Lokmat Sakhi >Mental Health > ना पैसे , ना रंगरुप, लोकांना इम्प्रेस करतात यशस्वी व्यक्तींच्या या 7 सवयी

ना पैसे , ना रंगरुप, लोकांना इम्प्रेस करतात यशस्वी व्यक्तींच्या या 7 सवयी

चांगल्या दिसण्यानं, चांगले कपडे घातल्यानं आपण प्रभावी होवू शकत नाही. अमेरिकन लेखक स्टीफन कोव्हे यांनी प्रभावी व्यक्ती होण्यासाठी 7 युक्त्या आपल्या बेस्ट सेलर ठरलेल्या पुस्तकात केव्हाच सांगून ठेवल्या आहेत. या सात युक्त्या म्हणजेच सात सवयी आहेत. स्त्री असू देत नाही तर पुरुष , प्रत्येकानं या सवयी स्वत:ला लावून घेतल्या तर ती प्रत्येक व्यक्ती यशस्वी आणि समाजात प्रभावी ठरेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 06:38 PM2021-07-08T18:38:33+5:302021-07-08T18:43:31+5:30

चांगल्या दिसण्यानं, चांगले कपडे घातल्यानं आपण प्रभावी होवू शकत नाही. अमेरिकन लेखक स्टीफन कोव्हे यांनी प्रभावी व्यक्ती होण्यासाठी 7 युक्त्या आपल्या बेस्ट सेलर ठरलेल्या पुस्तकात केव्हाच सांगून ठेवल्या आहेत. या सात युक्त्या म्हणजेच सात सवयी आहेत. स्त्री असू देत नाही तर पुरुष , प्रत्येकानं या सवयी स्वत:ला लावून घेतल्या तर ती प्रत्येक व्यक्ती यशस्वी आणि समाजात प्रभावी ठरेल.

No Money, No Appearance, These 7 Habits Of Successful People Impress People | ना पैसे , ना रंगरुप, लोकांना इम्प्रेस करतात यशस्वी व्यक्तींच्या या 7 सवयी

ना पैसे , ना रंगरुप, लोकांना इम्प्रेस करतात यशस्वी व्यक्तींच्या या 7 सवयी

Highlightsस्वत: निर्णय घेवून कृती करणं आवश्यक आहे. अशा कृतीतून स्वत:ची ओळख तयार होते.नेहेमी स्वत:चा फायदा बघताना इतरांचा फायदाही कसा होईल हे बघावं. यामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल आपलेपणा, आदर आणि विश्वास निर्माण होतो.प्रभावी व्यक्ती बनण्यासाठी सतत स्वत:वर काम करणं, स्वत:ची क्षमता, कौशल्य वाढवणं खूप गरजेचं असतं.

स्टीफन कोव्हे हे अमेरिकन लेखक. 2012मधे त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांनी लिहिलेलं ‘ द हॅबिटस ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ हे पुस्तक आजही बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत आहे. हे पुस्तकाला स्थळ काळाची मर्यादा नाही. या पुस्तकात कोव्हे यांनी जे सांगित लं ते कोणासाठीही उपयुक्त असंच आहे. त्यांनी चांगलं कुटुंब घडण्याठी, चांगली कंपनी घडण्यासाठी, चांगली व्यक्ती घडण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे याचं मार्गदर्शन केलं आहे.
आपण प्रभावी व्यक्ती व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण तसं होण्यासाठी काय करायला हवं हे मात्र माहित नसतं. फक्त चांगल्या दिसण्यानं, चांगले कपडे घातल्यानं आपण प्रभावी होवू शकत नाही. स्टीफन कोव्हे यांनी प्रभावी व्यक्ती होण्यासाठी 7 युक्त्या सांगितल्या आहेत. या सात युक्त्या म्हणजेच सात सवयी आहेत. स्त्री असू देत नाही तर पुरुष , प्रत्येकानं या सवयी स्वत:ला लावून घेतल्या तर ती प्रत्येक व्यक्ती यशस्वी आणि समाजात प्रभावी ठरेल. या सवयींचा अवलंब करणं हे ठरवलं तर अजिबात अवघड नाही.

प्रभावी करणार्‍या 7 सवयी

1 स्वत: पुढाकार घेऊन कृती करा
 पहिली सवय ही अत्यंत मुलभूत आणि महत्त्वाची आहे. ती म्हणजे स्वत: पुढाकार घेऊन कृती करणं. आपल्या कृती या प्रतिक्रियात्मक असतात. म्हणजे एखादी समस्या, प्रश्न, घटना याला आपण कृतीतून प्रतिक्रिया देतो. अशी प्रतिक्रिया देण्यातून प्रभाव पडत नाही. त्यासाठी स्वत: निर्णय घेवून कृती करणं आवश्यक आहे. अशा कृतीतून स्वत:ची ओळख तयार होते. या कृतीची पूर्ण जबाबदारी आपली स्वत:ची असते. म्हटलं तर यात धोका आहे, आव्हान आहे. पण ही स्वत:हून केलेली कृतीच आपल्याला कामाचं, काहीतरी केल्याचं समाधान मिळवून देतात. स्वत: पुढाकार घेऊन कृती करण्याची सवय लागल्यास आपल्या आयुष्याला ध्येय मिळतं.

2 जे करायचंय त्याचं चित्र मनात उभं करा
 

एकदा ठरवलं तर ते कसं करायचं याबाबत बारकाईनं विचार करुन त्याचं चित्रं मनात, डोळ्यासमोर उभं करा. हे चित्रं जेव्हा संपूर्ण बारकाव्यासह उभं राहातं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे , आपल्याकडे काय आहे, आपल्याला काय मिळवायचंय याची स्पष्ट कल्पना येते. त्यामुळे ते काम पूर्ण करण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्याची मनाची तयारी होते. आपल्याला भविष्याची कल्पना येते.

3 कृती करण्यासाठी एक एक पाऊल उचला

एकदा निर्णय घेतला, जे करायचंय त्याचा पूर्ण विचार केला की तिथेच न थांबता लगेचच एक एक पाऊल त्या दिशेनं उचलून कृती करायला लागावी. जे पुढे मोठं उभं करायचं आहे त्याचा पाया रचायला सुरुवात करावी. कामाला सुरुवात करतानाही कोणत्या गोष्टी आधी करणं महत्त्वाचं आहे, कोणत्या गोष्टी आपलं ध्येय पूर्ण करणार आहेत, कोणत्या बाबी थोड्या नंतर केल्या तरी चालतील आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत याचीही स्पष्ट आखणी करुन त्यादृष्टीकोनातून काम करायला सुरुवात करावी. म्हणजे आपण निश्चित ध्येयापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो.

4 स्वत:च्या आणि इतरांच्या फायद्याबद्दलही विचार करा

आपण स्वत:च्या जिंकण्याचा विचार करताना समोरच्याच्या हारण्याचा विचार करतो. म्हणजे समोरचा हरला की आपण जिंकणार असा विचार आपला प्रभाव इतरांवर पाडू शकत नाही. समोरची व्यक्ती आपल्याला स्पर्धक म्हणूनच बघते. त्यामुळे त्याच्याशी आपलं नातं तयार होवू शकत नाही. नेहेमी स्वत:चा फायदा बघताना इतरांचा फायदाही कसा होईल हे बघावं. यामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल आपलेपणा, आदर आणि विश्वास निर्माण होतो. इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.

 

5 इतरांना समजून घ्या आणि मग समजून सांगा

इतरांचं ऐकून घेणं हे खूप मोठं कौशल्य आहे. हे कौशल्य आपला आणि समोरच्याचाही फायदा करुन देतं. समोरच्याला मधे न थांबवता त्यांचं पूर्ण ऐकून घेणं आवश्यक आहे. यामुळे आपल्याला समोरच्याचं म्हणणं, त्याचा प्रश्न, परिस्थिती समजते. नीट ऐकून घेतलं तरच समोरच्याला आपण योग्य ते सांगू शकतो. शांतपणे ऐकून घेण्याच्या भूमिकेतूनच समोरच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. समोरच्याचा काय दृष्टिकोन आहे हे त्याचं/ तिचं नीट ऐकून घेतल्याशिवाय समजत नाही. आणि ते समजलं नाही तर आपल्याला समस्येवर योग्य पर्यायही सूचवता येत नाही. शांतपणे ऐकून घेण्याच्या भूमिकेमुळे संवाद सुधारतो, नातं घट्ट होतं. शांतपणे ऐकून घेतल्यानं आपल्याकडे भरपूर माहिती जमा होते. ही माहिती आपल्या स्वत:चा दृष्टिकोन तयार करण्यसाठी मदत करते.

6 ताळमेळ साधा

सर्व गोष्टी आपण एकट्यानं करु शकत नाही. एखादं काम चांगलं झालं तर त्यातून आपला प्रभाव पडतो. पण कोणतंही काम चांगलं होण्यासाठी आपल्या एकट्याचं योगदान महत्त्वाचं नसतं. इतरांचं सहकार्यही तितकंच गरजेचं असतं. यासाठी आपल्यात काय कमी आहे, इतरांच्या काय ताकद आहेत हे ओळखून तसा ताळमेळ घडवून काम पूर्ण केलं तर काम चांगलं होतं आणि ते चांगलं काम घडवून आणण्यतल्या आपल्या भूमिकेचा इतरांवर प्रभाव पडतो. आपण इतरांना समजून घेतो, त्यांची मदत घेतो यामुळे समोरच्यांमधे आपल्याविषयी प्रेम, आदर आणि विश्वास निर्माण होतो. ताळमेळ साधणं जमलं की इतरांकडे बघण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते. इतरांमधे काय गुण आहेत, कोणती कौशल्य आहेत हे समजतं. आणि सहकार्यातून चांगलं काम उभं करण्याची दिशा मिळते. हे जमलं तर आपला प्रभाव इतरांवर पडतोच.

7 स्वत:वर सतत काम करा
प्रभावी व्यक्ती बनण्यासाठी सतत स्वत:वर काम करणं, स्वत:ची क्षमता, कौशल्य वाढवणं खूप गरजेचं असतं. आपण आपलं मूल्यमापन करुन आपल्यात अजून कसली कमतरता आहे हे शोधून त्यावर काम करायला हवं. स्वत:वर काम करताना 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य जपणं. चांगला व्यायाम आणि सकस अन्न यातून हे साधतं. मानसिक क्षमता वाढवण्यासाठी वाचन करनं, ध्यानधारणा करणं, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं, त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. समाजतील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आपण इतरांना जी सेवा देतो आहोत त्याचा दर्जा कायम वाढवत नेणं, समोरच्याला आपल्याबद्दल विश्वास वाटेल अशी कृती करणं आणि आत्मबळ वाढवण्यासाठी स्वत:च्या आत डोकावणं, आपली तत्त्वं आपली मूल्यं जपणं. या चारही अंगानं स्वत:वर काम करुन स्वत:ला अधिक टोकदार केलं की आपण एक चांगली व्यक्ती होतो. आपला प्रभाव इतरांवर पडतो.

Web Title: No Money, No Appearance, These 7 Habits Of Successful People Impress People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.