो, त्यांचे प्रोजेक्ट मोबाइलवर बघून होतात, गॅदरिंगची गाणी, नृत्याच्या स्टेप्स त्यातच बघायच्या. तरीही आई-वडील म्हणतात की, आमचं मूल खूप वेळ मोबाइल बघतं, त्याचा स्क्रीन टाईम कमी व्हावा, असं काहीतरी करा. मग वहीत होमवर्क लिहून घेऊ द्या, बाकी प्रत्यक्ष तुम्ही शिकवा असं म्हटलं तर ते ही त्यांना पटत नाही. कारण मुलांची वही बघणे त्यांना जमत नाही, वेळच राहत नाही.

(Image :google)

असं होऊ शकतं. म्हणजे मुलं आणि पालक यांनीही हा बदल असा स्वीकारलेला दिसतो. त्यात आता सर्व मुलांना पास करायचंच आहे, पण मुलांच्या क्षमता वाढवण्यासाठी परीक्षेत काही बदल केले, मुलांना विचार करून काही लिहिता यावे, असे प्रश्न टाकले तर ते ही पालकांना चालत नाही. ते लगेच विचारतात, मुलांना जे शिकवलंच नाही, त्यांच्या वहीत हे प्रश्नच नव्हते, किंवा धड्याखाली असे प्रश्नच नाहीत तर तुम्ही असे प्रश्न कसे विचारू शकता? मग त्यात मुलांना त्यांच्या आजीचे नाव विचारले, आपल्याजवळ स्थलांतर करणारे कोणते पक्षी येतात, असं विचारलं तरी पालकांना ते आवडत नाही.

काही पालक म्हणतात, मुलांना चांगलं वळण लागावं म्हणून त्यांना मारलं तरी चालेल. दुसरीकडे मुलांना एक मार्क कमी पडला म्हणून शिक्षकांशी भांडायला येणारेही पालक आहेत.
पुस्तकात जे आहे तेच शिक्षण असं मानणारेही पालक आहेत.

(Image :google)

पालकांचा असा प्रवास बघताना प्रश्न पडतो की नक्की आपण पुढे जात आहोत की मागे? हेच समजत नाही.
मुलांमध्ये असणाऱ्या क्षमता शोधण्यासाठी परीक्षा घ्यायला हवी. त्यातून मुलांमधले विविध गुण समजतील. त्यांचा विकास होईल. आताचं सगळं बदलू शकणार नाही, पण एखादे छोटे पाऊल आपण टाकू शकतो, असा विश्वासही काही पालकांनी यावर्षी दाखवलेला मात्र मला दिसला. ते पाहून मनात नवीन वर्षाच्या आशा अधिक पल्लवित झाल्या.

नवीन वर्षात आपण शिक्षणाकडे अधिक गांभीर्याने बघायला हवं. कारण शिक्षण घेऊनही निरक्षर असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि मला तर याची दहशतवादापेक्षा जास्त भीती वाटते. सगळ्या गोष्टी एवढ्या सुमार करून टाकल्या आहेत किंवा टाकत आहोत आपण की एखादी योग्य अशी गोष्टही अवघड वाटू लागते. मग तिला विशिष्ट चौकटीत टाकण्याचा आपण प्रयत्न करतो. एकदा ती चौकट बसवली की मग वाटेल तसे वागायला आपण तयार होतो. आज विविध कंपन्या शैक्षणिक पुस्तके काढत आहेत, ती पुस्तके परत परत वापरता येत नाहीत. नवीन तंत्रज्ञान मुलांना कळले पाहिजे, त्यांना जगाचे ज्ञान व्हायला हवे, असे या कंपन्या म्हणतात. पण एक पुस्तक घरातील दोन्ही मुले एकानंतर एक वापरू शकतात. नंतर ती दुसऱ्याला कमी किमतीत विकू शकतात. त्यातून कागदाची बचत होऊ शकते, पर्यायाने पर्यावरण वाचवण्यास हातभार लागू शकतो, वाटून घेण्याची क्षमता वाढू शकते. ही मूल्ये तंत्रज्ञानाच्या काळात महत्त्वाची नाही का? पण हा प्रश्न आपण त्या कंपन्यांना विचारू शकत नाही.

मागच्या वर्षाने आपल्याला जशी तंत्रज्ञानाची गरज दाखवून दिली तशीच किंवा त्यापेक्षा अधिक गरज माणसांची एकमेकांना समजून घेण्याची आहे, हे ही दाखवून दिलं आहे.
नवीन वर्षात आपण तसं केलं नाही तर?
कोणीतरी थोपवलेल्या मतांमध्ये अडकून पडलो तर आपणच आपल्याला ओळखेनासे होऊ असे वाटते.
मागच्या वर्षाने आपल्याला खूप सावध केलं आहे पण आपण तसं झालो आहोत का? हे आपण बघायला हवे.
काळाच्या बरोबरीने चालायचं म्हणजे योग्य गोष्टी सोडून द्यायच्या असे नाही. वाचन, लेखन ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यात आहे आणि ती आपण जपली पाहिजे.

जरी आज स्क्रीन महत्त्वाचा असला तरी त्यातून काय बघायचे आणि काय नाही हे ठरवण्यासाठी आपली विचाराची बैठक पक्की असायला हवी.
नवीन वर्षात आपल्याला हे जमायला हवे!

(लेखिका मुक्त पत्रकार आणि शिक्षक आहेत.)
ashwinibarve2001@gmail.com

Web Title: New year and hope for new life, gain and loss-year end- what to count?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.