मला कुणी समजूनच घेत नाही. कुणाचं कितीही करा. कितीही पुढेपुढे करा, मदत करा, माझ्यासाठी कुणी नसतं. एवढंच काय सगळ्याचं सगळं लाइक करते मी सोशल मीडियात. पण आपण काही पोस्ट करा मुद्दाम इग्नोर करतात. व्हॉट्सॲप ग्रुपवर फार झालं तर अंगठा दाखवतात, एफबीला लाइक ठोकतात. पण भरभरुन कौतुक नाहीच. आपल्याशीच लोक असं का वागतात. का मलाच असं बाजूला टाकतात कळत नाही? -ही अशी तक्रार कुणीतरी कुणाकडे करणं किंवा आपल्यालाच कधीमधी वाटणं हे काही अपवाद नाही. अनेकदा तर बॉससुध्दा कुणाला तरी सतत लाइक ठोकतो कुणाच्या पोस्ट त्याला सोयीस्कर दिसतच नाहीत अशी चर्चा ऑफिस ग्रुपमध्ये पण होते. हे सगळं खरंच असं होतं की आपल्या मनाचे खेळ असतात. आपल्याला सतत कुणीतरी वा वा छान छान म्हणत राहणं ही आपली मानसिक गरज झाली? नक्की समस्या आहे काय ही?
आपल्या हातात फोन, नेट हातात आहे. संवाद माध्यमे हाताशी आहेत. आपण सतत त्यावर काही ना काही एक्सप्रेस करतच असतो तरी पण मग असं का म्हणतो की मनातलं सांगायला कुणी नाही? आपल्याला कुणी समजूनच घेत नाही? कुणाशी बोलायचे मनातले? कुठून सुरुवात करायची? काय बोलायचे? काहीच कळत नसते. फक्त प्रश्नच असतात. घरात तरी काय वेगळं चित्रं असतं? त्यांनाही आपले काही समजूनच घेता येणार नाही, असेच सारखे वाटत राहते.
(Image : Google)
काय केलं तर हा प्रश्न सुटेल?
१. बाहेरच्यांशी बोलण्यापूर्वी जरा घरातल्यांशी बोला. मनापासून त्यांच्यावर प्रेम करत असाल तर विश्वासही ठेवा.
२. आपल्याला इतरांनी समजून घ्यावे वाटत असेल तर त्यांनाही समजून घ्या.
३. मनातलं मोकळेपणानं बोला.
४. सततच छोट्या- छोट्या गोष्टीत इतरांशी तुलना सोडा.
५. आपल्याला कशानं नेमका आनंद होतो ते करा.
६. जे कराल ते आपल्या आनंदासाठी हवं. इतरांना दाखवण्यासाठी नव्हे.