जुनं वर्ष संपल्यावर आपण गेल्या वर्षात आयुष्यात काय काय घडलं याचे हिशोब मांडतो. सोशल मीडियावरही आपण तशा प्रकारच्या पोस्ट शेअर करतो. येणारं वर्ष नव्या उत्साहात, आनंदात आणि आपल्या मनासारखं जावं यासाठी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षात काही गोष्टी आवर्जून करायच्या म्हणून आपण काही संकल्पही करतो. सुरुवातीचे काही दिवस हे संकल्प नियमाने पाळले जातात. मात्र जसे दिवस पुढे जातात तसे आपण वर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प मागे पडतात आणि विरुन जातात (New Year Special Resolution Tips).
यामध्ये अगदी एखादी गोष्ट शिकण्यापासून ते व्यायाम करणे, वजन कमी करणे, वाचन करणे, स्वत:ला वेळ देणे, अमुक एखादी गोष्ट साध्य करणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. वर्षाचा शेवटचा महिना आला की आपल्याला अमुक एक संकल्प आपण या वर्षात केला होता मात्र तो पूर्ण झाला नाही याची हुरहूर लागून राहते. अशावेळी केलेला संकल्प तडीस नेण्यासाठी आवर्जून कराव्यात अशा गोष्टी...
१. झेपेल तेवढेच ठरवा
अनेकदा आपण व्यवहारीकदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्या एखादी गोष्ट करायची असं ठरवतो. त्यामुळे आपण अवास्तव असे संकल्प करतो. काहीवेळा या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात हे आपल्याला माहित असते. मात्र तरीही आपण त्या करण्याचे ठरवतो. मात्र प्रत्यक्षात त्या गोष्टी होत नाहीत आणि मग आपला संकल्प हा वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत संकल्पच राहतो.
२. वेळेची मर्यादा घाला
नवीन वर्षात आपण एखादी गोष्ट करायची असं ठरवतो खरं. पण वर्षभर हा कालावधी मोठा असल्याने आपण ठरवलेल्या गोष्टीचे काही तुकड्यात विभाजन करायला हवे. पुढच्या १ महिन्यात किंवा २ महिन्यात त्यातील पहिला टप्पा पूर्ण करणार, ४ महिन्यांनी किंवा ६ महिन्याने दुसरा टप्पा असं परफेक्ट नियोजन असेल तर ठरवलेली गोष्ट साध्य करणे काही प्रमाणात सोपे जाते. पण अजून वर्ष हातात आहे असं म्हटलं तर एक एक महिना निघून जातो आणि वर्षाचा शेवटचा महिना कधी येतो आपल्याही लक्षात येत नाही.
३. गॅप झाली तरी...
आपण एखादा संकल्प करतो आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करायला सुरुवातही करतो. पण एखादवेळी ठरवलेली गोष्ट करण्यात गॅप पडला तर आपण पुढे बरेच दिवस ती गोष्ट करण्याचा कंटाळा करतो. मात्र असे न करता ठरवलेला संकल्प पूर्ण करायचा असेल तर गॅप पडली तरी कंटाळा न करता पुन्हा ही गोष्ट करायला सुरुवात करा.